Wednesday, September 15, 2010

२५. हेची दान देगा देवा

कथा क्रमांक-१
चंदूलालने एकदा एक एक रुपयाची दोन लॉटरी तिकीटे काढली होती. एकाचे काही खरे नाही म्हणून दुस-या गठ्ठ्यातील एक अशी दोन लॉटरी तिकीटे घेऊन तो मंदीरात पोहोचला.
देवासमोर साष्टांग दंडवत घालून नंतर हात जोडून उभा राहीला. देवाला अगदी विनवणीच्या सुरात म्हणतो कसा," देवा, इतकी वर्षे मी मनोभावे तुझी सेवा केली. दररोज बाजारात जाताना असो वा पेपर किंवा दुध आणावयाचे असो मी तुझे दर्शन केल्याशिवाय पुढे गेलो नाही. ऊन म्हटले नाही पाऊस म्हटले नाही मी तुझे दर्शन चुकविले नाही कोणतेही महत्वाचे काम मी तुला भेटल्याशिवाय केले नाही. आताच मी ही लॉटरीची तिकीटे काढून आलो आहे तेव्हा या भक्ताचे नशिब कसे उघडायचे ते आता तूच ठरव." असे म्हणून चंदूलाल पुढे दुध आणायला गेला.
चंदुलालची ही प्रार्थना देवाने खरोखरच ऐकली होती.
दुस-या दिवशी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर चंदुलालला कळले की त्याला २५ लाखाची लॉटरी लागली आहे. बातमी कळाताच लोक त्याचे अभिनंदन करायला जमू लागले. चंदूलाल तर एकदम नाचायलाच लागला पण नाचता नाचताच तो एकदम थांबला आणि डोके बडवून घ्यायला लागला. असे का ? असे विचारल्यावर तो म्हणाला," देवाला जर मला लॉटरी जिंकून द्यायची होती तर दोन्ही तिकीटे का नाही लागली, एक तिकीट तर वायाच गेले." असे म्हणून तो पाय आपटत देवळाकडे गेला.

कथा क्रमांक -२.

ही कथा मला कुठे ऐकायला मिळाली ते आता मला आठवत नाही.
नेहमीप्रमाणे चैतन्य महाप्रभू देवाच्या भजनात गुंग होऊन आपली फाटलेली गोधडी शिवत बसले होते.
असे ते किती वेळ बसले होते याचा त्यांना विसरच पडला होता. तोंडाने देवाचे नामस्मरण करत करत हाताने एक एक टाका घालत होते. जणू त्यांना एकप्रकारची चलसमाधीच लागली होती.
ते ज्याचे नामस्मरण करत होते तो परमेश्वर स्वत:च तेथे पोहोचला होता आणि त्यांचे हे भजन ऐकत व विनकाम पहात कितीतरी वेळ उभा होता. परमेश्वराला त्यांच्या भजनात अडथळा आणता येईना आणि त्यांना न भेटता पुढेही जाता येईना.
ब-याच वेळाने त्यांच्या सुईतील दोरा संपला आणि ते नवीन दोरा ओवन्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा त्यांचे लक्ष जवळच उभा असणा-या देवाकडे गेले. त्यांनी उठून देवाचे पाय धरले व वाट पहायला लागल्याबद्दल क्षमायाचना केली. नंतर जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा परमेश्वराने त्यांना कांही मागण्याविषयी विनंती केली. चैतन्य महाप्रभूंनी देवाचे आभार मानले व म्हणाले जे द्यायचे ते तू आम्हाला दिलेच आहेस. काम करायाला हातपाय आहेत. तुझ्या नामस्मरणासाठी लागणारी वाचा आहे. आता फक्त तुझे हे गोड नाव आमच्या मुखी सदासर्वदा राहूदे व तुझ्या भजनातचे हे आयुष्य संपू दे आणि बाकी काही नको.
परमेश्वराने त्यांना आनखी काही मागण्याविषयी सांगीतले तेव्हा त्यांनी वारंवार नकारच दिला.
खुप वेळ परमेश्वर सांगत राहीला शेवटी तो म्हनाला की जोपर्यंत तू कांही मागत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही.
तेव्हा नाईलाजाने चैतन्य महाप्रभू म्हणाले,"आता आलाच आहेस आणि हट्टच करतो आहेस तर हा दोरा घे आणि या सुईत ओवून दे" परमेश्वराने ते काम आनंदाने केले व आपल्य़ा वाटेला लागला.

चैतन्य महाप्रभू यांना महाप्रभू का म्हणतात याचे उत्तर या कथेतून आपल्याला मिळाले असेल.

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.

1 comment:

  1. छान. दुसरी कथा मीपण कुठेतरी वाचलीये. पहिली कथा नविनच..

    ReplyDelete

प्रतिक्रिया