Wednesday, August 25, 2010

१५. बबन्या

बबन्या हे आमच्या गावचे आनखी एक पात्र आहे.
त्याला लोक आदराने "इद्दरकल्याणी बबन्या" असे म्हणतात पण त्याबद्दल त्याला कसलाही अहंकार नाही.
बबन्याच्या अनेक करामती गावात प्रसिध्द आहेत.
याला प्राण्यांबद्दल भलतेच आकर्षण आहे. तशी गावातल्या खुप कमी मानसांच्याबरोबर त्याची गट्टी जमते. कारण बबन्यानं सांगितलेल्या कान्या सगळ्य़ांच्या पचनी पडतीलच असे नाही. त्यासाठी आपला ऐकण्याचा कोटा जाम पाहीजे.
बबन्याने म्हणे एकदा मासा पाळला होता. तो फक्त पाण्यात राहणारा व कालांतराने मरून जाणारा साधा मासा नव्हता. बबन्याचा मासा बबन्याबरोबर बोलतही असे. बबन्याच्या सुख- दुखा:त सामील होत असे. बबन्या जर कधी थकून काही न करता गप्प बसला असेल तर त्याला आनखी करामती करन्यास हा मासाच प्रोत्साहन देत असे.
त्या माशाचे पुढे काय झाले रे बबन्या असे विचारल्यावर बबन्याचे डोळे आजही भरुन येतात. एकदा तो मासा आजारी होता. बबन्या म्हणे त्या माशाला घेऊन फिरायला गेला होता. फिरत फिरत ते नदीच्या पुलावर पोहोचले. बबन्याने माशाला स्वत:ला सांभाळण्या विषयी सुचना केली पण दुर्दैव. अचानक घसरून तो मासा नदीच्या पाण्यात पडला व बुडून मेला. बिच्चारा मासा !.
पुढे या घटनेतून सावरल्यावर बबन्याने एक पांढरे शुभ्र मांजर पाळले होते.
बबन्याच्या लाडाने लाडावल्यामुळे ते मांजर भलतेच गुबगुबीत झाले होते. ते मांजर बबन्याच्या गैरहजेरीत गल्लीत फिरुन सगळ्यांची दुधाची भांडी तपासत होते.
एक दिवस मी काहीतरी आणायला दुकानात चाललो होतो तर बबन्या आपल्या मांजराला मन लावून साबनाने धूत होता. मी विचारले तेव्हा म्हणाला कसा," अहो, पिसवांनी भरलय नुसतं कुठल्या मांजरीकडं जावून गुण उधळून आलय कुणाला ठावं? रंग पार विटल्यागत झालाय "
"मग असं धुवून काय होणार?"
"असं म्हणजे, मी त्याला तासभर त्या एरीयलमध्ये भिजत घातला होता. सारखं बाहेर येत होतं म्हणून गळ्यात एक धोंडाच बांधल्याला, मग गप्पगार बसलं हुतं."
"आरं पण ते मरल अशानं"
" मरतयं कशानं, जावा आपला धंदा बगा मला ग्यान शिकवू नका" असं म्हणून त्यानं जोरान त्याला बादलीत घुसळून काढला.
एकंदर मागील अनुभव पाहता, मी त्याला काही सांगण्याच्या भानगडीत पडलॊ नाही.
मी दुकानातून परत मागे येत होतो तेव्हा बबन्या मांजराला धरुन रडत बसल्याला.
"कारे बबन्या आता का रडतोस ? सांगितल्यालं पटत नव्हतं, मांजराला असं धुवू नकॊ म्हणून"
बबन्यानं डोळे पुसलं आणि रागानं म्हणालं," धुतानं नाही, पिळून तारेवर वाळत घालतानं मेलं" आणि पुन्हा, "माझा बोकाआआआ" असं म्हणून रडायला लागलं.
आनखी एकदा बबन्या सकाळी सकाळी नळाखाली जाळी धरुन बसल्यालं दिसलं.
मी विचारलं, "काय करतोस रे बबन्या हे जाळी धरुन?"
तर म्हणाला," मासं धरतोय".
मी म्हणालो,"अरे वेडा आहेस काय? नळाच्या पाण्यात कधी मासं सापडत्यात काय?" तरी काही न बोलता तो तसाच बसून राहीला.
थोड्य़ा वेळाने मी पुन्हा तिथे आलो तेव्हा बबन्या चौकात पोरांसंगे गप्पा मारत बसला होता.
मी त्याला विचारले," कायरे किती मासे सापडले नळाच्या पाण्यात?"
तेव्हा तो मोठ्यांदा हसू लागला, पाठोपाठ सगळेच हसू लागले. मग हसू आवरुन बबन्या मलाच म्हणाला,"अरे वेडा आहेस काय? नळाच्या पाण्यात कधी मासं सापडत्यात काय?"

आनखी बबन्या पुन्हा कधीतरी.

1 comment:

प्रतिक्रिया