आपण रोजच्या जीवनात पाहतो की प्रत्तेकजन दुस-याला काही ना काही उपदेश देतच असतो.
यापैकी एकतरी सुचना-उपदेश ऐकल्याशिवाय आपला दिवसच संपत नाही.
पहाटे लवकर उठून थोडातरी व्यायाम करावा, निदान चार सुर्यनमस्कार तरी घालावेत.
मांसाहार वर्जच करावा किंवा टाळलेलाच बरा.
दारु, सिगारेट, तंबाखु इ पासुन दुरच रहावे.
दातात काडी घालू नये.
गाडी सावकाश चालवावी.
बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.
सारखा टिव्ही पाहू नये.
इत्यादी इत्यादी.
या सर्व सुचना आपण पुर्वी ऐकलेल्या असतातच पण आपण प्रयत्न करुनही नेहमी त्या पाळु शकत नाही.
उपदेश करणा-याचे काम सोपे असते ते म्हणजे फक्त उपदेश करायचा. तो स्वत: अमलात कितपत आणतो हे कोण लक्षात घेत नाही.
पहाटे लवकर उठावे असा सल्ला देणारे स्वत: ८ वाजता उठत असतात किंवा पहाटे उठून दुस-याच्या साखरझोपेचे खोबरे करतात व दुपारी तासभर मस्त ताणुन देतात.
तात्पर्य काय उपदेश करणा-याची जबाबदारी ही उपदेश करण्यापुर्तीच मर्यादीत असुन, उपदेश पाळणे हे कोणावरच बंधनकारक नसते.
सिगारेट किवा गुटख्याच्या व्यसनाप्रमाणे उपदेश देणे हे काही उपदेश करणा-यांचे एक व्यसनच बनलेले असते. त्यांना उपदेश केल्याशिवाय चैनच पडत नाही.
आमच्या एका सरांच्या घराचे काम चालू होते. सरांना उपदेश देण्याचे सरकारी परमीट अगोदर होतेच पण स्वत:च्या घराचेच काम सुरु असल्यामुळे हक्काचे साधनच उपलब्ध झाले होते. कामावरचे गवंडी बिचारे त्यांच्या ताब्यात सापडले.
ते अगदी वर्गावर येण्याचे चुकवून त्या आपल्या नव्या शिष्यांना शिकवू लागले. ही वीट चांगली , ती नाही. ती वीट तिथे बसवा ही वीट इथे बसवा. असं त्यांना अगदी वीट येईतो उपदेश केला.
ते शिष्य या शिकवणीमुळे बिथरुन गेले काही दिवसांनी त्यांनी काम तिथेच ठेउन या शाळेला दांडीच मारली. मग सरांचे डोळे उघडले.
पंधरावीस दिवसांनी त्या गवड्यापैकी एकजन सरांना भेटला. तेव्हा त्याने सरांना म्हणाला "सर, तुम्हाला इतकी सगळी माहीती आहे तर मग तुम्ही स्वत:च का ते घर बांधत नाही?" सरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तात्पर्य काय ज्याचे काम त्यानेच करावे. प्रत्तेकजन आपपल्यापरीने विचार करतच असतो व काळजीही घेत असतो.
दुसरे व्यसन एखादेवेळेस सुटेल पण उपदेश देण्याचे व्यसन कधीही सुटत नाही. दुस-या व्यसनाच्या बाबतीत व्यसनी मानसाच्या मनामध्ये एक कमीपणा किंवा पश्चातापाची किंवा चुकलेपणाची भावना असते पण उपदेश करणारा हा उपदेश करणे हे स्वत:चे कर्तव्य व हक्कच समजत असतो. त्याबद्दल त्याच्या मनात कोठेही शंका उत्पन्न होत नाही.
ओशोंनी याचसंबंधाने एक चुटका सांगितला होता.
एका शहरात कुत्र्य़ांची संख्या खुप असते आणि या वाढलेल्या संखेमुळे आता त्या कुत्र्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत असे. कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणे होत असत. एका गल्लीतील कुत्री एकत्र येउन दुस-या गल्लीतील कुत्रांच्याबरोबर भांडत असत. ही भांडणे सॊडवण्यासाठी एक दादाही त्यांच्यामध्ये असतो. हा दादाकुत्रा वयाने जेष्ठ व ताकदवान तसेच नितीवान असतो. तो कधीही कुठल्या कुत्रीमागे फिरताना कुणी पाहीला नाही. तो आजीवन ब्रम्हचारी आहे असं म्हणतात. तो मेलेली जनावरे पण खात नाही. असा हा कुत्रा म्हणजे एक आदर्श संतच होता. तो नेहमी चौकात उभा राहून बाकीच्या कुत्र्यांना ज्ञान, अध्यात्म इ. विषयावर काही ना कांही भाषण देत असे. हे भाषण मुख्यत: रात्रीचे असावयाचे आणि या अध्यात्मिक भाषणाचा तिथे राहणा-या इतर नास्तिक मनुष्यवर्गास खुप त्रास होत असे. कधी कधी हा त्रास वाढत गेल्यामुळे तेथिल लोकांनी या अध्यात्मीक कार्यात विघ्नेही आणली.
कालांतराने या दादाकुत्र्याचा शिष्यवर्गही वाढू लागला. ते शिष्यही मग आपआपल्या चौकात उभा राहून हे आध्यात्मिक कार्य करु लागले. त्यांच्या प्रवचनांमध्ये नेहमी ब्रम्हचर्य, ध्यान, नैतिकता इ. गोष्टींचा पुरस्कार असे. इतर कुत्री हे प्रवचन मन लावून एकत असत तसेच त्याला दाद देता देता स्वत:ही त्या कार्यात सामील होत असत.
आतातर कुत्र्यांच्या या सामुहीक अध्यात्मिक क्रांतीचा त्या सबंध शहराला त्रास जाणवू लागला.
संध्याकाळ होताच एखाद्या चौकातून कुत्र्याचे ओरडणे सुरु होई पाठोपाठ सर्वच चौकातून त्याला अनुमोदन मिळायला सुरु होई. सर्व शहरच या कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे दणाणुन जात असे.
सर्वत्र वाढत जाणा-या या प्रवचनकार व अनुयायांच्यामुळे होणारा गोंगाट आता दादाकुत्र्यालाही असहनीय झाला. या अशा सिच्युएशनमध्ये हे असेच सुरु राहणे पुर्ण कुत्रासमाजाच्या उन्नतीस अडचणीचे ठरणार आहे हे फक्त दादाकुत्र्याच्या ध्यानात आले.त्याने ताबडतोब एक सभा बोलाविली व सभेत एक ठराव केला जो सर्व कुत्र्यांना बंधनकारक होता. त्या ठरावानुसार कोणत्याही कुत्र्याला रात्री सात वाजल्यानंतर ओरडता येणार नव्हते. ठराव पास झाला कारण सभा भर दुपारी घेण्याते आली होती. पण संध्याकाळ होताच सर्वांची पंचाईत झाली. सात वाजताच चूळबूळ वाढू लागली.
प्रत्तेक कुत्र्याला ऒरडावेसे वाटू लागले पण ठरावामुळे व दादाकुत्र्याच्या दहशतीमुळे सर्वजन गप्प होते. जणू रात्रीचे ओरडणे म्हणजे अधार्मिक कृत्यच होते, नीतीमत्तेला सोडून होते. इतक्यात कुठुनतरी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याला कोणीतरी साथ दिली आणि पाठोपाठ सर्व कुत्री पुन्हा भुंकू लागली. ओरडण्यामुळे सारे शहर गोंगाटाने भरुन गेले.
दुस-या दिवशी त्या पहिल्यांदा ओरडणा-या कुत्र्याला पकडून पाच दिवस न खाजवता चौकात बसुन राहण्याची जाहीर शिक्षा देण्यात आली. त्यामुळे सर्व कुत्र्यांनी पुन्हा न ओरडण्याचे गांभिर्याने ठरवले.
दिवसभर काही नाही झाले तरी संध्याकाळ होताच सर्व कुत्र्यांना आपल्या घशात कांहीतरी अडकल्याची भावना व्हायची. काही झाले तरी ओरडावेच असे वाटायचे.
दुस-या दिवशीही रात्र होताच पुन्हा येरे माझ्या मागल्या असेच झाले. एक कुत्रा भुंकला पाठोपाठ सर्वजण ओरडू लागले. तिस-या दिवशीही काही कुत्र्यांना अगोदरपेक्षाही जबर शिक्षा सुनावण्यात आल्या. दादाकुत्र्याने पुन्हा सगळ्यांना आपल्या आधिकारवाणीने धमकविले व चार नीतीच्या गोष्टी सांगितल्या.
तिस-यादिवशी संध्याकाळी सर्व कुत्र्यांनी तोंडाला कुलुपच लावले. रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी कुठुनही आवाज आला नाही. प्रत्तेक कुत्र्याला खवखवू लागले, काही करुन ओरडावे असे वाटू लागले. पण शिक्षा खुपच कडक व नितीच्या विरुध्द जाउन ओरडण्याचे धाडस कोणाला होईना. रात्रीचे अकरा वाजले तसे सर्वच कुत्र्यांची पंचाईत झाली अगदी दादा कुत्र्याचीपण. कारण आतापर्यंत इतर कुत्र्यांच्या गोंगाट सुरु होताच हा दादाही अंधाराच फायदा घेउन आपला घसा साफ करुन घेत असे. आज सर्वात जास्त त्याचीच पंचाईत झाली कारण प्रवचन देणे उपदेश करणे ही त्याची सर्वात जुनी सवय होती. आणि कुत्रा हा सवयीचा गुलाम असतो. फार वेळ त्याला कढ निघाला नाही शेवटी अंधारात जाऊन त्या दादा कुत्र्यानेच पहीली आरोळी ठोकली. पाठोपाठ त्याचे अनुयाई भुंकू लागले पुन्हा शहर दुमदुमु लागले. मगच सर्व कुत्र्यांना समाधान वाटले.
कुत्रा आणि भुंकत नाही म्हणजे काय? दिवसाचे ठीक पण रात्री ? केवळ अशक्य "कुत्ता है तो भोकेगा जरुर !"
त्याच प्रमाणे या उपदेशपर प्रवचन देणा-यांचे आहे. दिसला मानुस की दे प्रवचन. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई एकच परमेश्वर आहे असे प्रवचन देणारा कोणता प्रवचनकार कासवछाप मच्छर अगरबत्ती वापरत नाही? भुंकणारा कुत्रा दिसताच कोण दगड हातात घेत नाही?
तात्पर्य काय तर " आदमी अगर कुत्ता है तो भोकेगा जरुर!"
आपण मनुष्य आहोत तर मानवाप्रमाणेच वागणार. चूका करणार, खोटे बोलणार, आळस करणार, कामे टाळणार इ. इ.
मला वाटते प्रत्तेकाने मशिनप्रमाने अचूक सरळ रेषेत राहण्यापेक्षा स्वाभाविकपणे वागावे जे जास्त जिवंतपणाचे लक्षण आहे. कधी थोडा आळस करावा कधी लवकर उठुन व्यायाम करावा. कधी भर रस्त्यावरुन गाडी सुसाट सोडावी कधी सिगारेटी मागून सिगारेट ओढाव्यात तर कधी तमाश्याला जाऊन दंगा करावा. भडक कपडे घालावेत तर कधी धोतर नेसावे.
नाहीतर मग संदीप खरेंच्या कवितेसारखे म्हणावे लागेल, "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेधसुध्दा साधा कधी नोंदवलेला नाही. .... मी मनातसुध्दा माझ्या कधी दंगा केला नाही. "
आयुष्य़ संपुन जाईल आणि मग जगायचेच राहून जाईल.
हा पण एकप्रकारचा उपदेशच झाला, माफ करा.
आज इतकेच . . .
SUPARB !
ReplyDelete