Thursday, June 03, 2010

११. हेड्मास्तरांची गम्मत

कशाला फुकटची भाषणं ऐकवतो आहेस?
असं आपण एकमेकाला म्हणत असतो पण व्यासपीठावर जाउन किंवा गर्दीसमोर भाषण देणे किती आवघड आहे हे तुम्हालाही माहीत आहेच किंवा तुम्ही मागील पोष्टमध्ये वाचले असेलच.
या भाषण देण्याच्या प्रकारातून अनेकदा असे विनोद घडत असतात.
एकदा एक मध्यम वयाचे वक्ते भाषण संपवून खाली उतरले. त्यांना भेटायला त्यांच्याच वयाची एक महीला आली होती. त्यांनी त्या बाईंना अभिप्राय विचारला. बाई म्हणाल्या," बाकी सगळं ठीक होतं, पण तुम्ही बोलताना मधेमधे तुमची विजार वर ओढत होता, ते अजिबात चांगले दिसत नव्हते!"
तेव्हा ते वक्ते म्हणाले, " मी विजार ओढणं बंद केले असते तर ते अधिकच वाईट दिसले असते कारण माझ्या विजारीची नाडी सुटली होती."
आणखी एके ठीकाणी एका वक्त्य़ाचे भाषण खुपच लांबले होते. खरंतर भाषणाचा विषयच तसा होता " जागो भारत जागो".
ते इतके लांबले होते की सभागृहातले लोक केव्हाच निघुन गेले होते फक्त एकटाच श्रोता तेथे उरला होता. भाषण संपताच त्या वक्त्याने त्या श्रोत्याचे आभार मानायचे ठरवले. ते स्टेजवरुन खाली त्याच्याजवळ जाऊन पाहतात तर तो डाराडूर झोपला होता. त्यांनी सहज त्याला जागे केले तर त्याने शिव्याच हासडायला चालू केल्या. तो म्हणाला, "घरी ढेकून झाल्यात म्हणून इथं येउन झोपलो होतो, तर भिकनिशे निवांत झोपूपण देत नाहीत." असं म्हणून तो पुन्हा झोपला.
एका वक्त्याला भाषणाला उभा राहील्यावर वारंवार पाणी पिण्याची सवय होती. त्यासाठी एका तांब्यात पाणीभरुन व त्यावर एक वाटी पालथी घालून त्यांच्याजवळ ठेवलेली असायची. तर एकदा या महाशयांचे भाषण खुपच लांबले. तांब्यातील पाणीही संपले पण त्यांनी आपली सवय मोडली नाही त्यांनी रिकामाच तांब्या दोनतीनदा उपडा करुन वाटीत पाणी घेतल्या सारखे करुन पिऊन टाकले.
आणखी एका वक्त्यांना शर्टच्या बटनांशी चाळा करण्याची सवय होती. त्या महाशयांनी तर बोलता बोलता आपल्या शर्टची दोन बटणेच तोडून टाकली होती. नंतरच्या कार्यक्रमात ते दोन्ही हातांनी शर्ट धरुनच सगळीकडे फिरत होते.

आमच्या एका हेडमास्तरांसही अशीच सवय होती. आपल एक हात मागे ठेउन हातातील अंगठी फिरवत ते पल्लेदार भाषणे ठोकत असत. स्टेजवर असोत की वर्गावर, रस्त्यात असोत की घरी ते बोलताना नेहमी हीच पोझ असत असे.
असं म्हणतात की, एकदा त्यांच्या परसात उकिरडा उपसण्याचे काम सुरु होते. दोन-तीन गडी माणसं आपलं काम लवकर आवरण्याच्या दृष्टीने झपाझप काम करत होते. तेथे आमचे हे हेडमास्तर थांबले होते, नेहमीचीच पोझ. असं करा तसं करा असं एकसारखं टुमणं यांनी त्या माणसांच्या मागे लावले होते त्यामुळे ती मानसही वैतागुन गेली होती.
बोलता बोलता यांच्या हातातील ती सुप्रसिध्द अंगठी त्या उपसलेल्या ढिगा-यावर कुठेतरी पडली. या साहेबांनी कुणाला याची खबरच केली नाही. थोडीफार वरवर शोधाशोध केली आणि बाजूला जाऊन थांबले.
अंधार पडल्यावर ती मानसं आपापल्या घरी गेली. मग या महोदयांनी दिवा लावून ब्याटरी घेऊन आपलं शोधकार्य सुरु केलं. आपल्या पडलेल्या अंगठीची वाच्यताकरणे जाणीवपुर्वक टाळले होते. कदाचीत दुस-या कोणाला सापडल्यास कोण आपल्याला ती परत देईल की नाही याबद्दल त्यांना शंका होती. दुस-या दिवशी सकाळी ती मानसं कामावर आली तेव्हा त्यांना सगळा मैला, शेण, राख, आणि इतर नाना तर्हेचा मौल्यवान कचरा एस्तत: पसरलेला दिसला.
आमचे सर रात्रभर एकटेच ती अंगठी शोधत होते. जागरणामुळे डोळे चोळत बाहेर आले तेव्हा त्यांना त्या विस्कटलेल्या खताबद्दल विचारले. आमच्या हेडसरांनी सगळी कहाणी आपल्या रिकाम्या बोटांवरुन बोटे फिरवत सांगितली. ती शोधाशोध सांगताना सरांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
सरांची ही सगळी सविस्तर कहाणी ऐकून ते लोक हसु लागले.
त्यांच्यापैकी एकाने ती सुप्रसिध्द अंगठी आपल्या खिशातून काढून सरांच्या हातावर ठेवली आणि म्हणाला," सर, ही अंगठी आम्हाला कालच सापडली होती आणि ती तुमची आहे हे पण आम्हाला माहीत होतं पण आम्ही तुमची जरा गम्मतच केली, कशी वाटली.... गम्मत?"
ती अंगठी सरांनी आपल्या बोटात चढवली व नेहमीच्या सरावाने फिरवली, मिस्किल हसत निघून गेले ते काम संपेपर्यंत परत आलेच नाहीत.

1 comment:

प्रतिक्रिया