Sunday, September 05, 2010

२०. एकेकाचे छंद

इयत्ता तिसरीपासून आम्हाला क्रिकेटचा नाद लागला.
तेव्हा आम्हाला मानकापुरेगुरुजी शिकवत होते. होय आम्ही गुरुजींना गुरुजी ब बाईंना बाई असेच म्हणत असू. आजकाल प्राथमिक शाळेतील शिक्षक स्वत:ला ’सर”मॅडम’ असे म्हणवून घेतात. (आता डि.एड. इयत्ता बारावीनंतर झाले आहे व खर्चही खुप होतो)
आमच्या गुरुजींना क्रिकेटचा खुप नाद होता आणि रेडिओवर क्रिकेटचे समालोचन ऐकणे हा त्यांचा छंद होता. आमच्या घरात जुना डर्बी कंपनीचा रेडिओ होता. ( कंपनीचे नाव मला इयत्ता सहावी किंवा सातवीत आल्यावर वाचायला आले आणि तोपर्यंत रेडीओ उत्तम स्थितीत कार्यरत होता) आमचे घर शाळेपासून जवळ होते, त्यामुळे गुरुजी मला कधीकधी घरुन रेडीओ आणायला लावत असत. रेडिओ कानाला लावून ते त्यावरील गोंगाटाने भरलेले समालोचन ऐकत असत. वेंगस्कर (की वेंगसरकर) व मोहिंदर अमरनाथ नुकतेच खेळपट्टीवर थोडे स्थिरावले असून ते पाहून्या संघाच्या गोलंदाजीचा मुकाबला खुपच चांगल्यारितीने करत आहेत. आणि हा चेंडू डाव्या यस्टीपासून थोडा दुर जाणारा त्याला फटकाविले आहे ते गली आणि स्लिपच्या मधून, आणि भारताच्या खात्यावर जमा होत आहेत त्या दोन धावा. अशाप्रकारचे समालोचन आम्हालाही कधीकधी ऐकायला येत असे. एका कानाला रेडिओ लावून गुरुजी आम्हाला बे एक्के बे इत्यादी पाठ करुन घेत.
काही वेळेला ते उमेशला व मला पोष्टात पाठवत असत. सोबत एक चिठ्ठी देत बहुदा कोरीच असायची व ती पोष्टमास्तरांना देण्याविषयी सांगितलेले असायचे.
पोष्टमास्तर नेहमी कामात असायचे त्यामुळे ती चिठ्ठी आम्ही त्यांच्याकडे देवून जवळच त्यांच्या घरी टिव्हीवर क्रिकेटची मॅच पाहत असू. ब-याच वेळाने त्यांना जेव्हा वेळ मिळेल किंवा आठवन होईल तेव्हा ते त्या चिठ्ठीवर काहीबाही लिहून देत व ते घेवून आम्ही शाळेत परतत असू. दरम्यान आमच्या क्रिकेटच्या ज्ञानात व वेडात थोडी थोडी भर पडलेली असायची. त्या चिठ्ठीवर लिहीलेला मजकूर म्हणजे क्रिकेटचा स्कोअर असायचा हे आम्हास उशीरा कळाले.
त्यावेळी आजच्यासारखे कोणी शाळेसाठी टिव्ही घेवून दिला नाही ना रेडीओ. त्यामुळे त्यांना आपली आवड व हौस अशीच पुरवावी लागायची. तेव्हा हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करुन शाळाबाह्य भेटी वा केंद्रशाळेकडे जातॊ अशी कारणे सांगून शाळेला दांडी मारण्याची पध्दतच नव्हती. तेव्हाचे शिक्षक बाहेर कमी व शाळेतच जास्त भेटत असत. रविवारीसुध्दा आम्ही शाळेजवळ खेळायला भ्यायचो कारण कोणते ना कोणते गुरुजी शाळेकडे येऊन जात असत. बहुदा त्यांना शाळेशिवाय करमतच नसावे. असे गुरुजी आणि असा त्यांचा छंद.
आमच्या या क्रिकेटवेडाला आनखी पाठबळ दिले ते चौथीत शिकवायला आलेल्या बाईंनी. मुळात आमच्या आवडत्या मानकापुरे गुरुजींची बदली होऊन त्याजागी आल्यामुळे त्या आम्हाला सुरवातीस आवडत नसत. या बाईंचे मला व उमेशला दर चारआठ दिवसांनी एक ठरलेले काम असायचे. गावात जावून सोनार आहे का ते पाहणे. आम्ही हे काम घेउन शाळेतून बाहेर पडायचो आणि थेट ग्रामपंचायतीच्या टिव्हीसमोर पोहोचत असू. त्यामुळे आमचे क्रिकेटविषयी प्रेम आनखी वृध्दिंगत झाले. बाईंनी सांगीतलेल्या सोनाराचे नाव आता मला आठवत नाही आणि त्यावेळीही शेवटपर्यंत आम्ही त्याचे घर शोधन्याची उठाठेव केली नाही. आम्हाला वर्गात अभ्यास करायला सांगून बाई स्वत: सोनाराकडे गेल्या नाहीत, त्यामूळे बाईंची सोने खरेदी राहून गेली असावी.
सोने सोनार यापेक्षा पॅट्रीक पॅटरसन, रिचर्डसन, बून, जोन्स, हूपर, गावस्कर, किरन मोरे, गुंडाप्पा विश्वनाथ, गॅटींग, गुच्छ, इम्रान खान यांच्यातच आम्हाला खरा रस होता.
आम्हाला सोनाराच्या घरपेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रस होता आणि बाईंनापण सोने खरेदीपेक्षा शाळेतील उपस्थीती व शिकवणे यातच जास्त रस होता.
अशा बाई आणि अशी त्यांची आवड.

1 comment:

  1. प्रदीप, तुमच्या बाईंना आणि गुरुजींना सलाम. खरंतर आपली आवड निवड, छंद थोडे बाजूला ठेऊन नेमून दिलेले काम आणि कार्य वठविणे कधीही स्वागतार्हच आहे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया