येशु ख्रिस्तांनी एके ठिकाणी एक खुपच सुंदर गोष्ट सांगितली होती.
ती गोष्ट मी ओशोंच्याकडुन ऐकली. मला ती खुपच आवडली, तुम्हालाही आवडेल.
येशु ख्रिस्तांनी, भगवान बुध्दांनी अशा खुप लहान लहान कथा सांगितल्या होत्या ज्याद्वारे आपल्याला कांही इशारे (सिग्नल) दिले होते. ते इशारे धरुन आपण पुढे जायला हवे होते. त्यांनी बोटांनी चंद्र दाखविला, चंद्राकडे इशारा केला पण आम्ही त्यांचे बोटच पकडुन राहीलो. चंद्राचे सौंदर्य आपल्या ध्यानातच आले नाही. आपण त्यांचे बोटच धरले व आपल्याला चंद्र मिळाला असे म्हणू लागले. ओशॊ म्हणतात येशूने बायबलमधून किंवा पर्वतावरील भाषणांमधून दिलेले सिग्नल आपण पकडलेच नाहीत. आपण त्यांपेक्षा सोपे असे बायबल पकडून राहीलो.
आपल्याकडेसुध्दा अनेक संतानी अनेक जाती-धर्मामध्ये जन्म घेतला व मोक्ष मिळविला. अनेक संतानी अभंग, ओव्या, भारुडे रचली आपल्याला मार्ग दाखवीण्याचा प्रयत्न केला. अनेक भाषेत अनेक प्रकारचे सिग्नल आजही मिळत आहेत पण आपण ते पकडत नाही. आपण त्याच त्या पंडितांनी किंवा भटा-बामणांनी सांगितलेल्या, परंपरेने आलेल्या, सत्यनारायणाच्या , वैभवलक्ष्मीच्या, चाली-रितीच्या व्यर्थ गोष्टीत अडकलेलो आहोत.
कथा खुपच सुंदर आहे.
एकदा एक शहरात एक सधन जमिनदार राहत असतो, ज्याची शेती आसपासच्या ब-याच खेड्यात असते. जमीनदार वंशपरंपरागत सधन व सुखी असतो पण आपल्या व्यापात गुंग असतो. त्यामुळे इच्छा असुनही त्याला आपल्या शेतीसाठी खुपसा वेळ मिळत नाही.
सुगीच्या काळात एके दिवशी तो आपल्या एका शेतावर गेला. शेतावर पोहोचताच त्याला लक्षात आले की आपले पिक कापणीस आले असून ते लवकरच कापुन घ्यायला हवे.
त्याने आपल्या दिवानजीला बोलावून लगेचच सांगीतले की गावातील मिळतील तेवढी मजूर घेउन आलेले पीक कापून घे. दिवानजीने त्याच दिवशी गावात सर्वांना हा निरोप दिला.
जमीनदार हा खुपच दानशुर म्हणुन प्रसिध्द होता त्यामुळे गावातील खुपशे लोक कापणीसाठी सकाळी लवकर पोहोचले.
काही लोकांना ही खबर उशीरा पोहोचली ते थोडे उशीरा पोहोचले.
काहींना आणखी दुसरे काम होते ते थोडे अधीक उशीरा, कांही अगदी संध्याकाळी कामावर पोहोचले. तर कांही काम संपल्यावर पोहोचले.
काम एका दिवसातच संपले.
काम संपल्यावर जमीनदार मोबदला वाटण्यासाठी उभा राहीला. त्याने सरसकट सर्वांना एकाच मापाने पण भरभरुन धान्य वाटले. लोकांकडे न्यायला साधने कमी पडली पण देण्यात कमतरता आली नाही.
वाटप संपल्यावर दिवाणजीने जमीनदाराला विचारले की प्रत्तेक मजुराच्या कामावर पोहोचण्याच्या वेळा वेगवेगळ्या असूनही आपण सर्वांना एकाच मापाने वाटप केलेत, असं का?
तेव्हा जमीनदार म्हणाला," दिवानजी तुम्हालाही हे कळू नये याचे मला आश्चर्य वाटते, जर मला सर्वकांही वाटून टाकायचे आहे तर मला त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच काय? " माझ्याकडे इतके आहे की मला ते वाटताना कमी-जास्त करावयाची गरजच नाही."
ही कथा इशारा करते परमेश्वराच्या उदारतेकडे, त्याच्या कृपाप्रसादाकडे, त्याच्या न्यायाकडे. त्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होईल असे मला तरी वाटत नाही. एक साधा जमीनदार जर देताना भेदभाव करत नाही तर तो तर सा-या जगाचा राजा आहे तो कशाला करेल?
जर तो भेदभाव करत नाही मग इथे आपण कशाला भेदभाव करतो. मी दररोज देवळात जातॊ, मी एवढे उपवास केले, मी एवढे नारळ फोडले, मी अस्तिक आहे, तो नास्तिक आहे. असा टेंभा मिरवण्याची कोणी गरज नाही. मी माळकरी आहे, मी अमुक पंथाचा आहे, मी साधक आहे मी फकीर आहे हा टेंभा आता पुरे झाला. मी ओम शांती मंडळात जातॊ, मी ब्रम्हाकुमारी मधे आहे नी मी स्वामी समर्थाच्या आरतीला जातो हा दंभ आता सोडला पाहीजे.
हिंदू-मुसलमान, ख्रिस्त-जैन, भारतीय-अमेरिकन, शाकाहारी-मांसाहारी, दारुडा-बेवडा, हरीभक्तपरायन, आस्तिक-नास्तिक, गरिब-श्रीमंत, ब्राम्हण-योगी, ध्यानी-त्यागी, संसारी-परमार्थी हे सर्वच जण तेथे पोहोचणार आहेत, कारण पोहचण्याची दुसरी जागाच नाही. सर्वांचीच झोळी भरणार आहे. देणारा देत आहे.
तर मग उशीर झाला असला तरी हरकत नाही, कधीही त्याच्यासमोर झोळी पसरा, देणारा तयारच आहे.
" देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या."
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया