Thursday, January 20, 2011

४४. ससा आणि कासव

ससा आणि कासव ही कथा आपल्याला माहीत असेलच.
पंचतंत्रात किंवा इसाप यांनी ही कथा लिहील्यानंतरच्या काळातील घडून गेलेली आणखी एक कथा फारशी प्रसिध्द नाही ती आज मी तुम्हाला सांगणार आहे.
एका रम्य सायंकाळी ससा, कासव आणि उंदीर हे तिघे मित्र फिरायला बाहेर पडले होते. फिरता फिरता शहरापासून खुप बाहेर पोहोचले. आज चालणे खुप झाल्यामुळे त्यांना आता कांहीशी भूक लागल्याची जाणीव झाली. तिथून जवळच त्यांना एक हॉटेल दिसले. तिघेही खुषीतच तिकडे वळले. नवीनच दिसणारे ते हॉटेल खुप महागडे असावे असा त्यांनी तर्क केला. दरवाजावरच त्यांचे स्वागत करण्यात आले.
एक टेबल निवडून ते स्थानापन्न झाले आणि सुरवातीला तीन कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी पिऊन खायला कांहीतरी मागवू असे ठरले. कॉफी येईपर्यंतच्या गप्पांमध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यापैकी एकाकडेही पैसे नव्हते. ते तिघे फिरायला सहजम्हणून बाहेर पडलेले त्यामुळे पैशाचे पाकीट कोणीही सोबत घेतले नव्हते. आता कॉफीचे बील कसे द्यायचे?
कोणी तरी घरी जाऊन पैसे घेऊन आले पाहीजे त्याशिवाय बील भागवता येणार नव्हते. एवढ्या लांब चालत कोण जाणार? प्रत्तेकजण दुस-याकडे बोट दाखवू लागला.
उंदीर म्हणाला," माझा जीव तो केवढा? एवढे चालल्यावर मीतरी मरुन जाईन तेव्हा तुम्हा दोघांपैकी कोणीतरी जायला पाहीजे"
त्याचे म्हणणे बरोबर असल्याचे त्या दोघांना पटले. पण ससा आणि कासव यापैकी कोण जाणार हे अजून ठरत नव्हते.
कासव सशाला म्हणाले," तू खुप वेगाने धावू शकतोस तेव्हा तूच जाऊन लवकर पैसे घेऊन ये."
तेव्हा ससा म्हणाला," छे, छे मी नाही जाणार एवढ्या लांब, मला कंटाळा आलाय."
उंदीर कासवाला म्हणाला," आता तूलाच जायला लागणार, हे ससे खूप आळशी असतात. मध्येच कुठेतरी झोपतील. मागे नाही का एक ससा शर्यतीत मध्येच झोपला होता आणि त्या कासवाने शर्यत जिंकली होती."
आता यावर त्या कासवाचा नाईलाज झाला.
कासव घरी जाऊन येण्यास तयार झाले पण त्याने अट घातली की मी आल्या शिवाय ही कॉफी कोणी प्यायची नाही. आणि ही अट मान्य नसेल किंवा कोण पाळणार नसेल तर ते घरी जाणारच नाही. शेवटी ही अट सर्वानी मान्य केली आणि कासव घरी जायला निघाले.
कॉफी टेबलवर आलेली होती आणि थंड होत होती पण ती पिता येत नव्हती.
कासवाला जाऊन बराच वेळ झाला तरी ते अजून परतले नव्हते.
कॉफी टेबलवर येऊन तासभर होऊन गेला पण कासव काय येईना तेव्हा कॉफी पिऊन टाकावी की काय असे त्यांना वाटू लागले.
ससा उंदराला म्हणाला," दोस्ता, हे कासव म्हणजे अगदीच संथ चालीचे त्याला पाठवून आपण चूकच केली, मला आता राहवत नाही आपण ही कॉफी आता पिऊन टाकूया."
उंदरानेही त्याला होकार देऊन कॉफीचा कप उचलला. तेवढ्यात मागून आवाज आला," हुं, मला माहीतच होते तुम्ही असे करणार, म्हणून मी घरी गेलोच नाही!!" " मला चुकवून कॉफी पिता काय चोरांनो? मी तुम्हाला ओळखत नाही की काय?"

1 comment:

  1. very interesting blog, keep it up . cakley introducing largest variety of home made cakes in Kolhapur at See Cakley

    ReplyDelete

प्रतिक्रिया