Friday, November 23, 2012

५५. जी. ए. कुलकर्णी - प्रवासी

जी. . कुलकर्णींच्या कथा म्हणजे एक अनामिक, अनोळखी, गूढ पण तितक्याच रम्य विश्वातला प्रवास वाटतो. गुढ व्यक्तिमत्वे आणि गुढ प्रतिकांमधून धावणारी पण वास्तवाशी जवळचं नातं सांगणारी कथा असं कांहीसं वर्णन करता येईल. कवितेच्या प्रांतात कवी ग्रेस आणि आरती प्रभू तसे कथांच्या प्रांतात जीए.
जी. . कुलकर्णींच्याच "रमलखुणा" या कथासंग्रहातल्या "प्रवासी" या कथेतला हा काही भाग आपल्यासाठी . .

. . . दूर अंतरावर प्रकाश दिसताच त्याला फार धीर आला. पाण्याचा शिडकावा झाल्याप्रमाणे त्याचे अंग ताजे झाले व झपाझपा पावले टाकत तो प्रकाशाकडे आला. पण जवळ येताच मात्र त्याला फार निराश वाटले. त्याला वाटले, आजचा दिवसच असा कुजलेला आहे! मी जिवंत माणसाकडे जरी धावत आलो, तरी मला तेथे सांगाडाच भेटेल !
कारण त्याला दिसलेला प्रकाश एका पेटलेल्या चितेचा होता. तिच्याशेजारी केवळ त्या हलत्या प्रकाशाचे वस्त्रच अंगावर घेऊन एक अतिशुष्क, नग्न बैरागी बसला होता. त्याच्या बाजूला जमिनीत एक उंच त्रिशूल खोचलेला होता व त्यावरील ज्वालेच्या प्रकाशामुळे त्यातून तीन बोटे उभारल्याचा भास होत होता. प्रवाशाने जवळ येऊन फरशी बाजूला ठेवली व जमीनीवर अंग टाकले, तरी बैराग्याने त्याच्याकडे पाहीले देखील नाही.
" येथून गाव किती दूर आहे ?" प्रवाशाने विचारले. "आज दुपारपासून मी अन्नाचा कण देखील खाल्ला नाही."
" तुला खायला हवं ? तर मग तू अगदी वेळेवर आलास." बैरागी चितेकडे बोट दाखवत म्हणाला. " कांही क्षणांतच गोळे भाजून होतील."
प्रवाशाने बावरून चितेकडे पाहिले. बैराग्याने पिठाचे सात-आठ गोळे तिच्यात भाजत ठेवले होते. पण त्यापलीकडे अद्याप जळत असलेले प्रेत पाहून त्याला एकदम पोट उलटल्यासारखे झाले व त्याची भूकच मेली.
" म्हणजे तुला अद्याप खरी भुकच लागली नाही, नाहीतर तू चेहरा असा वेडावाकडा केला नसतास !" बैरागी म्हणाला. "तसली खरी भूक येते, त्या वेळी आतडी कुरतडत येते. त्या वेळी माणसाकडे नुसतं पाहताना देखील त्याच्या मांसात आपले दात रुतत असतात. मी एकदा अठरा दिवस स्वत:ला गुहेत कोंडून घेतलं होतं, त्या वेळी मला तशी भूक लागली होती. मला समोर एका रानझुडपांच्या पानाचा झुबका दिसला, तेव्हा ती कडवट पाने मुंग्याकिड्यांसकट मी हपापून खाऊन टाकली होती. वास्तविक हे गोळे तू खायला हरकत नाही. ही चिता माझ्या पत्नीचीच आहे. आयुष्यभर तिनं आपल्या शरीरानं अनेकांना अनिर्बंध सौख्य दिलं; मेल्यावरही शरीरानं हे सुख द्यायला ती हरकत घेणार नाही."
प्रवासी बैराग्याकडे अविश्वासाने पाहात राहीला व त्याने हळूच फरशी जवळ घेतली. "पण येथून गाव किती दूर आहे ?" त्याने पुन्हा विचारले.
"गाव किती दूर आहे, याचाच शोध घेत मी जन्म घालवला, पावलं झिजवली, पण अद्याप मला बोध झाला नाही !"
प्रवासी उगाच राहीला. अंधार जाण्याला अद्याप बराच अवधी होता व आता विसावू लागलेले शरीर पुन्हा लगेच श्रम सोसण्यास तयार नव्हते. त्याने एक नि:श्वास सोडला व बैराग्याची सोबत स्विकारली.
" तू कोण आहेस ?" बैराग्याने विचारले.
" मी एक प्रवासी आहे. यात्रा करत आहे." त्याने थोडा विचार करत म्हटले.
" फरशी घेऊन ?"
" तुझा त्रिशूल तशी माझी फरशी !" तो तुटकपणे म्हणाला.
बैराग्याने मान डोलावली. तो म्हणाला, " तू अवश्य यात्रेला जा, शहाणा होशील. पवित्र ठिकाणं किती अपवित्र असतात, एकशेआठ उपाधी चिकटलेले आचार्य किती उथळ असतात आणि त्या ठिकाणी गर्दी करणारी माणसं किती क्षुद्र, मुर्ख असतात, याचं तुला दर्शन होईल. आणि स्थान जेवढं प्राचीन, तेवढी मलीनता अधिक ! जा, तू अवश्य जा. तुझा लाभच होईल !"
प्रवासी तसाच जाळाकडे पाहात राहीला. त्याची भूक आता दडपून गेली होती, पण डोळ्यावरची ग्लानी उतरेना. त्याने अंगावरील एकवस्त्राची उशी केली. फरशी अगदी अंगाशी ठेवली व त्याने जमिनीवर ऐसपैस अंग पसरले.
"तुला कसाही पहाट होईपर्यंत वेळ काढलाच पाहिजे, तेव्हा मी तुला काही कथा सांगू का ?" बैराग्याने विचारले.
" कथा नवी आहे की जूनी आहे ? तिला काही अर्थ आहे का ?" फारशी उत्सुकता न दाखवता प्रवाशाने पडल्यापडल्या विचारले.
हे बघ, कथा काय आहे हे सांगणा-याइतकच ऐकणा-यावरही अवलंबून असतं. आणि अर्थाविषयी म्हणशील तर सगळ्याच कथा अर्थपूर्ण असतात किंवा अगदी वेडगळ, अर्थहीन असतात. ऐकून तरी बघ."

. . . बाकीची कथा वाचण्यासाठी - कथेचे नाव "प्रवासी" पुस्तकाचे नाव " रमलखुणा"

5 comments:

 1. अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
  अधिक माहितीसाठी भेट द्या.

  www.Facebook.com/MarathiWvishv
  www.MWvishv.Tk
  www.Twitter.com/MarathiWvishv


  धन्यवाद..!!
  मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
  आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


  टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

  ReplyDelete
 2. गोष्ट उद्बोधक आहे.
  पूर्ण पुस्तक वाचायला हवे.

  ReplyDelete
 3. जीएंच्या साहित्याबद्दल आणखी जाणुन घेण्यासाठी नवीनच एक वेबसाईट सुरु झाली आहे.
  http://www.gakulkarni.com/

  ReplyDelete
 4. जी.ए. ची ही कथा मी पुन्हा पुन्हा वाचली आहे मला फार आवडते.

  ReplyDelete

प्रतिक्रिया