Monday, September 13, 2010

२४. समर्पण

लग्नाच्या अगोदर काही दिवस मी निपाणीला गेलो होतो.
एसटी स्टॅंड जवळ गेल्यावर आमचा मामा भेटतो का म्हणून शोधू लागलो.
जरा इकडे तिकडे पाहिल्यावर माझे लक्ष चहाच्या टपरीजवळ जमलेल्या घोळक्याकडे गेले आणि मी ओळखले मामा तेथेच असणार.
लाकडी बाकावर ऐसपैस मांडी घालून स्वारी बसली होती. आजूबाजूला चहा पिणारे, न-पिणारे, नुकतेच पेपर वाचणारे, एसटीची वाट पाहणारे असे सगळे जमलेले होते. या सर्वांच्या मध्ये आमचा मामा बसून आपले अध्यात्मिक डोस सगळ्यांना पाजत होता. लोकही चहाच्या घोटाबरोबर ते चवीने पित होते.
मी दिसल्यावर मामा हात दाखवून म्हणाला," ये ये बस. अरे तुझ्याच फायद्याचा विषय आहे. अरे चमनलाल एक स्पेशल चहा घे इकडे." शेवटचे वाक्य ज्या चमनलालला उद्देशून होते तो खरोखरच चमनगोटावाला होता.
मामाने मला तिथेच बसवून दैनिक सकाळमध्ये छापून आलेली एक बोधकथा वाचून दाखविली. ती कांहीशी अशी होती.
कोणे एके काळी एका आश्रमात एक ऋषी आपली ज्ञानसाधना करीत असतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी हीच एकमेव दुसरी व्यक्ती त्या आश्रमात राहत होती. पतीने ध्यानधारणा करावी, समाधी लावावी, चिंतन मनन यात रमून जावे आणि पत्नीने आजूबाजूच्या जंगलातून फळफळावळ गोळा करावी गायींचे दुध काढावे, जवळच असणा-या शेतावर कष्ट करावे व अन्न पिकवून ते शिजवावे आणि पतीला वाढावे. अशा प्रकारे पतीच्या ज्ञानसाधनेत त्या ऋषीकुलोत्पन्न स्त्रीचे अनमोल योगदान होते. आपल्याला कराव्या लागणा-या काबाडकष्टाची तिला कोणतीच तमा नव्हती. याच्या पुढेही जाऊन सांगाय़चे म्हणजे ऋषी कधीही तिच्याशी बोलत नसत. त्यांचे अखंड मौन व्रत होते. कोणताही शब्द न उच्चारता तिने वेळच्यावेळी जेवनाचे ताट नेऊन त्यांच्या समोर ठेवावे आणि त्यांनी ते कोणत्याही प्रतिक्रियेविना खावावे. लग्नानंतर त्यांनी एकदाच तिला सांगितले होते की जेवना सोबत नेहमी एका भांड्यात पाणी व एक सुई द्यावी व जेवन करत असताना तेथे थांबू नये. त्या भल्या स्त्रीने कधीही यात खंड पडू दिला नाही.
कालांतराने अगदी जीवनाचा शेवट जवळ आल्यावर एके दिवशी तिने त्यांच्याकडे एक मागणे मागीतले. ती म्हणाली मला आता बाकी कांही नको. तुमच्याबरोबरचा हा संसार सोडून जाण्याची वेळ आली आहे. मला आतापर्यंत सर्व काही मिळाले आहे. काही तक्रार नाही की काही मागणे नाही. फक्त एकच सांगा आपण त्या सुईचे आणि पाण्याचे काय करत होता?
खरंतर हा प्रश्न तिच्या तोंडून लग्नानंतरच्या पहिल्या दिवशीच यायला हवा होता, पण आला नाही. येणारच नाही त्याचेच नाव तर आहे ’समर्पण’. पतीने सांगावे व पत्नीने ते करावे. का? असा प्रश्नच नाही. किंवा कुतुहल म्हणून दारा आडून पाहणे नाही. (मला तर वाटते शेवटीसुध्दा हा प्रश्न तिने विचारला नसावा. कथाकाराने तो स्वत:च घुसडला असावा. त्याशिवाय ते कोडेही सुटले नसते म्हणा.)
ऋषींनी तिला उत्तर दिले. ते म्हणाले," मला याची जाणीव होती की लग्नानंतरचा तुझा प्रत्येक दिवस जणू माझ्यासाठीच उगवत होता. पहाटे सुरु होणारा दिवस आणि दिवसाचा प्रत्तेक क्षण तू फक्त माझ्याबरोबरच्या संसारासाठीच खर्च करत होतीस. त्यामुळे तू वाढलेला अन्नाचा प्रत्तेक कण न कण मी खुप प्रेमाने व आदराने खाल्ला. जे शीत ताटातून खाली पडते होते ते मी त्या सुईने उचलीत होतो आणि दिलेल्या पाण्य़ात धुवून खात होतो. तुझ्या कष्टातून मिळालेल्या अन्नाचा कण आणि कण मी माझ्या चिंतनात झिजवला तुझे कष्ट मी असे वाया कसे घालवू?"
एवढे वाचून मामा कपाळाला हात जोडुन म्हणाला, "धन्य तो ऋषी आणि धन्य त्याची पत्नी. आणि आत्ताच्या या बाया बघ, नवरा दररोजच्या नियमाने जरी कामाला निघाला तरी हजार प्रश्न विचारणार. कुठे चालला, कधी येणार, कशाने जाणार, कशाने येणार, बरोबर कोण आहे इ. इ. धन्य या बाया."

2 comments:

  1. प्रिय प्रदीप,
    "थोडं इकडचं थोडं तिकडचं..." पण फार महत्वाच "समर्पण" आणि त्यातच आपण कमी पडतो.एका सध्या नि सरळ गोष्टीने त्याची आठवण करून दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  2. आमची कॉमेंट आता लगेच दिसत असल्याने खूप बरे वाटते नि भले आपण ती लगेच पाहो न पाहो पण आम्हाला मात्र आम्ही तुमच्या पर्यंत लेख वाचल्या नंतर लगेच पोहोचले ह्याचे समाधान मिळते. धन्यवाद.

    ReplyDelete

प्रतिक्रिया