Wednesday, September 01, 2010

१८. हरीची इच्छा

वि.स. खांडेकरांची "अमॄतवलय" वाचून मला आता कमीतकमी पंधरा वर्षे झाली असतील.
कादंबरीत सुरवातीलाच एका नवयुवकाचा अपघाती मृत्यू होतो. जो एका विमानाचा वैमानिक असतो . त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न ठरलेले असते जिच्यावर त्याचे खुप प्रेम असते. तो एका आईचा एकुलता एक पुत्र असतो.
ही आई एक देवभोळी साधी स्त्री असते. तिला संसारापलिकडचे कांही माहीत नसते. आपले लहानसे कुटूंब हेच तीचे जग असते. आणि त्यापलिकडे राहीलेले असेल ते म्हणजे तुळशीवृंदावनात रमणारा तो तीचा श्रीकृष्ण परमात्मा ज्याला ती " हरी" असे संबोधत असे.
तीला ही हृदयद्रावक घटना कोण व कशी सांगणार हा प्रश्न घरातील प्रत्तेकाला पडलेला असतो. आपल्या एकुलत्या मुलाच्या लग्नाच्या स्वप्नात ती रममान आहे तीला त्याच मुलाच्या मॄत्यूची बातमी कशी सांगणार?
पण जेव्हा तीला ही घटना समजली तेव्हा ती फक्त इतकेच म्हणाली," हरीची इच्छा".

त्या दोनच शब्दांनी तीच्यावरच्या दु:खाची लाट परतावून लावली. रडणे नाही की किंचाळणे नाही. "नहीं, ये नही हो सकता" हा फिल्मी डायलाग नाही. फक्त दोनच शब्द आणि बात खल्लास.
काय त्या दोन शब्दांची ताकत असेल.
ताकत त्या शब्दात नाही.
ताकत आहे त्यामागच्या व्यक्तीच्या भावनेची,
श्रध्देची.

परमेश्वरावरील अतुट श्रध्दाच असे असहनीय दु:ख सहन करण्यास बळ देते. जे काय होते ते त्याच्याच इच्छेने यावर ज्याची श्रध्दा असेल तो उगाच रडत विव्हळत बसणार नाही. आणि जो जीवनातील साधारण गोष्टीसाठी नशिबाला व इतरांना दोष देतो, परमेश्वराला दोष देतो, तो कसला भक्त?.

मी तर म्हणेन ज्याला पावसाळ्यात पाऊस व उन्हाळ्यात ऊन आवडत नाही तोही भक्त नाही. भक्त तोच जो स्वाभाविकपणे जगतो जे काही मिळेल त्याबद्दल त्याच्या मनात परमेश्वराबद्दल आभारच उत्पन्न होईल. त्यालाच श्रध्दा असे म्हणायला हवे.

श्रध्दा काय असते म्हणून कोणी विचारले तर मी हीच घटना त्याला सांगेन.

(अजूनतरी कोणी मला विचारलेले नाही. कदाचीत श्रध्दा हा विषय दुर्मिळ बनत आहे)

1 comment:

  1. खुप छान. आता पुन्हा एकदा अमृतवलय वाचायला पाहीजे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया