Monday, November 21, 2011

५२. मला भेटलेली माणसं - भाग ७ -आयब्या

आयब्या जर शाळेत गेला असता तर त्याचे हजेरीतले नाव किंवा कागदोपत्री नाव आयुब बाबालाल मनेर असे असते. पण आयब्या शाळेत गेला नाही आणि शाळाही त्याच्याकडे आली नाही.
पाणा-याच्या थडग्यातला पानारी जिवंत होता तेव्हा कधीतरी आयब्या आपल्या बापू बरोबर आमच्या गावात आला असावा. कारण आमच्या गावात मुसलमान असे नावालाच राहतात. चार पाच कुळं असतील त्यांची. ते सगळे एकदमच गावात उतरले असावेत. ठरवून केल्याप्रमाणे असे चारपाच मुसलमान कुळे आपल्याकडच्या गावात आढळतात. कोण बायकांच्या हातात काकणं भरायचं कासारकाम करतो तर कोण डोरली गाठवायचं अत्तारकाम करतो. अशाप्रकारचे किरकोळ वाटणा-या धंद्यामध्ये आपआपले कसब वापरुन मोठ-मोठे बंगले बांधले आहेत या लोकांनी.
पांढ-या कापडाच्या विजारी आणि त्यावर घालायचे तीन बट्नांचे शर्ट शिवणे हि आयब्याची स्पेशालीटी आहे. हिरवे, निळे, पिवळे धनगरी शर्ट, पांढरी पट्टी असणा-या, नाडीच्या, निळ्या, लाल रंगाच्या जाड कापडाच्या चडडया शिवणे हा त्याचा हातखंडा. लुगडेवाल्या बायकांच्या चोळ्य़ासुध्दा तो शिवून देत असे. आम्ही लहान असताना तो आमच्या शाळेच्या युनिफॉर्माचा शर्ट आणि खाकी चड्डीही शिवून द्यायचा. त्यासाठी लागणारे कापडही त्याच्याकडे मिळायचे.
हा झाला त्याचा एक व्यवसाय आणि त्याचा दुसरा व्यवसाय म्हणजे आपल्याकडे आलेल्या माणसांबरोबर गप्पा मारणे. त्याच्याकडे निरनिराळ्या कारणाने बाया-बापड्या किंवा बापए-लोक जमायचे. त्यांना तासनतास बसवून गोड गोड गप्पा मारण्याची कला त्याच्याकडे होती. या गप्पा ह्या नुसत्या गप्पा नसतात तर त्यातून कमाई कशी करायची हे त्याला चांगले माहीत होते. त्यामुळे त्याचा मुख्य व्यवसाय ह्या कमाईगप्पा मारणे हा आहे की कपडे शिवण्याचा हा प्रश्न पडतो. एखादा शेतीवाला आला आणि समजा त्याची शेती खडीच्या साईडला आहे. खडी म्हणजे नदीपासून थोडे लांब अंतरावरची शेते जिकडे अगोदर पाणी पोहोचले नव्हते. तर आयब्या म्हणणार, "काय बापूदा, तुझ्या खडीकडच्या शेतातल्या शेंगा. काय तेची चवच अलग हाय. गयेसाली तू दिलेल्या शेंगा खाऊन आमची अम्मी नुसती तेचीच याद करते बघ. इस साल शेंगा केल्या नाहीस काय तू?" मग काय समोरच्यानं वळखायचं आपला शर्ट पोरग्याच्या लग्नाच्या मुहुर्ताला पाहीजे असला तर घम्यालेभरून शेंगा त्या अम्मीच्या वट्यात आणुन टाकायला पाहीजेत.
 जर कुणाचे शेत नदीजवळ असले तर आयब्या म्हणणार " इससाल भाताचं पिक जोरात आलं. पावसानं लई झ्याक काम केल्यानं भातपिकाची बरकत झाली. मागच्यापेक्षा जास्तच पोती झाली असतील नाही? किती पोती झाली यावर्षी? ." अशी येणकेण प्रकारे आयब्याची वसूली सुरु असते. त्यामूळे शिवणावळीच्या रोकडीपेक्षा हेच उत्पन्न अधिक होत असे.
 बाहेरच्या माणसांशी अशा शुध्द मराठीत गप्पा मारणारा आयब्या भाभीबरोबर किंवा घरच्यांबरोबर त्याच्या टिपिकल मुसमानी भाषेत बोलायचा. अर्थात थोड्या सरावाने गल्लीतल्या सगळ्या लोकांना ही भाषा यायला लागली आहे. आयब्याची भाषा म्हणजे, "क्योंरे रडणेको क्या हुया? ऑं?" , यावरचे उत्तर- " हमरे परडेमें शेरडी वरड्या मै देखनेको भाग्याभाग्या गया वाटमें पड्या तो गुडघेको खरचट्या, और रोच पड्या." अशा प्रकारची त्याची ही भाषा शिकून गल्लीतले कोणतरी भाभीला विचारतो," क्यों भाभी, जेवीश क्या नई?" म्हणजे जेवलीस का? असं विचारायचे असतं. याचं उत्तर मात्र " आम्ही जेवलो नाही अजून, बापू तूम्ही जेवला का नाही?" असं येतं.
 कापडं शिवतानं गप्पा मारत बसल्यामुळं कधी कधी त्याचं काम आवरायचं नाही. मग रात्री जागून तो आपल्या मशीनला पळवत बसे. त्यात तो इतका तल्लीन व्हायचा की सकाळ झालेली पण त्याला कळायचे नाही. एखाद्याच्या गुळ, शेंगा पोहोचत्या झाल्या असतील तर त्याची शर्ट-विजार वेळेवर द्यायला तो रात्रभर काम करत असे. एकदा म्हणे एक चोर त्याच्य़ा खोलीत आला. चोराला खरंतर त्याच्या शेजा-याच्या घरात उतरायचे असावे पण खाप-यांचा अंदाज चूकून तो आयब्याच्या घरात उतरला. आयब्या आपल्या मशिनवर, आजूबाजूला कापडाचे तुकडे पडलेले आणि चोर त्याच्या मागे कोप-यात बसलेला. आता चोराची पंचाईत झाली, बाहेर जायचे कसे? चोराने ठरविले असावे की हा जेव्हा काम संपवून झोपेल त्यावेळी निघून जावे. मग चोर कोप-यातच बसून वाट पाहू लागला. पण आयब्याला आत्ताच जोर चढला होता त्यामुळं तो मशीनला सुट्टी देत नव्हता. असं एकाच जागी गप्प बसून चोराला झोप आवरेना. चोरानं तिथच ताणून दिली. पहाट झाली तशी डेअरीचा भोगा वाजला. आयब्याची बायको गाईंला वैरण टाकायला उठली. कोप-यात बांधलेल्या शेळ्यांनी कालवा केला. तशी चोराला जाग आली. आजून आयब्या मशीनला भिडलेलाच होता, चोरानं डोक्यावर हात मारला आणि डोळे चोळीत आधीच उघडलेल्या मागच्या दाराने बाहेर पडला. चोराला हात हालवत घरला जायची पाळी आली. चोर ज्या कोप-यात लपून बसला होता तिथच दहापंधरा किल्ल्यांचा जूडगा पडलेला सापडला. पुढे गावात कुणाची किल्ली हरवली की यातली किल्ली वापरली जाऊ लागली.
 मुसलमान असला तरी आयब्याच्या दारात गुढीची काठी उभी असायची आणि सणासुदीच्यावेळी त्याच्या घरातून पोळ्यांचा वासही दरवळत असे. दस-याचे सोने असो वा तिळगूळ त्याला कशाचे वावडे नव्हते. हे सगळे हिंदू सण सोडून ईद सुध्दा त्याच्याकडे जोरात साजरी व्हायची. ईदची खीर "शिरखुर्मा" सगळ्या गल्लीला खायला मिळायची. आयब्या गल्लीचा अविभाज्य भागच झाला होता.
आयब्या, त्याचा कबीला, दोन-तीन गाई, एक-दोन शेळ्या आणि कोंबड्या गल्लीची अमानत होती. त्यातच आणखी एक भर म्हणजे "येशा". आपल्या दुस-या पोरीचे लग्न झाल्यावर त्यानं एक कुत्रे पाळलं होते त्याचं नाव ’येशा’. या येशावर त्याचा जीव होता. तो जाईल तिकडं हा कुत्रा त्याच्या सोबत फिरत असे. तो मशिनवर असला की हा कुत्रा मग दारात बसून येणाजाणा-यांवर नजर ठेऊन असे. मशीनवर पाय मारता मारता आयब्या येशाबरोबर बोलत असे. शहानपणा शिकवत असे. लोकांबरोबर कसे वागावे याचे पाठ येशाला शिकवत बसे. येशाने कोणाला उगाच घुरघुरावे मग आयब्याने त्याला,"येशा, क्योंरे?, कौन आया रे?" असे विचारावे मग आलेल्याने आपणच सांगावे," आयब्या, मी हाय रे." " मग ये कि गा, आत" "तुझ्या रखवालदाराला बाजूला कर अगोदर". असा संवाद झाला की आयब्या खुष होऊन आलेल्याला आपल्या कुत्र्याची ओळख करुन देत असे.
 किती झाले तरी ते गावठी कुत्रे होते. कुणाला गुरगुरेल तर कुणाबरोबर खेळत बसेल याचा नेम नाही. कोणी बोलावले की शेपूट हालवत जात असे. त्याला बघून भिण्यासारखेपण कांही नव्हते. त्यामुळे येशा सगळ्या गावाच्या ओळखीचा झाला होता.
 त्या वर्षी ईदला आयब्या खुप खुषीत होता. गेल्यावर्षीच त्याच्या दुस-या पोरगीचे लग्न झाले होते. दोन्ही पोरी त्यांची पोरं अशी सगळे यावर्षी ईदला त्याच्या घरी जमले होते. आयब्यानं यावर्षी ईदसाठी सगळ्यांना नवी कापडं केली.
 आयब्या स्वत:चीच कापडं शिवण्यात मग्न झाला तेव्हा लोक त्याला म्हणू लागले " आयब्या ईदला तू नवी कापडं घालून मिरिवणार आणि येशाचं काय रे? त्याला कापडं केलीस काय नाही?" यावर एक दोघं फिदी फिदी हसून गेली.
 बोलणारा बोलून गेला पण आयब्याला गप्प बसवेना. आयब्यानं सगळ्याची कापडं बाजूला ठेवली आणि कुत्र्यासाठी कापडं शिवली. चीटाचीटाचा शर्ट आणि लाल पांढरी पट्यापट्याची विजार. विजारीला नाडी आणि शर्टाला बटणे. अगदी येशाची मापे घेऊन ड्रेस तयार केला तेव्हा त्याला बरे वाटले.
 ईदचा दिवस उगवला तसा आयब्याला आनंद झाला. आपल्या घरच्यांबरोबर येशालाही कपडे घालून कधी एकदा गल्लीतल्या लोकांना दाखवितो असे त्याला झाले होते. सगळ्यांनी आपआपली कपडे घातली, मोठ्या लोकांनी चिल्ल्यापिल्ल्यांना कपडे चढविली. चिल्ल्यापिल्ल्यांनी येशाला कपडे चढवीली. सुरवातीला अवघडलेला येशा थोड्यावेळाने त्या कपड्य़ांना सरावला. कपडे पण एकदम मापात जमलेली होती. पुढचे पाय शर्टाच्या हातूप्यातून बाहेर आले होते तर मागचे पाय विजारीतून. शेपटीला बाहेर यायलाही जागा ठेवलेली होती.
एकूण काय येशा एकदम ऐटबाज दिसू लागला होता. चालताना तर काय त्याचा रुबाब, व्वा. येशा जसा बाहेर पडला तसा लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
एक एक करत सगळ्यांना समजले. कपडे घातलेल्या येशाला बघायला खालच्या वरच्या गल्लीतल्या पोरांनी गर्दी केली. मोठी लोकं आयब्याला शाब्बासकी देत होती. येशातर सर्कशीतल्या प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे ऐटीत फिरत होता. आयब्या तर त्याची दृष्ट काढावी काय याचा विचार करत होता. कोण म्हणत होतं की येशाचा फोटो काढून पेपरात देऊया. कोण म्हणत होते की नको सर्कसवाले येऊन येशाला घेऊन जाणार. कोणाचे काय तर कोणाचे काय.
 ही सर्कस अशीच दिवसभर सुरु राहणार असे वाटत असतानाच येशाचा मूड बदलल्यासारखा वाटला. तो एकदम इकडे तिकडे धावू लागला. येशा पळू लागला की पोरं त्याच्या मागून पळू लागली. गल्लीत एकदम गोंधळ सुरु झाला. त्याला एकदम काय झाले हे कोणालाच कळेना.
आयब्यानं त्याला येशा येशा हाका मारल्या पण येशा ऐकायच्या स्थितीत नव्हता. आयब्याला वाटलं येशाला दॄष्ट लागली. नाहीतर त्याला लागीर झाला असेल. काय गोंडस दिसाय लागलाय तो आज. एकदमच असे काय झाले कळेना. येशानं गल्लीतच तीनचार फे-या मारल्या आणि मग गल्ली सोडून चौकात आला.
पोरं गिल्ला करुन येशाला काय सुचू देत नव्हती.
 येशा धावत जाऊन एका झुडपात घुसला पोरं त्याच्या पाठीमागून धाऊ लागली.
येशानं झुडपात घासाघिस करुन सगळी कापडं फाडून टाकली आणि पुन्हा जोरात पळत सुटला गावाच्या बाहेर.
 आयब्याला काळजी वाटू लागली तोही धावत सुटला. पण येशा तोवर खुप लांब गेला होता.
पोरं मागे पडली तसा येशा थांबला.
जरा इकडे तिकडे घुटमळला आणि टराटरा हागला.
शांत झाला.
मग कांहीच न झाल्या सारखं परत घराकडे येऊ लागला.
 वाटेत आयब्या दिसल्यावर त्याच्या पायाजवळ जाऊन घुटमळू लागला. आयब्या म्हणाला," खुदान खास्ता, आल्लानू वास्ता. मुझे छोडके कहां गया था? फिरसे ऐसे करोगे तो मै तुमसे बात नही करुंगा, ऑं"
 इकडे ही बातमी भाभीला समजली तेव्हा तीही काळजीत पडली होती.
आयब्या आणि येशा घराकडं येतानं बघुन तिचा जीव भांड्यात पडला. " या अल्ला" असं म्हणून तिनं दोघांच्यावरून मिठ-मिरच्या ओवाळुन टाकल्या.
 पुढे कांही दिवसांनी येशा कुठे गेला ते कोणालाच कळले नाही.
तेव्हापासून मात्र आयब्याने दुसरे कुत्रे पाळले नाही. येशाचा फोटॊ काढायचा राहून गेला याचे त्याला राहून राहून वाईट वाटते.
 आता फक्त आयब्या आणि त्याचे मशिन दोघे एक-मेकांशी बोलतात.
 बेंदराच्या बैलांना झुली घातलेल्या पाहून आम्हाला एकापेक्षा एक फक्कड झुली शिवणारा आयब्याची आणि आयब्याला येशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

3 comments:

प्रतिक्रिया