Monday, October 11, 2010

२९. गाव तिथे रित

"ठिक पाटील" ही एक बडी आसामी आमच्या गावात होऊन गेली. त्यांना कुणीही विचारले की ," काय पाटील कसे काय आहात?" किंवा " काय चाललयं, पाटील?" तर ते " ठीक " असे उत्तर देत त्यामुळे कालांतराने त्यांना "ठिक पाटील" असे नावच पडले. ते बहुदा पुर्वी दुस-या महायुध्दाच्यावेळी सैन्यात होते व तेथून रिटायर होऊन आल्यावर त्यांनी एक मोटरकार विकत घेतली होती. ९५१८- पंचान्नऊ-अठरा अशा क्रमांकाची ही गाडी त्या काळात कागलहून सिध्दनेर्लीला येण्यासाठीचे एकमेव स्वयंचलीत या प्रकारातील वाहन होते. कागल-सिध्दनेर्ली हा सातआठ किमीच्या प्रवासात ती गाडी पंधरावेळा ब्रेक घ्यायची आणि ढकलल्याशिवाय चालू व्हायची नाही. त्यामुळे कुणाची गाडी सुरु व्हायला कां-कू करू लागली की आम्ही म्हणतो ’तूझी गाडी पंच्यानऊ-अठरा झाली बघ’. "ठिक पाटलांविषयी इतकाच त्रोटक इतिहास मी कोणाकडूनतरी ऐकला आहे. मी त्यांना पहील्यांदा पाहीले तेव्हा ते खुप म्हातारे झाले होते व स्वत:ची तब्बेत सांभाळणे ही एकमेव ड्युटी ते करत होते. त्यांचे मुख्य वैशिष्ठ्य किंवा त्यांचा हातखंडा म्हणजे त्यांना दुस-याचे मरण समजत होते असं म्हणतात.
संध्याकाळी पाचाच्या सुमारला ते आपली काठी सांभाळत गावातून चालत चालत मुख्य रस्त्याने कागल-मुरगुड राज्यमार्गापर्यंत जायचे व अंधार पडण्यापुर्वी परत आपल्या घरी परतायचे. त्यांच्या या नेहमीच्या रुटवर जर कोणी म्हातारा म्हातारी अंथरुनावर असेल (व कुणाला त्यांची सुश्रूषा करायचा कंटाळा आला असेल तर) ते लोक आवर्जून ठिक पाटलांना घरी घेऊन जात असत.
आंथरुनावरच्या म्हाता-याला ते पाहायचे, एक दोन हाका मारायचे व बाहेर येऊन जाता जाता फक्त इतकेच म्हणत " कांही नाही, दोन दिवस..., ठीक आहे?".
याचा अर्थ दोन दिवसात अंथरुन रिकामे होणार. घरचा कर्ता मनुष्य लगेचच पै-पाहूणे बोलवून घ्यायचा. हा अनुभव गावातील ब-याच लोकांनी घेतला आहे. ठिक पाटलांचा अंदाज सहसा चुकत नसे.
एकदा ठिक पाटलांनी सांगितल्यावर मग काय गावातील सगळ्या बायकांचा लोंढा त्या घराकडे वळू लागतो. कोण आजारी आहे?, कोणाला ’जास्ती’ झालय? कोण गचकले? याची बातमी पसरण्याचे दुध डेअरी हे अधिकृत केद्रच बनले आहे. सकाळी सहा ते साडे -सात व संध्याकाळी पाच ते सात हे न्यूज चॅनल सुरु असते. दुध घालायला आलेल्या बायका रांगेने जाणा-या मुंग्याप्रमाणे वाटेतच थांबून एकमेकींची खबर पास करतात. (कोण कुणाबरोबर पळून गेले, कोण नांदणं टाकून गेले असल्या बातम्या प्रथम याच चॅनलवर झळकतात.) त्यामुळे कुणाच्या घरी बायकांचा लोंढा वाढला की आपण ओळखायचे की कोणालातरी ’जास्ती’ झालेलं आहे. कदाचीत यासगळ्या गोष्टीमूळे त्या आंथरुनावरच्या माणसालाही मग हे कळत असावे की मला जरा "जास्ती" झालेलं आहे. बरं या बायका तिथं जाऊन काय पाहतात, देव जाणे.
एकदा का कोणी वारले की मग पुढची कार्यवाही सुरु. यामध्येही प्रत्तेक ठिकाणची स्वत:ची अशी वेगळी पध्दत असते. तिकडे मुरगुडकडे कोणी वारले की कांही लोक म्हणे "आमक्या तमक्याच्या म्हाता-याने उडी मारली" असं सांगतात. इथे उडी मारली याचा अर्थ उडी मारून स्वर्गात गेली असा असावा. याचप्रमाणे गचकली, खपली, पोहचली, निवर्तली, मेली, मातृशोक झाला, निर्वाण झाले, माती झाली, कालवश झाली, देवाला गेली, कैलासाला गेली असे अनेक वाक्यप्रयोग आढळतात.
मी एकदा अमरच्या गावी हसूरला गेलो होतो. हे हसूर गाव कागल-गडहिंग्लजच्या सिमेवर आहे. तिथे फटाक्यांचा आवाज ऐकू आला. अमरची आई म्हणाली, "कोणतरी वटलं वाटतं." वटणे याचा अर्थ पैसे वटणे, चेक वटणे यावरून देवाच्या दारात माणूस वटणे असा होत असेल. जशी मानंसं तशी त्यांची भाषा. तिथे घरे एकमेकांपासून अंतरावर आहेत तेव्हा अशी काही बातमी सर्वांना कळण्यासाठी फटाके वाजविणे हा पर्याय त्यांनी निवडला आहे.
अंतू बरवासारखा कोणी असला म्हणजे मग ’अमक्यानं-तमक्यानं दसयाच्या अगोदरच शिलंगण केलं’ असंही म्हणेल. पुण्य़ाकडचा कोणी नाटकाशी संबंधीत मेला की ’... यांनी लवकरच एक्झीट घेतली’ असं म्हणतील. हा खुप मोठा विषय आहे, एकाचवेळी त्यावर लिहून संपणार नाही.

2 comments:

  1. भारी रे मित्रा,
    सहीच एकदम...विविध ठिकाणच्या भाषा आणि वाक्प्रचार जाणून घ्यायला खूप मस्त वाटतं! :)

    ReplyDelete
  2. माझ्या माहितीतले काही लोक मृत्यू पावण्याएवजी ऑफ होणे हा शब्दप्रयोग करतात.

    ReplyDelete

प्रतिक्रिया