बस क्रमांक ४४८७ बेळगाव-कोल्हापूर ही बस समोरच्या प्लाटफार्मवर उभी आहे, . . . अशी अनाउंसमेंट ऐकतच बसमध्ये चढलो.
कागल बसस्थानकावर कोल्हापूरला जाण्यासाठी माझ्याबरोबर आणखी दोनतीन प्रवासी व एक उतारवयाची मावशीबाई होती. पैकी आम्हा कोणालाच बसण्यासाठी बाक उपलब्ध झाला नाही. मावशीबाईंनी मात्र आपल्या बोलक्या स्वभाचा फायदा करून घेत जागा पटकावली. एसटीचा दरवाजा पूढच्या बाजूने असल्यामूळे आम्ही पूढच्याबाजूने चढलो व पूढेच उभा राहीलो. मावशीबाईंची सीट मात्र अगदी मागच्या कडेला होती. मागच्या कडेला सीट असून देखील त्या बाईंनी आपल्या बाजाराच्या व काहीबाई भरलेल्या दोन पिशव्या अगदी निर्धोकपणे सोबत नेल्या होत्या. कंडक्टरने जाग्यावर बसूनच आम्हाला तिकीटे दिली. कदाचीत तो जागेवरून उठल्यावर आमच्यापैकी कोणी त्याची जागा पटकावेल याची त्याला भीती वाटली असेल. कंडक्टरने जाग्यावरूनच पण जरा कमावलेल्या आवाजात "आणखी कोणी तिकीटाचं राहीलयं काय?" असा दमदार सवाल केला. तो बहूदा मागच्या सीटपर्यंत ऐकू गेला असावा. कारण कांही वेळाने मागच्या बाकावरून तिकीटासाठी कोणीतरी पैसे पाठवले होते. हाफ तिकीटावरून ते तिकीट मावशीबाईचेच असल्याचे माझ्या द्यानात आले.
एम आय डी सी चा स्टाप घेउन एसटी पूढे निघाली तेवढ्यात मागच्या बाजूने हाक ऐकू आली, " कंडक्टरसाहेब उजळाईवाडीला गाडी थांबवा."
आवाजावरूनच ओळखले की हा त्या मावशीबाईचाच आवाज.
कंडक्टरनेपण त्याच सूरात सांगितले " उजळाईवाडीला गाडी थांबत नाही."
हे ऐकूण मावशीबाई लगोलग उठून आपल्या दोनदोन पिशव्या सांभाळत पूढच्या बाजूला आल्या आणि त्यांनी आपला ठेवणीच्या सूरात विचारले " का हो कंडक्टरसाहेब, उजळाईवाडीला गाडी का थांबत नाही?"
" ही गाडी सूपरफास्ट हाय, अधीमधी कुठंबी थांबत नाही?"
"आदी.. मदी.. कुठबी नाही?"
"नाही"
"म्हंजे, उजळाईवाडीला गाडी थांबनार नाही?"- मावशीबाई
"आता मावश्ये काय कानडी भाषेत सांगू का कागदावर लिहून देउ?" कंडक्टरचा पारा चढला.
"कंडक्टरसाहेब, उजळाईवाडीला गाडी थांबलीच पाहीजे?"
"का?"
" नाही म्हंजे उजळाईवाडीला एवढंमोठ्ठं इमान थांबतय आणि ह्यो लाल डब्बा थांबत नाही म्हंजे काय?"
गाडीत एकच हश्याचा लोट उठला. ऐकणारा प्रत्तेकजण हसत होता. तोच डायलाग पून्ह:पून्हा सांगून सांगून जो-तो हसत होता. हास्याच्या लाटा पूढच्या बाजूपासून मागच्या कडेपर्यंत पोहोचल्या.
वातावरण निवळले.
मावशीबाईचं म्हणणे खरे होते.
उजळाईवाडीजवळच कोल्हापूरसाठीचे विमानतळ आहे.
तिथे विमान थांबते हे तिला माहीत होते. पण तेथे विमान ’उजळाईवाडीला’ उतरावे म्हणून कंडक्टरने बेल दिलेली नसते हे तिला कसे कळणार ?
पण झालेल्या विनोदामूळे वातावरणात एकदम बदल झाला आणि कंडक्टरसाहेबांनी उजळाईवाडीला गाडी थांबवली. सगळ्या एसटीने मावशीबाईंना हास्यपूर्ण निरोप दिला.
प्रवासात जर आपणही असा हलकाफुलका स्वभाव धारण केला तर प्रत्तेक प्रवास असाच होईल व आपण ही आपल्या ’उजळाईवाडीला’ मजेमजेत पोहचू.
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया