Wednesday, October 27, 2010

३१. मला भेटलेली माणसं - भाग-१ - चोर

के.एम.टीच्या बसमध्ये तो चढला आणि माझ्या नजरेत लगेचच भरला.
खलीसारखा राकट चेहरा, कानावर घनदाट केस, डोक्यावरचेही केस घनदाट आणि तितकेच जाडजूड, हात हातोड्यासारखे असा तो आत येताच गर्दीतही लोकांनी त्याला वाट दिली पण तो सगळ्यांना ढकलीत ढकलीतच मागच्यादाराने चढला आणि पुढच्या दारापर्यंत गेला. काहीवेळ चूळबूळ करुन पुढच्याच स्टॉपवर उतरून गर्दीत नाहीसा झाला.
काही दिवसानंतर मी त्याला विसरण्याच्या जवळपास होतो तोपर्यंत तो पुन्हा मला दिसला. त्यादिवशीही त्याने तोच पट्यापट्याचा लाल ढगळ शर्ट घ्यातला होता. चढताना तो गर्दित तसाच मागच्यासारखा चढला पण आज त्यादिवशीइतकी गर्दी नव्हती. सर्वात पुढच्या सीटवर एक आजीबाई बसल्या होत्या जवळच्या सीटवर त्यांची बास्केट होती. ती बास्केट उचलून त्याने आजीबाईच्या हातात दिली आणि तो तेथे बसला. पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला कुणीतरी जुलुमाने बसविले आहे किंवा त्याच्या नको त्याठिकाणी बेंड आले आहे असेच वाटले असते. जेव्हा आजीबाई उतरू लागल्या तेव्हा तोही पाठोपाठ उतरला. बसल्यानंतर तो आजीबाईंकडे पाहत स्वत:शीच बोलल्यासारखा कांहीतरी बडबड करत होता त्यावरुन तो विक्षिप्त असावा असे मला वाटले.
नेहमी त्याच त्या मार्गावरुन प्रवास केल्यामुळे बसचे कंडक्टरलोक मला ओळखत होते. मी कंडक्टरला त्याच्याबद्दल विचारले तेव्हा मला शॉकच बसला. कंडक्टर म्हणाला तुम्हाला म्हणून सांगतो साहेब तो एक सराईत खिसेकापू आहे. त्याचे फोटो सगळ्या पोलीसस्टेशनमध्ये आहेत. मी कंडक्टरला विचारले मग तूम्ही त्याला बसमध्ये कसे काय घेता? त्याच्याबद्दल पोलीसांना का सांगत नाही? तर तो म्हणाला साहेब त्याचा काही उपयोग नाही पोलीसलोक त्याला घेउन जातात आणि तिस-या दिवशी हे महाशय पुन्हा बसमध्ये हजर असतात. आम्ही फक्त आमचे पैसे सांभाळतो.
एक दिवस हे महाशय बसमध्ये एकटेच गाणे गुणगुणत बसले होते. मी सरळ जाऊन त्याच्याशेजारी बसलो आणि त्याच्या मांडीवर थाप मारून त्याला विचारले," काय रे बरेच दिवस कुठे दिसला नाहीस, आत होतास काय?"
" नाही, जरा परगावी गेलो होतो."
" कुठं?"
" आषाढ वारीला, पंढरपूरला?"
" इतके दिवस?"
" तिथून तुळजापूरला, तिकडे दसरा सण मोठा असतो ना ! परवाच परत आलो"
त्याचे बोलणे खरे मानावे की खोटे हे माझ्या लक्षात येईना.
" का? सगळं करून भागलो आणि देवमार्गाला लागलो असं झालयं काय?"
" होय, जसा पांडूरंग तुम्हाला पावतो तसा आम्हालाबी पावतो" असं म्हणून तो हसू लागला.
त्यानंतर कंडक्टर आला व त्याने तिकीट विचारले तेव्हा त्याने आपला वनडे पास दाखविला. मला कंडक्टरने काही विचारले नाही पण तो एक मिस्कील हास्य करीत गेला ते त्याने कदाचीत पाहीले असेल. कारण त्याने मला नंतर विचारले," साहेब तुम्ही आता कुठे असता? बरेच दिवसांनी भेट झाली." मी त्याला सांगितले की मी आता ड्रेसात नसतो. " तरीच, नाहीतर आपली नजर आणि मेमरी एकदम फिट्ट आहे. एकदा मानसाला बघितले की त्याची कुंडलीच छापतो आपण. "
मी आश्चर्य वाटल्याचे दाखविन्यासाठी म्हणालो," म्हणजे, मी नाही समजलॊ?"
"साहेब तुमच्या पाकीटात आत्ता शंभराच्या पाच नोटा आहेत की नाही?"
खरेच माझ्या पाकीटात शंभराच्या पाच नोटा होत्या.
" पण मी बसमध्ये पाकीट उघडले नाही मग तुला कसे कळले?"
" थोड्यावेळापुर्वी तुम्ही पाचशेची मोड घेतली होती ना मी तिथेच होतो."
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
" आपला अभ्यासच आहे तसा साहेब, बरं एक शंभर रुपये द्या की कालपासून काय कमाई झाली नाही. सकाळपासून काय खाल्यालं पण नाही."
मला जरा हे वेगळंच प्रकरण वाटू लागले, अगदी कादंबरीतल्यासारखं. तो एकदम बिछडेहूये दोस्तासारखं बोलू लागला.
" बघा साहेब मी उपकार विसरनार नाही?"
" अरे मग, तुला पैश्याची काय कमी आहे, सध्या दिवाळी सुरु आहे लोकांच्याकडे पैसा आलाय, मग तुझी चांदीच झाली असेल, नाही का?"
" कसली चांदी आणि कसलं सोनं, हा उद्योग घाईगडबडीचा नाही साहेब, त्याला खुप दम लागतो. प्रत्तेक गोष्ट दमानं घ्यायला लागती. कुठं गडबड झाली की लोकांचा मार ठरेलेलाच असतो. म्हणून म्हणतो साहेब पन्नास तरी द्या."
मला काय करायचे समजेना. सरळ सरळ नाही म्हणणं म्हणजे केव्हातरी खिशाला भोक पडलेले दिसणार. मी त्याला शंभराची नोट आहे, सुट्टे नाहीत, असं सांगून टाळण्याच प्रयत्न केला पण त्याने शंभराची नोट घेउन आपल्याजवळचे पन्नास रुपये परत दिले. मग मी त्याला विचारले अरे मग तुझ्याकडे पन्नास होते की तेवढे पुरेसे नव्हते का? तेव्हा त्यानं सांगितलं ," साहेब पन्नास रुपयात नाश्तापाणी करायला मी काय हातगाडीवर जाणार नाही मी एसटी स्टॅंण्डवरच्या हॉटेलात जाऊनच नाश्ता करणार, कारण तिथूनच ब-याचवेळा माझी भवानी होते."
मी डोक्यावर हात मारुन घेतला. मी कधी त्या हॉटेलात जाऊन काही खाल्ल्याचे मला आठवत नाही, कारण ते खुपच महाग आहे आणि फक्त आडले नडले लोकच तिथे जातात. पण त्याचे लॉजीक बरोबर होते त्या हॉटेलात जाऊन टेहळणी करायला आणि सावज हेरायला खुप चांगली जागा होती.
लवकरच स्टॅण्ड आले आणि तो नेहमीच्या स्टाईलने उतरला, इतरांना ढकलत, शिव्या खात.
नंतर माझे मलाच सगळं आश्चर्य वाटू लागले. एक अट्टल चोर दिसतो काय, मी स्वत:हून त्याच्याजवळ जाऊन बसतो काय? तोही अगदी घरच्यासारखा माझ्याबरोबर बोलतो काय? सारेच अकल्पित. हा कसला चोर म्हणावा? जो मनात काहींच लपवत नाही. जणू आपल्या बायकोला किंवा मित्राला आपली गुपिते सांगावी तसे सगळे सांगून मोकळा.
त्यानंतर कागलचा उरुस सुरु होता, तेव्हा एक दिवस तो हायवेला थांबून कोल्हापूरला जाण्यासाठी लिफ्ट मागत होता. मी त्यादिवशी बाईकने कोल्हापूरला जात होतो. त्याला पाहून गाडी बाजूला घेतली आणि म्हटले, " काय रे, इथे काय करतोस?".
" पोटापाण्याचा उद्योग"
" चल, मी तुला कोल्हापूरात सोडतो"
" तुम्ही जावा साहेब, उगाच गरिबाच्या पोटावर पाय आणू नका, मी येईन दुस-या कोणाच्यातरी गाडीवरून." आणि पाठोपाठ येणा-या एका मध्यमवयीन काकाच्या गाडीवर बसला. मी मनातल्या मनात म्हटले ’बिचारा काका, काकाजवळ पेट्रोलपुरते तरी पैसे उरले म्हणजे बरे.’
अशी माणसं भेटतात. तिही अपवादानेच. कारण भेटतो म्हटलं तरी त्याला भेटता येत नाही. ही मस्त कलंदर मानसं आपल्याच राज्यात गुंग असतात आणि सुखीही. आपल्या उद्योगाबद्दल ना अहंकार ना पश्चाताप. पोटापाण्यापुरता पैसा मिळाला की खुष. त्यापेक्षा अधिक मिळावा अशी त्यांची इच्छा नाही, आणि अधिक पैसे मिळाले तरी त्याचे करायचे काय ? ना घर ना संसार.

5 comments:

  1. हा हा.. मस्त लिहिलंय.. आवड्या

    ReplyDelete
  2. मस्त

    ReplyDelete
  3. शेवटचा पॅरा अप्रतिम, बाकी पोस्ट मस्तच

    ReplyDelete
  4. झकास झालाय. म्हणजे चोर लोक सुद्धा इमानदार असतात तर. मस्त वाटलं वाचायला. तुमचं लेखण उत्तम आहे यात काही वाद नाहीच, पण विषय निवडायची कल्पकता पण अफलातून आहे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया