सावधान धर्माचे राज्य येणार आहे- याचा पहिला भाग लिहिला पुढे याच विषयावर खुप काही लिहायचे असे प्रयोजन होते. मनात खुप सारे विचार होते. पण अचानक पुढे लिहीण्याचे बंद करावे असे वाटू लागले. मला पुढे काय करावे असा प्रश्न पडला. विषय तर सुरु केला होता त्याला व्यवस्थित उत्तरार्धापर्यंत नेणे महत्वाचे होते.
पण पुढे जाताना मला दुसरेच विचार सतावू लागले. मी जसा विचार करतो तसा लिहू शकतो का? कारण विचार करणे आणि ते कागदावर/स्क्रिनवर उतरवणे या भिन्न प्रक्रिया आहेत. आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवणे हे खुप अवघड काम आहे. आपण जे जे व्यक्त करु ते ते असत्य होवून जाते. आपण सांगतो एक आणि समोरचा ऐकतो दुसरेच. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" लोकांनी ऐकले काय तर पुण्याची गणना कोणी करत नाही तर हरीचे नाव कशाला घ्या. ते ज्ञानेश्वरांचेच सांगणे पुढे पास करतात की "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" आपण हरीचे नाव घ्यावे असं कोणाला वाटत नाही. तर आपण घेतलेले हरीचे नाव दुस-याला ऐकू कसे जाईले याचीच जास्त चिंता लागून राहते. आपण कसे हरीभक्त आहोत हे दुस-याला पटवून सांगण्याकडेच सर्वांचा ओढा असतो. मग आपण ज्या मार्गातून भक्ती करतो तोच कसा श्रेष्ठ हे दाखवले जाते. आपला पंथ वाढवण्यासाठी कष्ट घेतले जातात. मोठमोठे जाणकार आणून त्यांची छाप आजूबाजूच्या लोकांवर पाडली जाते. पण हरीचे नाव घ्यावे आणि आपले काम नेकीने करावे असे कोणास वाटत नाही.
या लोकांना आत्ताची चिंता नाही हे आत्ता सुखी आहेत. पंढरपुरला जातात, अक्कलकोटला जातात, वैष्णोदेवीला जातात, कैलास, अमरनाथ, काशीला जातात. पण एक गरीब मनुष्य आर्थिक विवंचणेतला मनुष्य अशा यात्रा करेल काय? आणि यात्रेला जाउन काय मागायचे? आणखी पैसा? एवढ्या दूर यात्रेला गेलेला कोण " पसायदान" तर मागणारच नाही. ते आपल्या हक्काचे पुण्यच मागतील. हे लोक इथले सर्व सुख सोडायला तयार आहेत पण त्यांना स्वर्गात स्थान हवे आहे. इथल्या रुपयाच्या बदल्यात त्यांना स्वर्गातील चलन हवे आहे. म्हणून दान-धर्म, पुजा-पाठ, मंत्र-यज्ञ सर्व काही. हे लोक दान जरी केले तरी दानाची रक्कम मोजून ठेवणार आणि प्रत्तेकाला ती सांगत सुटणार. जर एखादा म्हणाला की मी या मंदीरासाठी एक लाख रु. दिले. तर त्याने ते दिलेलेच नाहीत. जर ख-या अर्थाने दिले असते तर तो हे लगेच विसरुन गेला असता. तो हे विसरत नाही आणि कुणाला विसरुही देत नाही. तो संगमरवरी दगडावर नाव कोरुन ठेवू इच्छितो की अमूक या महान दानशूराने एक लाख रु. देवासाठी दिले. असे लोक काही दान वगैरे देत नाहीत ते फक्त एक्सचेंज करतात. फ़ोरेक्स सारखे रुपयाच्या बदल्यात पुण्य प्लस प्रसिध्दी मान इ. इ.
संत ज्ञानेश्वरांना याची कल्पना होती म्हणूनच ज्ञानप्राप्ती होवूनही ते प्राप्त झालेले ज्ञान शब्दबध्द करण्यास तयार नव्हते. स्वत: गुरु निवृत्तीनाथांनी त्यांना आदेश दिल्यावरच ते गितेवर मराठीतून भाष्य करण्यास तयार झाले.
कोणताही ज्ञानी पुरुष आपले ज्ञान दुस-या पर्यंत शब्दरुपाने पोहचवू शकत नाही. ते फक्त इशारे करु शकतात आणि शिष्यानी ते इशारे पकडून त्यानुसार जायचे असते.
गौतम बुध्द जेव्हा बुध्दत्वाला प्राप्त झाले तेव्हा ते कितीतरी काळ मौनातच होते. प्रत्तेक्ष देवांनी त्यांची विनवणी केली की हजार हजार वर्षातून एखादा बुध्द जन्मतो तेव्हा आमच्यावर कृपा करा व काही उपदेश करा. तेव्हा कुठे बुध्द उपदेश करण्यास तयार झाले.
तात्पर्य काय, आपले विचार शब्दबध्द करणे हे अगदी अशक्यप्राय काम आहे.
त्या ज्ञानवंतांची ही गोष्ट तर मजसारख्या पामराची काय कथा ?
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया