Saturday, January 15, 2011

४२. इनक्रेडीबल मोरेवाडीकर

मोरेवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर हे गाव कोल्हापूर शहराच्या करंगळीजवळ वसलेले आहे आणि ते भटाला दिली ओसरी या चालीवर हळूहळू तळहाताकडे सरकत आहे.
उजळाईवाडीकडून शहरात येणा-या रस्त्याने शाहू जकात नाक्यापासून थोडे पुढे आले की डाव्याबाजूस इंग्रजी "व्ही" आकारात एक रस्ता जातो. शांतीनिकेतनकडे असा बोर्डही तेथे दिसतो. त्या रस्त्याने आपण गेलात तर आपल्याला या गावाकडे जाता येईल. हे सगळे सविस्तर वर्णन वाचून आपल्याला वाटेल की मोरेवाडीला मोरगावचा गणपती आहे किंवा मोरेवाडीला निर्मल ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे किंवा मोरेवाडीला कांही प्रेक्षणीय ठिकाण आहे किंवा असेच कांही तरी.
पण मी आपल्याला मोरेवाडीचा पत्ता देण्य़ामागे वेगळेच एक कारण आहे.
आपण गावठी दारुचा कारखाना पाहीला आहे का?
पाहीला असेल किंवा नसेल आपण जरुर येथे येऊन येथील गावठी दारुचे उत्पादन कसे केले जाते हे पाहू शकता. वर्षभर अखंडीतपणे सुरु असलेला या दारुच्या भट्ट्या आपल्याला रस्त्याच्या कडेलाच दिसतील. आपण कोणत्याही मौसमात या येथील भट्ट्या नेहमी धगधगतच असतात.
आपण म्हणाल की आम्ही पहायला आलो आणि पोलिस आले तर ?
त्याची काळजीच करु नका. पोलिस येथे दररोज येऊन जातात. दारुवाल्यांना आपली भिती वाटणार नाही याची ते काळजी घेतात.
एक-दिड वर्षापुर्वी येथे दर पंधरादिवसांनी पोलिसांची धाड(?) पडायची, पुन्हा या भट्ट्या तेवढ्याच तावाने पेटायच्या.
पुन्हा धाड पडायची पुन्हा भट्ट्या सुरुच.
मला वाटायचे की पोलिस दर पंधरा दिवसांनी येऊन त्यांना दारुच्या धंदा कसा करावा याचे शिक्षणच देत असावेत. येथील नवतरुणांचे प्रबोधन (?) करुन धंद्यातील बारकावे व नवनवीन तंत्रज्ञानाविषयी शिक्षण देत असावेत.
कालांतराने तेथील तरुणच या पोलिसी शिक्षणाला कंटाळले आणि तेथील बायाबापड्या तरुण मुले लहान-मोठ्ठे सगळ्यांनी मिळून पोलिसांचा धंद्यातील हस्तक्षेप दुर करण्याचा निर्णय घेतला.
अशाच एका धाडीच्या वेळी काहीतरी कारणावरुन त्यांच्या बिनसले. तेव्हा तेथील सगळ्यांनी मिळून आलेल्या पोलिसांना काठ्या, लाकडाची फोके इत्यादी जे काय हाताला मिळेल त्याने फोकळून काढले.
त्या समरप्रसंगी बरेच वरिष्ठ कनिष्ठ पोलिस बांधव तेथे उपस्थीत होते. पण मोरेवाडीच्या बहाद्दरांनी कोणताही भेदभाव न पाळता सगळ्यांना एकच न्याय हे धोरण राबवून चांगलेच बदडून काडले. त्यांचा मार इतका व्यवस्थीत होता की काही पोलीसांना दोन-तीन दिवस इस्पितळात काढावे लागले. ( त्यानिमीत्ताने त्यांना सुट्टी मिळाली, त्यांच्यावर अशा धाडी टाकण्याच्या कामांचा खुप ताण असतो)
या प्रसंगाने येथील दारुभट्टीधारक बांधवामध्ये एकी निर्माण झाली असून येथून पुढे येणा-या वाईट प्रसंगात असेच धैर्य दाखवण्याचे त्यांनी आता ठरविले आहे.
याउलट पोलीसबांधवांचा मात्र "कॉन्फिडन्सच गेला" आहे. येथून पुढे मोरेवाडीकरांचा "नाद करायचा नाय" हे त्यांनी मनोमन ठरवीले आहे.
त्यानंतर त्या भट्ट्या आजतागायत धडाधड धगधगत आहेत, त्यातून उत्तमप्रतीची गावठी दारु तयार होते आहे. त्यांचे एकदम कसे झकास सुरु आहे.
दारू वाले, त्यांच्य़ा शेजारीच असणारे रिव्हेन्यू कॉलनीतील सरकारी नोकर, पोलिस, रस्त्याने येणारे जाणारे पुढारी, नेते हे सगळेच सुखी आहेत.
येता जाता त्या भट्ट्या पाहून आम्हा सगळ्यांच्या मनाला कसा आल्हाद वाटतो. मनाला एक उभारी प्राप्त होते.
कधी कधी पोलिसांबद्दल वाईट वाटते पण म्हणतो जाऊदे ते तरी काय करणार?
दारुवाल्यांसमोर कोणाचे काय चालणार ??
आता पोलिस त्याऐवजी फक्त तुम्हा-आम्हाला किंवा एखाद्या आमदाराला मारण्य़ासाठी आपली ताकत वापरतात. ते सोपे आहे त्यात रिस्क नाही.
दारुवाले, साठेबाज व्यापारी, मशिदीत हत्यारांचा साठा करणारे, मटका घेणारे यापेक्षा सामान्य माणसावर आपला ताव काढणे कधीही सोपे.
याच पोलिसांनी मिरजेत गणेशोत्सवात झालेल्या दंग्याचे पडसाद उचगावात उमटले तेव्हा तेथील लोकांना घरातून ओढून काढून मारहाण केली. त्यावेळी लहान-मोठे स्त्री-पुरुष या सगळ्यांनाच पोलिसी अत्याचार सहण करावे लागले. मुख्यमंत्र्याच्या सभेत घोषणाबाजी केली म्हणून त्या मुख्यमंत्र्यासमोरच कांही विद्यार्थ्यांना कोल्हापूरात अमानुष्य मारहान झाली. तेथे कायदा इत्यादीसाठी वेळ नसतो.
शेवटी हे कायद्याचे राज्य आहे. देशद्रोही असला तर त्याच्या शिक्षेआड कायदा कसा आणावा हे या सरकारकडून शिकावे.
तात्पर्य एवढेच की सामान्य माणसाने पोलिसांच्या वाट्याला जाऊ नये.
(आपण जरी नाही गेलो तरी ते आपली वाट आडवून पैसे मागतातच.)

टीप: वरील लेखातील प्रसंग, व्यक्ती विषयी कायदेशीर पुरावे माझ्याजवळ असतीलच असे नाही पण त्या त्या ठिकाणच्या लोकांना भेटून आपण याविषयी खात्री करु शकता.

No comments:

Post a Comment

प्रतिक्रिया