Friday, October 29, 2010

३२. मला भेटलेली माणसं - भाग-२ - पकादादा

पकादा ही एक अजब वल्ली आहे.
त्याचे नाव प्रकाश असं असले तरी त्याला आम्ही पकादा असंच म्हणतो.
एखाद्याच्या नावाला दादा लागण्यामागे त्या व्यक्तीचे लहानांच्यात वावरणे कारणीभूत असावे.
हे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांशी जरा फटकूनच असतात. त्यामानाने लहानांच्यात जास्त रमतात. लहान मुले त्यांना दादा, काका असे संबोधन जोडतात आणि तेच त्यांच्या नावाला चिकटून राहते. (स्वत:ला दादा, बापू म्हणवून घेणा-यांचे हे गुपित असते. लहान असल्यापासूनच ही लोकं आपल्यापेक्षा लहानांच्यात वावरतात म्हणजे मग ते दादा वगैरे होतात. नाहीतर मग मोठ्या मुलांत वावरले की मग चिंट्या, पिंट्या इत्यादी नावे चिकटतात.)
पण पकादाचे लहानांच्यात वावरणे हे त्याचे निरागसपण आहे. मोठी लोकं त्याची चेष्टा करतात त्याची टर उडवतात त्यामुळे तो त्यांच्या नादाला जास्त लागत नाही.
वडील आर्मीतून रिटायर होऊन आले आणि पकादाचे लग्न झाले. लग्नानंतर पोटापाण्य़ासाठी पकादाने अनेकप्रकारचे उद्योग केले. कधी एम.आय.डी.सी. ला जाऊन कारखान्यात नोकरी केली तर कधी वॉचमन म्हणून कुठेतरी उभा राहीला. कधी कुठल्या रंगा-याच्या हाताखाली इमारती रंगवायचे काम केले तर कधी गवंड्याच्या हाताखाली दगडे उचलली. काम कोणतेही असो ते नेकीने करणे हाच त्याचा गुण आणि कामातल्या खाचाखोची माहीत नसणे ही त्याच्यातली उणीव. ज्यांच्याकडे त्याने काम केले त्या सर्वांनी त्याला कसे कसे फसवले ते फक्त त्याच्या तोंडूनच ऐकावे. ते ऐकताना आपल्याला वाटेल की हा कुणा दुस-या पकाचीच गोष्ट सांगतो आहे इतकी त्रयस्तता. दहा ठिकाणी फसला तरी आत्ताच्या ठिकाणी मी कसा सुखी आहे, काम कसे सोपे आहे, मालक किंवा साहेब कसे चांगले आहेत हेच तो भेटलेल्याला सांगतो. एवढेच नाही तर आपण जास्तीचा पगार कसा मिळवतो याची गुपिते तो हळू आवाजात सांगतो. पण हाय ! काही दिवसांनी पुन्हा ’येरे माझ्या मागल्या’, त्याच मालकाने मला कसे फसविले ते त्याच्या तोंडून ऐकावे लागते.
पकादाने एकदा आमच्या शाळेजवळ पानटपरी सुरु केली होती. तिथे पकादाने दुकान उघडणेची व बंद होण्याची वेळ तसेच जेवण्याच्या सुट्टीची वेळ आपल्या ग्राहकांच्या सोईसाठी लिहून ठेवली होती. ती अशी - उघडणेची वेळ सकाळी ११.०० वा. जेवणाची सुट्टी- दु. १ ते ३.३० व बंद करणेची वेळ साय़ं. ५.१० वा. या वेळा निवडण्यामागचे त्याचे लॉजिक एवढेच की शाळेचे टायमिंग व आपले टायमिंग एकच असावे. शाळा भरली की दुकान सुरु, शाळा सुटली की दुकान बंद. आता तुम्हीच विचार करा मुले वर्गात गेली दुकान सुरु. शाळा सुटली की दुकान बंद मग ते चालणार कसे? पण याचे पकादाला काही नाही, ’नियम म्हणजे नियम’. दुकान म्हणजे एक ड्यूटीच होती मग त्याला काळवेळ पाहीजेच की- असं त्याचें म्हणणं.
बरे कोणी गुटखा उदार मागीतला की तो लिहिलेली पाटी दाखवत असे "आज रोख, उद्या उदार" आणि वर त्या गि-हायिकाला सांगत असे ’दोस्ती हमसे करो धंदेसे नही’. गुटखा खाणार हे घे असं म्हणून आपणच एक पूडी सोडून त्याला अर्धी व आपण अर्धी खात असे, पण उधार नाही म्हणजे नाही. भले मग तो मनुष्य दिवसातून पाचसहा वेळा का येईना. गुटखा खाऊन जा पण उधार मिळणार नाही. दिवसाच्या एकूण खपातला निम्मी पानं, तंबाखू, गुटखा याच मार्गाने जात होता. हा बिझीनेस त्याला फार मानवला नाही. लवकरच त्याला आपले दुकान गुंडळावे लागले.
एकदा हा एम.आय. डी. सी. तून रात्री वेळाने घरी येत होता. रात्रीच्या वेळी गावाकडे जाण्यासाठी वाहणे कमीच असतात त्यामुळे तो कागलच्या नाक्यावर वाट पहात थांबला होता. एक बाचणीला जाणारा टू-व्हीलरवाला आला आणि त्याने पकादाला लिफ्ट दिली. थोड्यावेळाने पकादाच्या लक्षात आले की गाडी रस्त्यावरून इकडे तिकडे झोले खात जात आहे आणि पुढच्या मानसाने थोडीशी लावलेली आहे. त्यातच निम्मे अंतर पार झाल्यावर गाडीचे मागचे चाक पंक्चर असल्याचे कळले. मग काय पकादाने तिथून ती गाडी ढकलत ढकलत गावात आणली. रात्री १ ते १.३० च्या दरम्यान दादू कुंभाराला उठवून ते पंक्चर काढायला लावले त्याचे पैसे त्यानेच भागविले हे वेगळे सांगायला नकॊ. त्यामानसाला जेवणाविषयी विचारले आणि मगच त्याला मार्गस्थ केले. बरे पकादाला गाडीही चालविता येत नाही. पण आपल्यासाठी गाडी थांबविणा-यासाठी एवढेतरी करणे हे त्याला आपले कर्तव्यच वाटले.
पकादाला सिनेमाची खुप आवड आहे आणि त्याचा आवडता नट आहे एक- मिथून चक्रवर्ती आणि नंबर दोन - दादा कोंडके. त्याला या दोघांचे चित्रपट व त्याचे डॉयलागही पाठ आहेत. पकादा या दोघांची मिमिक्री खुप चांगली करतो. "ज्याच्याजवळ आय (आई) हाय, त्याच्याजवळ सगळ हाय" हा दादा कोंडकेंचा डॉयलाग त्याचा फेवरीट आहे. गणपतीच्या स्टेजवर तो बेफाम नाचतो, कधी मिथून बनून डिस्को डान्स करतो तर कधी उषा नाईक बनून लावणीवर नाचतो.
पकादासारख्या लोकांना हे दादा कोंडके किंवा मिथून चक्रवर्ती टाईपचेच चित्रपट आवडतात. कारण त्यातला नायक हा त्यांच्यासारखाच एकवचनी, खरे बोलणारा, सरळमार्गी असतो. जसे दादा कोंडकेचे पात्र हे स्वत:ला सेल्फ कॉन्फिडंट समजत असते, इतरांची खिल्ली उडवत असते पण आपल्याला त्याचा बावळटपणा प्रत्तेक ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रकारे हे लोकही स्वत:ला चालू समजत असतात पण त्यांना सर्वजन फसवत असतात. त्यांनी स्वत:ला चालू समजणे किंवा तसे दाखविन्याचा प्रयत्न करणे हेच त्यांच्या निरागसतेचे प्रतिक आहे. कारण खरा चालू मनुष्य कधीही स्वत:ला चालू म्हणवून घेत नाही व तसे दाखवतही नाही.
असे जरी असले तरीही ज्याप्रकारे या चित्रपटातला हिरो त्याच्या चांगुलपणामुळे, बावळटपणामुळे तर कधी धांदरटपणामुळे सर्व संकटांवर मात करतो किंवा त्याच्यावरील सर्व संकटे आपोआप दूर होतात त्याचप्रकारे पकादासारख्या लोकांचे जीवन अनंत अडचणीतूनही पुढे पुढे सरकत असते. पकादाला दोन मुले आहेत व ती आता कर्ती-सवरती झाली आहेत. पण पकादा तोच आहे हसत हसत बोलनारा, आपल्या गप्पांनी वातावरण नेहमी ताजे ठेवणारा, नेहमी स्वत:कडे लहानपण घेणारा अगदी तस्साच. आंधळ्याच्या गाई देव राखी असं म्हणतात ते कांही खोटं नाही

1 comment:

  1. खूप मस्त लेख!
    फार फार आवडला!

    ReplyDelete

प्रतिक्रिया