Thursday, September 09, 2010

२२. बोलण्याच्या त-हा

एकेकाची बोलन्याची स्वत:ची अशी खास स्टाईल असते.
त्यांची स्टाईल त्यांना शोभतेही. आपण त्याची स्टाईल वापरु शकत नाही. ती एका दिवसात आत्मसातही होत नाही त्याला वर्षानुवर्षे सराव असावा लागतो.
आमच्या गल्लीत राहणारा आबा कधीही आपले गाव सोडून बाहेर गेला नाही. तरुणपणात त्याच्या बैलाने त्याच्या एका पायाच्या मांडीत शिंग घुसविले होते त्यामुळे त्याला आता कुबडीशिवाय चालताही येत नसे. पण "तुम्हाला सांगतो" अशी सुरवात करत आबाची गाडी दाबात सुटत असे. आबाची गाडी एकदा सुटली म्हणजे गल्लीतून दिल्लीपर्यंत धावत असे. कधी कधी ती जार्ज बुश यांच्या इराक धोरणापर्यंत जाऊन पोहोचत असे. दररोज नियमाने वर्तमानवर चर्चा आणि चौकात, पारकट्यावर उठबस या आपल्या अभ्यासावर आबाच्या बाता रंगत असत. आजूबाजूला कोण बसले की आबाची टकळी सुरु. कधीकधी त्या इतक्या रंगत की आजूबाजूला बसलेले लोक आपली कामं विसरुन तिथेच बसून राहत असत. पण त्यामध्ये नेहमीचे लोक असले की ते कधी उठून गेलेले आबाला कळतच नसे. त्याचे आपले "तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो" सुरुच असायचे. एकदा तर आबा म्हणाला," तुम्हाला सांगतो, तेव्हा आम्ही जहाजावर कामाला होतो." " कधी, कॊणत्या हे प्रश्न विचारणे चुकीचेच होते पण तरी पण एकाने विचारलेच तर आबा म्हणाला," तेव्हा तुम्ही लहान हुतासा. जहाज वाटंत बंद पडले की ते ढकलायचं काम आम्ही करीत हुतो. तेव्हा जहाजावर लय मजा केली." आबानं त्याच्या कारकिर्दीत गावातील ९५१८ नंबरची सारखी बंद पडणारी गाडी पाहीली होती त्यावरून त्याने ही कथा जोडून पुढे सांगायला सुरु केलेली असायची.
गावातील आनखी एक आसामी दौलती पाटील. हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत व त्यांची तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला (त्यांच्या शब्दात) दिवसाला डेली येजा असते. कधी बाजाराच्या निमित्ताने तर कधी इतर कारणाने ते नेहमी बिझी असतात व त्यांची आसपासच्या पंचक्रोशीतील गावात बरीच ओळखपाळख आहेत. कार्यालयीन कामे असोत लाईटबोर्डतील कामे असोत ते पुढे होऊन ही कामे लोकांना करुन देतात. या त्यांच्या बिझी दैनंदिनीमुळे त्यांच्या वापरात बरेच विंग्रजी शब्द आले होते व त्यांनी त्या शब्दांना आपल्या पध्दतीने आपल्या बोलण्यात समाविष्ट केले होते. त्यांचे बोलणे आधीच आघळपघळ त्यात या विंग्रजी शब्दांचा भरणा त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकणारावर छाप पाडायचे.
एकदा त्यांनी एकेठीकाणी ऐकले ते वाक्य बहुदा असे असावे " त्या अमक्यातमक्याला काही ’सेंन्स’च नाही." त्यातील सेंन्स हा शब्द दौलतीकाकांना खुप भावला व तो त्यांनी उचलला. त्याच्या अर्थापर्यंत जाण्याची तसदी काकानी घेतली नाही. त्यांनी आपल्या परीने त्या शब्दाला न्याय दिला. " काय काका कुठे बाजारात गेलता काय?" या प्रश्नाला काकांचे मार्मिक उत्तर मिळत असे," काय तेच्या आयला त्या बाजाराच्या ! आजकाल बाजारात काय "सेक्स"च राहीला नाही." काकाने सेन्स हा शब्द सेक्स असा घेतला होता. पुढे लग्नातून परतल्यावर काका म्हणे," काय त्या नवरी म्हनना-या पोरगीला सेक्सच नाही." खरतर त्यांना "सेन्स" हा शब्द लक्षात राहीला नाही आणि जो शब्द लक्षात राहीला तो "सेक्स" त्याचा अर्थही काकांच्यापर्यंत पोहोचला नाही. मग काकानी सेक्स हा शब्द ब-याच विशेषनांसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरायला सुरवात केली. राजकारनाला सेक्स नाही, बायकोला सेक्स नाही, धंद्याला सेक्स नाही इ. इ. बरे काकांना हे चुकतय हे सांगण्याची सोय नाही. सांगणा-याच्या बाचं बारसं काकांनी जेवलेलं असते. या काकाला बोलन्याचा काय सेन्सच राहीला नाही.

2 comments:

  1. प्रिय प्रदीप,
    मस्त.हे वाचून मला तुझ्या काकांच्या प्रमाणे आमच्या जे.के.ची(हा जयंत कुलकर्णीचा short फॉर्म)आठवण झाली.आडनाव कुलकर्णी नि नाव जरी अगदी बाळबोध जयंत असले तरी ह्याच्या शिक्षणाची गाडी जेमतेम १ ते १०० अंकांची ओळख होणे नि a to z ह्या इंग्रजी अक्षरांची जुजबी माहिती होणे ह्या पलीकडे गेली नाही.तो जसा वयाने वाढला नि चार चौघात उठा बसायला लागला तसा त्याचा येत नसून सुध्धा मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्रजी शब्द बोलण्याचा,वापरण्याचा सोस वाढला."अमुक एक जळक्या मनोवृत्तीचा आहे"हे सांगताना तो सरसकट "अमुक एक फार corrupted minded आहे" असे बिनदिक्कतपणे म्हणायचा.ते ऐकून समोरच्याची reaction अतिशय आश्चर्य चकित झाल्या सारखी व्हायची पण ह्याला मात्र वाटायचे कि "ह्याचे हे इंगित आपल्या मुळेच हयाला कळले" त्या मुळे हा शब्द प्रयोग करणे त्याने आजतागायत सोडले नाही नि आम्ही सुध्धा तो वयाने आमच्या पेक्षा मोठा असल्याने त्याला समजवायच्या किंवा सांगायच्या भानगडीत पडलो नाही.असो.मजा आली तुझा लेख वाचून नि जे.के.च्या आठवणीने.

    ReplyDelete
  2. Masta. Donhi vyakti majeshir asavyat. Pan mala tari ya lokanchya baddal ajun kisse aikayla avadala asta. Abanche tar agdi 1-2 kissech sangitlet tumhi. ajun sangitla aste tar maja ali asti.

    Pan shevti tumcha "sense" ha "sense" ch rahila he phar bara jhala. :) Masta jhali aahe pan ekandarit post.

    ReplyDelete

प्रतिक्रिया