Showing posts with label marathi blogs. Show all posts
Showing posts with label marathi blogs. Show all posts

Monday, November 21, 2011

५२. मला भेटलेली माणसं - भाग ७ -आयब्या

आयब्या जर शाळेत गेला असता तर त्याचे हजेरीतले नाव किंवा कागदोपत्री नाव आयुब बाबालाल मनेर असे असते. पण आयब्या शाळेत गेला नाही आणि शाळाही त्याच्याकडे आली नाही.
पाणा-याच्या थडग्यातला पानारी जिवंत होता तेव्हा कधीतरी आयब्या आपल्या बापू बरोबर आमच्या गावात आला असावा. कारण आमच्या गावात मुसलमान असे नावालाच राहतात. चार पाच कुळं असतील त्यांची. ते सगळे एकदमच गावात उतरले असावेत. ठरवून केल्याप्रमाणे असे चारपाच मुसलमान कुळे आपल्याकडच्या गावात आढळतात. कोण बायकांच्या हातात काकणं भरायचं कासारकाम करतो तर कोण डोरली गाठवायचं अत्तारकाम करतो. अशाप्रकारचे किरकोळ वाटणा-या धंद्यामध्ये आपआपले कसब वापरुन मोठ-मोठे बंगले बांधले आहेत या लोकांनी.
पांढ-या कापडाच्या विजारी आणि त्यावर घालायचे तीन बट्नांचे शर्ट शिवणे हि आयब्याची स्पेशालीटी आहे. हिरवे, निळे, पिवळे धनगरी शर्ट, पांढरी पट्टी असणा-या, नाडीच्या, निळ्या, लाल रंगाच्या जाड कापडाच्या चडडया शिवणे हा त्याचा हातखंडा. लुगडेवाल्या बायकांच्या चोळ्य़ासुध्दा तो शिवून देत असे. आम्ही लहान असताना तो आमच्या शाळेच्या युनिफॉर्माचा शर्ट आणि खाकी चड्डीही शिवून द्यायचा. त्यासाठी लागणारे कापडही त्याच्याकडे मिळायचे.
हा झाला त्याचा एक व्यवसाय आणि त्याचा दुसरा व्यवसाय म्हणजे आपल्याकडे आलेल्या माणसांबरोबर गप्पा मारणे. त्याच्याकडे निरनिराळ्या कारणाने बाया-बापड्या किंवा बापए-लोक जमायचे. त्यांना तासनतास बसवून गोड गोड गप्पा मारण्याची कला त्याच्याकडे होती. या गप्पा ह्या नुसत्या गप्पा नसतात तर त्यातून कमाई कशी करायची हे त्याला चांगले माहीत होते. त्यामुळे त्याचा मुख्य व्यवसाय ह्या कमाईगप्पा मारणे हा आहे की कपडे शिवण्याचा हा प्रश्न पडतो. एखादा शेतीवाला आला आणि समजा त्याची शेती खडीच्या साईडला आहे. खडी म्हणजे नदीपासून थोडे लांब अंतरावरची शेते जिकडे अगोदर पाणी पोहोचले नव्हते. तर आयब्या म्हणणार, "काय बापूदा, तुझ्या खडीकडच्या शेतातल्या शेंगा. काय तेची चवच अलग हाय. गयेसाली तू दिलेल्या शेंगा खाऊन आमची अम्मी नुसती तेचीच याद करते बघ. इस साल शेंगा केल्या नाहीस काय तू?" मग काय समोरच्यानं वळखायचं आपला शर्ट पोरग्याच्या लग्नाच्या मुहुर्ताला पाहीजे असला तर घम्यालेभरून शेंगा त्या अम्मीच्या वट्यात आणुन टाकायला पाहीजेत.
 जर कुणाचे शेत नदीजवळ असले तर आयब्या म्हणणार " इससाल भाताचं पिक जोरात आलं. पावसानं लई झ्याक काम केल्यानं भातपिकाची बरकत झाली. मागच्यापेक्षा जास्तच पोती झाली असतील नाही? किती पोती झाली यावर्षी? ." अशी येणकेण प्रकारे आयब्याची वसूली सुरु असते. त्यामूळे शिवणावळीच्या रोकडीपेक्षा हेच उत्पन्न अधिक होत असे.
 बाहेरच्या माणसांशी अशा शुध्द मराठीत गप्पा मारणारा आयब्या भाभीबरोबर किंवा घरच्यांबरोबर त्याच्या टिपिकल मुसमानी भाषेत बोलायचा. अर्थात थोड्या सरावाने गल्लीतल्या सगळ्या लोकांना ही भाषा यायला लागली आहे. आयब्याची भाषा म्हणजे, "क्योंरे रडणेको क्या हुया? ऑं?" , यावरचे उत्तर- " हमरे परडेमें शेरडी वरड्या मै देखनेको भाग्याभाग्या गया वाटमें पड्या तो गुडघेको खरचट्या, और रोच पड्या." अशा प्रकारची त्याची ही भाषा शिकून गल्लीतले कोणतरी भाभीला विचारतो," क्यों भाभी, जेवीश क्या नई?" म्हणजे जेवलीस का? असं विचारायचे असतं. याचं उत्तर मात्र " आम्ही जेवलो नाही अजून, बापू तूम्ही जेवला का नाही?" असं येतं.
 कापडं शिवतानं गप्पा मारत बसल्यामुळं कधी कधी त्याचं काम आवरायचं नाही. मग रात्री जागून तो आपल्या मशीनला पळवत बसे. त्यात तो इतका तल्लीन व्हायचा की सकाळ झालेली पण त्याला कळायचे नाही. एखाद्याच्या गुळ, शेंगा पोहोचत्या झाल्या असतील तर त्याची शर्ट-विजार वेळेवर द्यायला तो रात्रभर काम करत असे. एकदा म्हणे एक चोर त्याच्य़ा खोलीत आला. चोराला खरंतर त्याच्या शेजा-याच्या घरात उतरायचे असावे पण खाप-यांचा अंदाज चूकून तो आयब्याच्या घरात उतरला. आयब्या आपल्या मशिनवर, आजूबाजूला कापडाचे तुकडे पडलेले आणि चोर त्याच्या मागे कोप-यात बसलेला. आता चोराची पंचाईत झाली, बाहेर जायचे कसे? चोराने ठरविले असावे की हा जेव्हा काम संपवून झोपेल त्यावेळी निघून जावे. मग चोर कोप-यातच बसून वाट पाहू लागला. पण आयब्याला आत्ताच जोर चढला होता त्यामुळं तो मशीनला सुट्टी देत नव्हता. असं एकाच जागी गप्प बसून चोराला झोप आवरेना. चोरानं तिथच ताणून दिली. पहाट झाली तशी डेअरीचा भोगा वाजला. आयब्याची बायको गाईंला वैरण टाकायला उठली. कोप-यात बांधलेल्या शेळ्यांनी कालवा केला. तशी चोराला जाग आली. आजून आयब्या मशीनला भिडलेलाच होता, चोरानं डोक्यावर हात मारला आणि डोळे चोळीत आधीच उघडलेल्या मागच्या दाराने बाहेर पडला. चोराला हात हालवत घरला जायची पाळी आली. चोर ज्या कोप-यात लपून बसला होता तिथच दहापंधरा किल्ल्यांचा जूडगा पडलेला सापडला. पुढे गावात कुणाची किल्ली हरवली की यातली किल्ली वापरली जाऊ लागली.
 मुसलमान असला तरी आयब्याच्या दारात गुढीची काठी उभी असायची आणि सणासुदीच्यावेळी त्याच्या घरातून पोळ्यांचा वासही दरवळत असे. दस-याचे सोने असो वा तिळगूळ त्याला कशाचे वावडे नव्हते. हे सगळे हिंदू सण सोडून ईद सुध्दा त्याच्याकडे जोरात साजरी व्हायची. ईदची खीर "शिरखुर्मा" सगळ्या गल्लीला खायला मिळायची. आयब्या गल्लीचा अविभाज्य भागच झाला होता.
आयब्या, त्याचा कबीला, दोन-तीन गाई, एक-दोन शेळ्या आणि कोंबड्या गल्लीची अमानत होती. त्यातच आणखी एक भर म्हणजे "येशा". आपल्या दुस-या पोरीचे लग्न झाल्यावर त्यानं एक कुत्रे पाळलं होते त्याचं नाव ’येशा’. या येशावर त्याचा जीव होता. तो जाईल तिकडं हा कुत्रा त्याच्या सोबत फिरत असे. तो मशिनवर असला की हा कुत्रा मग दारात बसून येणाजाणा-यांवर नजर ठेऊन असे. मशीनवर पाय मारता मारता आयब्या येशाबरोबर बोलत असे. शहानपणा शिकवत असे. लोकांबरोबर कसे वागावे याचे पाठ येशाला शिकवत बसे. येशाने कोणाला उगाच घुरघुरावे मग आयब्याने त्याला,"येशा, क्योंरे?, कौन आया रे?" असे विचारावे मग आलेल्याने आपणच सांगावे," आयब्या, मी हाय रे." " मग ये कि गा, आत" "तुझ्या रखवालदाराला बाजूला कर अगोदर". असा संवाद झाला की आयब्या खुष होऊन आलेल्याला आपल्या कुत्र्याची ओळख करुन देत असे.
 किती झाले तरी ते गावठी कुत्रे होते. कुणाला गुरगुरेल तर कुणाबरोबर खेळत बसेल याचा नेम नाही. कोणी बोलावले की शेपूट हालवत जात असे. त्याला बघून भिण्यासारखेपण कांही नव्हते. त्यामुळे येशा सगळ्या गावाच्या ओळखीचा झाला होता.
 त्या वर्षी ईदला आयब्या खुप खुषीत होता. गेल्यावर्षीच त्याच्या दुस-या पोरगीचे लग्न झाले होते. दोन्ही पोरी त्यांची पोरं अशी सगळे यावर्षी ईदला त्याच्या घरी जमले होते. आयब्यानं यावर्षी ईदसाठी सगळ्यांना नवी कापडं केली.
 आयब्या स्वत:चीच कापडं शिवण्यात मग्न झाला तेव्हा लोक त्याला म्हणू लागले " आयब्या ईदला तू नवी कापडं घालून मिरिवणार आणि येशाचं काय रे? त्याला कापडं केलीस काय नाही?" यावर एक दोघं फिदी फिदी हसून गेली.
 बोलणारा बोलून गेला पण आयब्याला गप्प बसवेना. आयब्यानं सगळ्याची कापडं बाजूला ठेवली आणि कुत्र्यासाठी कापडं शिवली. चीटाचीटाचा शर्ट आणि लाल पांढरी पट्यापट्याची विजार. विजारीला नाडी आणि शर्टाला बटणे. अगदी येशाची मापे घेऊन ड्रेस तयार केला तेव्हा त्याला बरे वाटले.
 ईदचा दिवस उगवला तसा आयब्याला आनंद झाला. आपल्या घरच्यांबरोबर येशालाही कपडे घालून कधी एकदा गल्लीतल्या लोकांना दाखवितो असे त्याला झाले होते. सगळ्यांनी आपआपली कपडे घातली, मोठ्या लोकांनी चिल्ल्यापिल्ल्यांना कपडे चढविली. चिल्ल्यापिल्ल्यांनी येशाला कपडे चढवीली. सुरवातीला अवघडलेला येशा थोड्यावेळाने त्या कपड्य़ांना सरावला. कपडे पण एकदम मापात जमलेली होती. पुढचे पाय शर्टाच्या हातूप्यातून बाहेर आले होते तर मागचे पाय विजारीतून. शेपटीला बाहेर यायलाही जागा ठेवलेली होती.
एकूण काय येशा एकदम ऐटबाज दिसू लागला होता. चालताना तर काय त्याचा रुबाब, व्वा. येशा जसा बाहेर पडला तसा लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
एक एक करत सगळ्यांना समजले. कपडे घातलेल्या येशाला बघायला खालच्या वरच्या गल्लीतल्या पोरांनी गर्दी केली. मोठी लोकं आयब्याला शाब्बासकी देत होती. येशातर सर्कशीतल्या प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे ऐटीत फिरत होता. आयब्या तर त्याची दृष्ट काढावी काय याचा विचार करत होता. कोण म्हणत होतं की येशाचा फोटो काढून पेपरात देऊया. कोण म्हणत होते की नको सर्कसवाले येऊन येशाला घेऊन जाणार. कोणाचे काय तर कोणाचे काय.
 ही सर्कस अशीच दिवसभर सुरु राहणार असे वाटत असतानाच येशाचा मूड बदलल्यासारखा वाटला. तो एकदम इकडे तिकडे धावू लागला. येशा पळू लागला की पोरं त्याच्या मागून पळू लागली. गल्लीत एकदम गोंधळ सुरु झाला. त्याला एकदम काय झाले हे कोणालाच कळेना.
आयब्यानं त्याला येशा येशा हाका मारल्या पण येशा ऐकायच्या स्थितीत नव्हता. आयब्याला वाटलं येशाला दॄष्ट लागली. नाहीतर त्याला लागीर झाला असेल. काय गोंडस दिसाय लागलाय तो आज. एकदमच असे काय झाले कळेना. येशानं गल्लीतच तीनचार फे-या मारल्या आणि मग गल्ली सोडून चौकात आला.
पोरं गिल्ला करुन येशाला काय सुचू देत नव्हती.
 येशा धावत जाऊन एका झुडपात घुसला पोरं त्याच्या पाठीमागून धाऊ लागली.
येशानं झुडपात घासाघिस करुन सगळी कापडं फाडून टाकली आणि पुन्हा जोरात पळत सुटला गावाच्या बाहेर.
 आयब्याला काळजी वाटू लागली तोही धावत सुटला. पण येशा तोवर खुप लांब गेला होता.
पोरं मागे पडली तसा येशा थांबला.
जरा इकडे तिकडे घुटमळला आणि टराटरा हागला.
शांत झाला.
मग कांहीच न झाल्या सारखं परत घराकडे येऊ लागला.
 वाटेत आयब्या दिसल्यावर त्याच्या पायाजवळ जाऊन घुटमळू लागला. आयब्या म्हणाला," खुदान खास्ता, आल्लानू वास्ता. मुझे छोडके कहां गया था? फिरसे ऐसे करोगे तो मै तुमसे बात नही करुंगा, ऑं"
 इकडे ही बातमी भाभीला समजली तेव्हा तीही काळजीत पडली होती.
आयब्या आणि येशा घराकडं येतानं बघुन तिचा जीव भांड्यात पडला. " या अल्ला" असं म्हणून तिनं दोघांच्यावरून मिठ-मिरच्या ओवाळुन टाकल्या.
 पुढे कांही दिवसांनी येशा कुठे गेला ते कोणालाच कळले नाही.
तेव्हापासून मात्र आयब्याने दुसरे कुत्रे पाळले नाही. येशाचा फोटॊ काढायचा राहून गेला याचे त्याला राहून राहून वाईट वाटते.
 आता फक्त आयब्या आणि त्याचे मशिन दोघे एक-मेकांशी बोलतात.
 बेंदराच्या बैलांना झुली घातलेल्या पाहून आम्हाला एकापेक्षा एक फक्कड झुली शिवणारा आयब्याची आणि आयब्याला येशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Saturday, September 11, 2010

२३. दु:खाची परी

झेपेले इतकंच दु:ख तो आपल्याला देतो,
दिलेले द:ख संपले की आपल्यालाच नेतो...
असं कवी चंद्रशेखर गोखले आपल्या चारोळीत लिहितात ते खरेच आहे. आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाची एकसलग अशी साखळी. दिवस आणि रात्रीसारखी एकामागोमाग एक जोडलेली.
इथे प्रत्तेकाला सुख-दु:ख नेमून दिलेले आहे. आपण आपल्याला नेमून दिलेल्या सुखापेक्षा दु:खावरच जास्त खुष असतो. पहा ना, आपण प्रत्तेकाला आपले दु:ख अगदी उलघडून उलघडून दाखवितो. अगदी परक्या माणसासमोर सुध्दा आपण आपले दुख: व्यक्त करतो, पण आनंद व्यक्त करायला मात्र आपल्याला फक्त आपली जवळचीच माणसं लागतात.
याचे कारण कदाचीत वपू म्हणतात तसे असेल. वपू म्हणतात सुखाची परी जरी सर्वांसाठी सारखीच असली तरी दुखाची परी (?) प्रत्तेकासाठी वेगवेगळेच रूप घेऊन येते. त्यामुळेच कदाचीत प्रत्तेकजन आपल्याला भेटलेल्या दु:खाच्या परीचे वर्णन एकमेकाजवळ करीत असेल.
अश्याप्रकारे सर्वांना वाटल्यामूळे दु:ख कमी होते असेही नाही. खरंतर प्रत्तेकाने आपल्यावाट्याचे दु:ख भोगूनच पार केले पाहीजे. आणि जो भोगतो तो बोलत नाही.
परंतू सर्वच दु:खं भोगून पार करता येण्यासारखी नसतात. काही दु:खांना आदि- अंतच नसतो. काही दु:खांना ना रंग-रुप असते ना आकार. अशी दु:खं भोगून पार करता येत नाहीत. मग अशी दु:खं आयुष्यभर साथ करतात.अगदी अश्वथाम्याच्या जखमेसारखे. जन्मभर जखम भरत तर नाही आणि चिरंजीवीत्वाचा वर पण आहे.
अशी दु:खे सोसणारी मानसं आपल्या भोवती सुध्दा असतील पण त्यांचे दु:ख आपल्याला दिसत नाही आणी ते आपल्याला जाणवू देत नाहीत. ते शब्दात प्रकट करण्यासारखे नसतेच. कधी कधी ते फक्त जाणवते पण दिसत मात्र नाही.
अशी दुखं भोगणारी माणसं बाहेरुन जरी आनंदी दिसत असली तरी आतून अनंत दु:खाने होरफळत असतात. सुर्य नाही का बाहेरून प्रकाशाचा तेज:पूंज दिसतो पण त्यासाठी त्याला स्वत:च्या अस्तित्वाचा कण-कण जाळून घ्यावा लागतो.

Thursday, September 09, 2010

२२. बोलण्याच्या त-हा

एकेकाची बोलन्याची स्वत:ची अशी खास स्टाईल असते.
त्यांची स्टाईल त्यांना शोभतेही. आपण त्याची स्टाईल वापरु शकत नाही. ती एका दिवसात आत्मसातही होत नाही त्याला वर्षानुवर्षे सराव असावा लागतो.
आमच्या गल्लीत राहणारा आबा कधीही आपले गाव सोडून बाहेर गेला नाही. तरुणपणात त्याच्या बैलाने त्याच्या एका पायाच्या मांडीत शिंग घुसविले होते त्यामुळे त्याला आता कुबडीशिवाय चालताही येत नसे. पण "तुम्हाला सांगतो" अशी सुरवात करत आबाची गाडी दाबात सुटत असे. आबाची गाडी एकदा सुटली म्हणजे गल्लीतून दिल्लीपर्यंत धावत असे. कधी कधी ती जार्ज बुश यांच्या इराक धोरणापर्यंत जाऊन पोहोचत असे. दररोज नियमाने वर्तमानवर चर्चा आणि चौकात, पारकट्यावर उठबस या आपल्या अभ्यासावर आबाच्या बाता रंगत असत. आजूबाजूला कोण बसले की आबाची टकळी सुरु. कधीकधी त्या इतक्या रंगत की आजूबाजूला बसलेले लोक आपली कामं विसरुन तिथेच बसून राहत असत. पण त्यामध्ये नेहमीचे लोक असले की ते कधी उठून गेलेले आबाला कळतच नसे. त्याचे आपले "तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो" सुरुच असायचे. एकदा तर आबा म्हणाला," तुम्हाला सांगतो, तेव्हा आम्ही जहाजावर कामाला होतो." " कधी, कॊणत्या हे प्रश्न विचारणे चुकीचेच होते पण तरी पण एकाने विचारलेच तर आबा म्हणाला," तेव्हा तुम्ही लहान हुतासा. जहाज वाटंत बंद पडले की ते ढकलायचं काम आम्ही करीत हुतो. तेव्हा जहाजावर लय मजा केली." आबानं त्याच्या कारकिर्दीत गावातील ९५१८ नंबरची सारखी बंद पडणारी गाडी पाहीली होती त्यावरून त्याने ही कथा जोडून पुढे सांगायला सुरु केलेली असायची.
गावातील आनखी एक आसामी दौलती पाटील. हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत व त्यांची तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला (त्यांच्या शब्दात) दिवसाला डेली येजा असते. कधी बाजाराच्या निमित्ताने तर कधी इतर कारणाने ते नेहमी बिझी असतात व त्यांची आसपासच्या पंचक्रोशीतील गावात बरीच ओळखपाळख आहेत. कार्यालयीन कामे असोत लाईटबोर्डतील कामे असोत ते पुढे होऊन ही कामे लोकांना करुन देतात. या त्यांच्या बिझी दैनंदिनीमुळे त्यांच्या वापरात बरेच विंग्रजी शब्द आले होते व त्यांनी त्या शब्दांना आपल्या पध्दतीने आपल्या बोलण्यात समाविष्ट केले होते. त्यांचे बोलणे आधीच आघळपघळ त्यात या विंग्रजी शब्दांचा भरणा त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकणारावर छाप पाडायचे.
एकदा त्यांनी एकेठीकाणी ऐकले ते वाक्य बहुदा असे असावे " त्या अमक्यातमक्याला काही ’सेंन्स’च नाही." त्यातील सेंन्स हा शब्द दौलतीकाकांना खुप भावला व तो त्यांनी उचलला. त्याच्या अर्थापर्यंत जाण्याची तसदी काकानी घेतली नाही. त्यांनी आपल्या परीने त्या शब्दाला न्याय दिला. " काय काका कुठे बाजारात गेलता काय?" या प्रश्नाला काकांचे मार्मिक उत्तर मिळत असे," काय तेच्या आयला त्या बाजाराच्या ! आजकाल बाजारात काय "सेक्स"च राहीला नाही." काकाने सेन्स हा शब्द सेक्स असा घेतला होता. पुढे लग्नातून परतल्यावर काका म्हणे," काय त्या नवरी म्हनना-या पोरगीला सेक्सच नाही." खरतर त्यांना "सेन्स" हा शब्द लक्षात राहीला नाही आणि जो शब्द लक्षात राहीला तो "सेक्स" त्याचा अर्थही काकांच्यापर्यंत पोहोचला नाही. मग काकानी सेक्स हा शब्द ब-याच विशेषनांसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरायला सुरवात केली. राजकारनाला सेक्स नाही, बायकोला सेक्स नाही, धंद्याला सेक्स नाही इ. इ. बरे काकांना हे चुकतय हे सांगण्याची सोय नाही. सांगणा-याच्या बाचं बारसं काकांनी जेवलेलं असते. या काकाला बोलन्याचा काय सेन्सच राहीला नाही.

Sunday, August 29, 2010

१७.काय भुललासी वरलीया रंगा

प. पु. श्रीकृष्णमहाराज देशमुख हे मुरगुड येथील सुप्रसिध्द हरी-भक्त-परायन प्रवचनकार असून अमेरीकेतही त्यांची प्रवचने झाली आहेत असे ते स्वत: सांगतात. काही दिवसांपुर्वी त्यांचा खुप मोठा सत्कार समारंभही करण्यात आला.
पुढील घटनेला आता बरीच वर्षे झाली असतील.
प.पु.श्रीकृष्णमहाराज देशमुख हे आमच्या गावात हरीनाम सप्ताहात प्रवचनाकरीता आले होते. प्रवचन सुरु असताना बोलता बोलता विषय आला होता, "प्रभूची लिला अगाध आहे". प्रभूची लिला अगाध आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्याच जीवनातील दाखले देण्यास सुरवात केली. एकदा ते म्हणे आदमापूरजवळच्या एका खेड्यात प्रवचनाकरीता चालले होते व वाटेत त्यांची कार बिघडली ( म्हणजे महाराज नेहमी कारने प्रवास करतात हे सर्वांना समजले पाहीजे). प्रवचनाच्या ठिकाणी त्यांना पोहचण्यास वेळ झाला. समजा हेच जर अमेरिकेत घडले असते तर ते पर्यायी वाहनाने वेळेवर पोहोचले असते हे सांगायला ते विसरले नाहीत. ( त्याशिवाय आम्ही अमेरिकेला गेलो होतो हे जनतेला कधी कळणार?) प्रवचनाच्या ठिकाणी जेव्हा ते पोहोचले तेव्हा तेथे खुद्द विठ्ठल परमात्मा स्वत: प्रवचन देत होता आणि तेही प. पु. श्रीकॄष्णमहाराजांच्या रुपात. अशानासे आणि अशान असे. खरोखर परमेश्वराची लिला अगाध आहे. मी ही गोष्ट खोटी आहे किंवा असे घडणे अशक्य आहे असं म्हणणार नाही कारण जो परमेश्वर भक्ताच्या ह्ट्टाखातर सुईच्या नाकातून हात्ती पार करु शकतॊ तो स्वत: प्रवचन करुन भक्तांचे कान तॄप्त करण्याची संधी सोडेल कसा? पण महाराजांनीही या गोष्टीतून स्वत:चा ढोल स्वत: बडवून घ्यायची संधी सोडली नाही. महाराजांच्या भक्तीच्या महीमेपुढे विठलाचा महीमाही थोडा कमीच पडल्याचा भास माझ्यासह सर्व श्रोत्यांना झाला. महाराजांच्या मागे एखादे तेजोवलय फिरत असल्याचा भास होवू लागला. प्रवचनात आणखी अनेक दाखले ऐकायला मिळाले ज्यातून लोकांचा परमेश्वराच्या अगाध लिलेवर विश्वास द्रुढ झाला. त्याही पेक्षा जास्त महाराजांचा महीमा अधोरेखित झाला.
प्रवचन संपल्यावर मी महाराजांचे दर्शन घेण्याकरीता गेलो.
मी त्यांना म्हणालो, "महाराज, मला तुमचे प्रवचन आवडले. तुम्ही आपल्य़ा प्रवचनांमध्ये ओशोंनी सांगितलेल्या छोट्याछोट्या कथा सांगत जा त्यांच्यामुळे लोकांपर्य़ंत आपले ज्ञान पोहचविणे सोपे जाईल." ओशोंचे नाव ऐकल्यावर महाराजांना अंगावर पाल पडल्याप्रमाने वाटले ते म्हणाले," छे छे, मला त्या नावाचीच ऍलर्जीच आहे मी त्या मानसाचा तिरस्कार करतो."
मला महाराजांच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले नाही. मी म्हणालो, "महाराज, आपण तर व्यवसायाने डॉक्टर आहात, तेव्हा आपल्याला हेही माहीत असेल की ऍलर्जी हा प्रत्तेकाचा आंतरीक दोष आहे, त्यासाठी त्या स्पेसिफिक पदार्थाला वा वस्तूला दोष देण्यात काय अर्थ नाही, आपल्याला असलेली ऍलर्जी दुर करुन स्वत: दोषमुक्त होणे कधिही चांगले, नाही का?"
ऒशोंना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या प्रवचनातील चांगल्या चांगल्या कथा दाखले वापरायला काय हरकत आहे. आपल्या संत चॊखामेळाने म्हंटल्या प्रमाणे " ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी व्ररलीया रंगा..." व्यक्ति कोणीही असो लहान-थोर, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अडाणी, भक्त, अस्तिक-नास्तिक त्याचा विचार महत्वाचा त्याच्याकडून मिळणारे ज्ञान महत्वाचे आहे मानले पाहीजे असं मला वाटतं.
कबीर म्हणतात,
" जाती न पुछो साधुकी पुछ लीजीये ज्ञान,
मोल करो तलवारका पडी रहन दो म्यान"

(टीप: महाराजांचे अनेक शिष्यगण आहेत त्यांना ही कथा किंवा घटना नवीन असेल व त्यामुळे ते विचलीत वा दुखावले असतील तर त्याचे मला वाईट वाटेल. पण वास्तव सांगितल्याचा आनंदही होईल.)

Friday, August 27, 2010

१६. जिंदगी अभी और यहीं ...

आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनतो.
आणि आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतात ज्यांची आपण कधीतरी इच्छा केलेली असते. असं मला नेहमी वाटते.
कधी त्या घटना विचार केल्या नंतर लगेचच घडतात तर कधी उशीरा घडतात.
आपण जेव्हा खुप बिझी असतॊ तेव्हा आपण म्हणतो की मला जरा स्पेस हवा आहे, थोडा निवांतपणा हवा आहे. आणि कालांतराने जेव्हा असा निवांतपणा मिळतो तेव्हा आपण त्याला लगेचच कंटाळून काही काम शोधू लागतो. कोणत्याही कामाशिवाय, हेतूशिवाय आपण राहूच शकत नाही. आपल्याला सुट्टी हवी असते पण तीही कामाच्या दोन दिवसांच्या मध्ये आली असली पाहीजे. आपण स्वत:ला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही न करता राहणे हे आपल्याला केवळ अशक्य झालेले आहे कारण आपण सवयींचे गुलाम बनलेलो आहे.
मला कोणीतरी एकदा झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट सांगीतली होती.
एका निर्जन जंगलात एक साधारण कपड्यातला मनुष्य़ एका जांभळाच्य़ा झाडाखाली निवांत झोपलेला असतो. जवळून जाणा-या पायवाटेवरुन एक व्यापारी त्याला असा निवांत पडलेला पाहून थांबतो. थोडावेळ थांबून निरीक्षण केल्यावर त्या व्यापा-याला या मनुष्याविषयी दया येते. चार समजुतीच्या व खुप महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी त्याला तो उठवून जागे करतो. तो मनुष्य नाइलाजाने उठून बसतो तेव्हा हा व्यापारी त्याला म्हणतो,"अरे अक्कलशुन्य मनुष्या, मानवजातीला जन्माला येउन हा असा निवांतपणे पडला आहेस त्यापेक्षा काही काम का करत नाहीस?" मग तो मनुष्य विचारतो," काम केल्याने काय होईल?" व्यापारी म्हणतो," तुला खुप पैसा मिळेल, ज्यापासुन तुला बंगला गाडी खरेदी करता येईल, मस्त गाद्या वगैरे खरेदी करता येतील व मस्त आराम करता येईल, तू सुखी होशील." मग तो मनुष्य म्हणतो," महाशय खुप काम करुन खुप पैसा कमवून मग त्यानंतर सुखी होण्यापेक्षा व आराम करण्यापेक्षा मी आत्ताच सुखी आहे. आता आणि इथेच. आणि तुम्हाला पण तसेच सुखी होता येईल." असे म्हणून तो मनुष्य सुखाने पुन्हा आडवा झाला. व्यापा-याजवळ आता थांबायला वेळच नव्हता त्याला भविष्यातील आरामासाठी व सुखासाठी खुप पैसा कमवायचा होता व त्यासाठी खुप कष्ट करायचे होते. तो लेगेचच तेथुन मार्गस्त झाला.
त्या व्यापा-याच्या विचारांप्रमाने आज आपली स्थिती आहे. आपण आजमध्ये कधी जगूच शकत नाही. आपण फक्त उद्यामध्येच जगू शकतो. आपण धावत आहोत कशाच्यातरी मागे आणि आपला "आज" जगायचाच राहून जातो. आपल्या हे लक्षात येत नाही की ज्या उद्यासाठी आपण आज धावत आहोत तो उद्याही जेव्हा येईल तेव्हा तो ’आज’च्याच रुपात येईल आणि आपण तेव्हाही त्याला जगायचे 'मिस' करू.
तेव्हा आपण आजमध्येच जगायला शिकले पाहीजे. आत्ताचाच क्षण खरा म्हणायला हवा.

"क्योंकी, जिंदगी अभी और यहीं है."

हरी ओम तत्सत

Thursday, August 19, 2010

१४. भक्त देवाचा की फक्त मानाचा

आमच्या गावात दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताह साजरा केला जातो. त्या दरम्यान दररोज नामवंत लोकांचे प्रवचन किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. गावातील हौसे-गवसे-नवसे लोक त्याचा लाभ घेतात. कोण सायंकाळी प्रवचन ऐकायला जातो तर कोण रात्री किर्तनाचा आनंद घेतो. कांही नेहमीचेच माळकरी-वारकरी व नवीन विद्यार्थीवर्गातील मुले, तरुण, तरूणी ज्ञानेश्वरी पारायणाकरीता जमतात.

सातशे वर्षापुर्वी निर्मीत झालेल्या ज्ञानेश्वरीचे आजही त्याच भक्तिभावाने वाचन केले जाते. दरवर्षी नवनवीन लोक या कार्यक्रमात भाग घेतात. मीही दोनवेळा ज्ञानेश्वरी पारायण केले आहे. पण मला त्यादरम्यान काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा. जे लोक पारायणाला बसतात ते ज्ञानेश्वरीच्या अर्थापर्यंत कधीही पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. ज्याला त्याला सात दिवसात ज्ञानेश्वरी वाचून पुर्ण करणे हेच महत्वाचे वाटते. त्यातील अनुभवी लोक तर फास्ट वाचनाची चढाओढ करतात व नवीन लोकांना आपले कसब दाखवीन्याचा प्रयत्न करतात. पण त्यापैकी कोणाला दुसरा अध्याय कशा विषयी आहे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही.
वाचनाच्या मध्ये एक ब्रेक असतो त्या दरम्यान हे वाचक लोक एकमेकांच्या टींगला करण्यात गुंतलेले असतात. आपण येथे आहोत म्हणजे आपण पुण्यवंत आहोत असाच कांहीसा त्यांचा व्यवहार असतो.
इतकेच काय येणारे प्रवचनकारही त्याच वर्गातील असतात. प्रवचनाच्या ओवीत किंवा अभंगात निंदा करु नये, मानसा-मानसात भेदभाव करु नये असे असले तर ते खुप विस्ताराने पटवून सांगतात. आणि वर येथे आपले प्रवचन ऐकायला आलेले श्रोते हे पुण्यवान आहेत व बाकी सारे पापी आहेत हे अगदी किळसवान्या भाषेत सांगतात. येथे न आलेल्यांची निंदा नालस्ती करताना ते आपल्या प्रवचनाचा विषयही विसरतात.

मुळातच या लोकांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा आहे असं मला वाटते. फक्त कार्यक्रमाबद्दलच नव्हे तर त्यांचे भक्तीमार्गाकडे वळणेच चुकीचे आहे असे वाटते.

ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, भगवदगीता, रामविजयकथासार यांचे पारायण करण्यामागचा उद्देश त्यातून पुण्य मिळविणे हे नसून त्यांच्या वाचनातून व त्याच्या अनुनयातून आपल्या जीवनात बदल करणे हा आहे असं मला वाटतं. असत्त्याविरुध्द सत्त्याचा विजय दुर्गुनावर सदगुनांचा विजय यावर विश्वास दृढ व्हावा म्हणून हे ग्रंथ वाचाले पाहीजेत. आपल्या रोजच्या जीवनात चालण्याबोलण्यात योग्य तो बदल व्हावा म्हणून हे ग्रंथ हवेत. आपल्या बारीक सारीक निर्णयावर घटनांवर या ग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून हे ग्रंथ वाचले पाहीजेत.

पण जर हे लोक स्वत:ला मुळातच आदर्श व्यक्ती म्हणवून घेत असतील तर मग हे बदल कसे होणार? आपण दिवसातून एकदा मंदीरात जातॊ म्हणजे आपण इतरवेळी कांहीही करायला मोकळे असंही काही जणांना वाटतं. खुपदा हे लोक मंदीरात उभाराहून एकमेकांच्या आई-वडीलांचा उध्दारसुध्दा करतात. यांना हे अधिकार कोणी दिले? मला वाटते त्यांचे त्यांनीचे हे मानून टाकले आहे की आपण देवाचे लाडके आहोत आणि काही करायला मोकळे आहोत.

गुर्जिएफ नावाचा एक संत म्हणा किंवा एक महात्मा म्हणा होऊन गेला. त्याच्या आश्रमात प्रवेश करणा-यांना तो एक प्रश्न विचारत असे," तू स्वत:ला सज्जन समजतोस की दुर्जन?"
" सज्जन" असे उत्तर आले की तो त्या माणसांना हाकलून लावत असे. तो म्हणे की सज्जनांचे इथे काय काम ? इथे दुर्जनांनाच प्रवेश मिळेल. इथे येऊन स्वत:ला दुर्जन समजणारांचेच सज्जन माणसात रुपांतर होईल. सज्जनांनी आपआपल्या संसाराच्या किंवा स्वत:च्या मार्गाने चालावे त्यांचे इथे काय काम नाही कारण ते तर अगोदरच सज्जन आहेत.
तात्पर्य काय स्वत:ला कमी समजणारेच स्वत:ला बदलायला तयार असतात. हे आमचे लोक स्वत:ला अगदी पोहोचलेलेच समजतात मग ते कसे बदलनार. ते फक्त तोंडाने घोकंपट्टी करणार " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी". हा हरीपाठाचा अभंगसुध्दा ते स्वत:साठी म्हणत नाहीत तर तेसुध्दा दुस-यालाच मार्गदर्शन केल्याप्रमाने म्हणतात ," अरे, हरी चे नामस्मरण कर त्यामध्ये भरपूर पुण्य आहे." स्वत:साठी हा अभंग जर एकदाही म्हंटला असता तर दुस-याच्या बांधाचे गवत किंवा ऊस कुणी चोरुन कापला नसता, दुधात पाणी मिसळले नसते. ज्याच्या मुखी अखंड हरीचे नाम आहे तो वाईट काम करूच शकत नाही. जर तुम्ही भक्तिमार्गातले असाल तर ते तुमच्या प्रत्तेक कृतीतून चालण्याबोलण्यातून दिसते. एकदातर कोणत्या प्रवचनकारांना आमंत्रण द्यायचे यावरून चर्चा सुरु होती. तेव्हा अमुक एकाला बोलवू नका ’तो रांडचा लई ताटतोय’ अशा भाषेत त्यांची आरती करण्यात आली. पुढे तेच प्रवचनकार जेव्हा आले तेव्हा हेच लोक त्यांच्या पायावर डोके ठेवायला पुढे. हे आता बस्स झाले. आपण लोकांना मुर्ख बनवता बनवता स्वत:लाही मुर्ख बनवत आहोत हे या लोकांना कधी समजणार देवच जाणे.
(टीप: आमच्या गावातील सर्वच भक्तिमार्गातील लोकांविषयी वरील निरीक्षण खरे ठरेल असं नाही. कांही लोक आहेत ज्यांच्या भक्तिविषयी वा चांगुलपणा विषयी मनात शंकाही नाही पण मला मुख्यत: विसंगतीतच जास्त रस असल्यामुळे मी त्याबद्दल लिहीले आहेत.)

Tuesday, August 17, 2010

१३. देवाचीये द्वारी उभा क्षणभरी

येशु ख्रिस्तांनी एके ठिकाणी एक खुपच सुंदर गोष्ट सांगितली होती.
ती गोष्ट मी ओशोंच्याकडुन ऐकली. मला ती खुपच आवडली, तुम्हालाही आवडेल.

येशु ख्रिस्तांनी, भगवान बुध्दांनी अशा खुप लहान लहान कथा सांगितल्या होत्या ज्याद्वारे आपल्याला कांही इशारे (सिग्नल) दिले होते. ते इशारे धरुन आपण पुढे जायला हवे होते. त्यांनी बोटांनी चंद्र दाखविला, चंद्राकडे इशारा केला पण आम्ही त्यांचे बोटच पकडुन राहीलो. चंद्राचे सौंदर्य आपल्या ध्यानातच आले नाही. आपण त्यांचे बोटच धरले व आपल्याला चंद्र मिळाला असे म्हणू लागले. ओशॊ म्हणतात येशूने बायबलमधून किंवा पर्वतावरील भाषणांमधून दिलेले सिग्नल आपण पकडलेच नाहीत. आपण त्यांपेक्षा सोपे असे बायबल पकडून राहीलो.

आपल्याकडेसुध्दा अनेक संतानी अनेक जाती-धर्मामध्ये जन्म घेतला व मोक्ष मिळविला. अनेक संतानी अभंग, ओव्या, भारुडे रचली आपल्याला मार्ग दाखवीण्याचा प्रयत्न केला. अनेक भाषेत अनेक प्रकारचे सिग्नल आजही मिळत आहेत पण आपण ते पकडत नाही. आपण त्याच त्या पंडितांनी किंवा भटा-बामणांनी सांगितलेल्या, परंपरेने आलेल्या,  सत्यनारायणाच्या , वैभवलक्ष्मीच्या,  चाली-रितीच्या व्यर्थ गोष्टीत अडकलेलो आहोत.

कथा खुपच सुंदर आहे.

एकदा एक शहरात एक सधन जमिनदार राहत असतो, ज्याची शेती आसपासच्या ब-याच खेड्यात असते. जमीनदार वंशपरंपरागत सधन व सुखी असतो पण आपल्या व्यापात गुंग असतो. त्यामुळे इच्छा असुनही त्याला आपल्या शेतीसाठी खुपसा वेळ मिळत नाही.

सुगीच्या काळात एके दिवशी तो आपल्या एका शेतावर गेला. शेतावर पोहोचताच त्याला लक्षात आले की आपले पिक कापणीस आले असून ते लवकरच कापुन घ्यायला हवे.
त्याने आपल्या दिवानजीला बोलावून लगेचच सांगीतले की गावातील मिळतील तेवढी मजूर घेउन आलेले पीक कापून घे. दिवानजीने त्याच दिवशी गावात सर्वांना हा निरोप दिला.
जमीनदार हा खुपच दानशुर म्हणुन प्रसिध्द होता त्यामुळे गावातील खुपशे लोक कापणीसाठी सकाळी लवकर पोहोचले.
काही लोकांना ही खबर उशीरा पोहोचली ते थोडे उशीरा पोहोचले.
काहींना आणखी दुसरे काम होते ते थोडे अधीक उशीरा, कांही अगदी संध्याकाळी कामावर पोहोचले. तर कांही काम संपल्यावर पोहोचले.

काम एका दिवसातच संपले.
काम संपल्यावर जमीनदार मोबदला वाटण्यासाठी उभा राहीला. त्याने सरसकट सर्वांना एकाच मापाने पण भरभरुन धान्य वाटले. लोकांकडे न्यायला साधने कमी पडली पण देण्यात कमतरता आली नाही.
वाटप संपल्यावर दिवाणजीने जमीनदाराला विचारले की प्रत्तेक मजुराच्या कामावर पोहोचण्याच्या वेळा वेगवेगळ्या असूनही आपण सर्वांना एकाच मापाने वाटप केलेत, असं का?

तेव्हा जमीनदार म्हणाला," दिवानजी तुम्हालाही हे कळू नये याचे मला आश्चर्य वाटते, जर मला सर्वकांही वाटून टाकायचे आहे तर मला त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच काय? " माझ्याकडे इतके आहे की मला ते वाटताना कमी-जास्त करावयाची गरजच नाही."

ही कथा इशारा करते परमेश्वराच्या उदारतेकडे, त्याच्या कृपाप्रसादाकडे, त्याच्या न्यायाकडे. त्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होईल असे मला तरी वाटत नाही. एक साधा जमीनदार जर देताना भेदभाव करत नाही तर तो तर सा-या जगाचा राजा आहे तो कशाला करेल?

जर तो भेदभाव करत नाही मग इथे आपण कशाला भेदभाव करतो. मी दररोज देवळात जातॊ, मी एवढे उपवास केले, मी एवढे नारळ फोडले,  मी अस्तिक आहे,  तो नास्तिक आहे. असा टेंभा मिरवण्याची कोणी गरज नाही.  मी माळकरी आहे, मी अमुक पंथाचा आहे, मी साधक आहे मी फकीर आहे हा टेंभा आता पुरे झाला. मी ओम शांती मंडळात जातॊ, मी ब्रम्हाकुमारी मधे आहे नी मी स्वामी समर्थाच्या आरतीला जातो हा दंभ आता सोडला पाहीजे.

हिंदू-मुसलमान, ख्रिस्त-जैन, भारतीय-अमेरिकन, शाकाहारी-मांसाहारी, दारुडा-बेवडा, हरीभक्तपरायन, आस्तिक-नास्तिक, गरिब-श्रीमंत, ब्राम्हण-योगी, ध्यानी-त्यागी, संसारी-परमार्थी हे सर्वच जण तेथे पोहोचणार आहेत, कारण पोहचण्याची दुसरी जागाच नाही. सर्वांचीच झोळी भरणार आहे. देणारा देत आहे. 

तर मग उशीर झाला असला तरी हरकत नाही, कधीही त्याच्यासमोर झोळी पसरा, देणारा तयारच आहे.

" देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या."

Saturday, August 14, 2010

१२. कुत्ता है तो भोकेगाही !

आपण रोजच्या जीवनात पाहतो की प्रत्तेकजन दुस-याला काही ना काही उपदेश देतच असतो.
यापैकी एकतरी सुचना-उपदेश ऐकल्याशिवाय आपला दिवसच संपत नाही.
पहाटे लवकर उठून थोडातरी व्यायाम करावा, निदान चार सुर्यनमस्कार तरी घालावेत.
मांसाहार वर्जच करावा किंवा टाळलेलाच बरा.
दारु, सिगारेट, तंबाखु इ पासुन दुरच रहावे.
दातात काडी घालू नये.
गाडी सावकाश चालवावी.
बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.
सारखा टिव्ही पाहू नये.
इत्यादी इत्यादी.
या सर्व सुचना आपण पुर्वी ऐकलेल्या असतातच पण आपण प्रयत्न करुनही नेहमी त्या पाळु शकत नाही.
उपदेश करणा-याचे काम सोपे असते ते म्हणजे फक्त उपदेश करायचा. तो स्वत: अमलात कितपत आणतो हे कोण लक्षात घेत नाही.
पहाटे लवकर उठावे असा सल्ला देणारे स्वत: ८ वाजता उठत असतात किंवा पहाटे उठून दुस-याच्या साखरझोपेचे खोबरे करतात व दुपारी तासभर मस्त ताणुन देतात.
तात्पर्य काय उपदेश करणा-याची जबाबदारी ही उपदेश करण्यापुर्तीच मर्यादीत असुन, उपदेश पाळणे हे कोणावरच बंधनकारक नसते.
सिगारेट किवा गुटख्याच्या व्यसनाप्रमाणे उपदेश देणे हे काही उपदेश करणा-यांचे एक व्यसनच बनलेले असते. त्यांना उपदेश केल्याशिवाय चैनच पडत नाही.
आमच्या एका सरांच्या घराचे काम चालू होते. सरांना उपदेश देण्याचे सरकारी परमीट अगोदर होतेच पण स्वत:च्या घराचेच काम सुरु असल्यामुळे हक्काचे साधनच उपलब्ध झाले होते. कामावरचे गवंडी बिचारे त्यांच्या ताब्यात सापडले.
ते अगदी वर्गावर येण्याचे चुकवून त्या आपल्या नव्या शिष्यांना शिकवू लागले. ही वीट चांगली , ती नाही. ती वीट तिथे बसवा ही वीट इथे बसवा. असं त्यांना अगदी वीट येईतो उपदेश केला.
ते शिष्य या शिकवणीमुळे बिथरुन गेले काही दिवसांनी त्यांनी काम तिथेच ठेउन या शाळेला दांडीच मारली. मग सरांचे डोळे उघडले.
पंधरावीस दिवसांनी त्या गवड्यापैकी एकजन सरांना भेटला. तेव्हा त्याने सरांना म्हणाला "सर, तुम्हाला इतकी सगळी माहीती आहे तर मग तुम्ही स्वत:च का ते घर बांधत नाही?" सरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तात्पर्य काय ज्याचे काम त्यानेच करावे. प्रत्तेकजन आपपल्यापरीने विचार करतच असतो व काळजीही घेत असतो.
दुसरे व्यसन एखादेवेळेस सुटेल पण उपदेश देण्याचे व्यसन कधीही सुटत नाही. दुस-या व्यसनाच्या बाबतीत व्यसनी मानसाच्या मनामध्ये एक कमीपणा किंवा पश्चातापाची किंवा चुकलेपणाची भावना असते पण उपदेश करणारा हा उपदेश करणे हे स्वत:चे कर्तव्य व हक्कच समजत असतो. त्याबद्दल त्याच्या मनात कोठेही शंका उत्पन्न होत नाही.
ओशोंनी याचसंबंधाने एक चुटका सांगितला होता.
एका शहरात कुत्र्य़ांची संख्या खुप असते आणि या वाढलेल्या संखेमुळे आता त्या कुत्र्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत असे. कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणे होत असत. एका गल्लीतील कुत्री एकत्र येउन दुस-या गल्लीतील कुत्रांच्याबरोबर भांडत असत. ही भांडणे सॊडवण्यासाठी एक दादाही त्यांच्यामध्ये असतो. हा दादाकुत्रा वयाने जेष्ठ व ताकदवान तसेच नितीवान असतो. तो कधीही कुठल्या कुत्रीमागे फिरताना कुणी पाहीला नाही. तो आजीवन ब्रम्हचारी आहे असं म्हणतात. तो मेलेली जनावरे पण खात नाही. असा हा कुत्रा म्हणजे एक आदर्श संतच होता. तो नेहमी चौकात उभा राहून बाकीच्या कुत्र्यांना ज्ञान, अध्यात्म इ. विषयावर काही ना कांही भाषण देत असे. हे भाषण मुख्यत: रात्रीचे असावयाचे आणि या अध्यात्मिक भाषणाचा तिथे राहणा-या इतर नास्तिक मनुष्यवर्गास खुप त्रास होत असे. कधी कधी हा त्रास वाढत गेल्यामुळे तेथिल लोकांनी या अध्यात्मीक कार्यात विघ्नेही आणली.
कालांतराने या दादाकुत्र्याचा शिष्यवर्गही वाढू लागला. ते शिष्यही मग आपआपल्या चौकात उभा राहून हे आध्यात्मिक कार्य करु लागले. त्यांच्या प्रवचनांमध्ये नेहमी ब्रम्हचर्य, ध्यान, नैतिकता इ. गोष्टींचा पुरस्कार असे. इतर कुत्री हे प्रवचन मन लावून एकत असत तसेच त्याला दाद देता देता स्वत:ही त्या कार्यात सामील होत असत.
आतातर कुत्र्यांच्या या सामुहीक अध्यात्मिक क्रांतीचा त्या सबंध शहराला त्रास जाणवू लागला.
संध्याकाळ होताच एखाद्या चौकातून कुत्र्याचे ओरडणे सुरु होई पाठोपाठ सर्वच चौकातून त्याला अनुमोदन मिळायला सुरु होई. सर्व शहरच या कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे दणाणुन जात असे.
सर्वत्र वाढत जाणा-या या प्रवचनकार व अनुयायांच्यामुळे होणारा गोंगाट आता दादाकुत्र्यालाही असहनीय झाला. या अशा सिच्युएशनमध्ये हे असेच सुरु राहणे पुर्ण कुत्रासमाजाच्या उन्नतीस अडचणीचे ठरणार आहे हे फक्त दादाकुत्र्याच्या ध्यानात आले.त्याने ताबडतोब एक सभा बोलाविली व सभेत एक ठराव केला जो सर्व कुत्र्यांना बंधनकारक होता. त्या ठरावानुसार कोणत्याही कुत्र्याला रात्री सात वाजल्यानंतर ओरडता येणार नव्हते. ठराव पास झाला कारण सभा भर दुपारी घेण्याते आली होती. पण संध्याकाळ होताच सर्वांची पंचाईत झाली. सात वाजताच चूळबूळ वाढू लागली.
प्रत्तेक कुत्र्याला ऒरडावेसे वाटू लागले पण ठरावामुळे व दादाकुत्र्याच्या दहशतीमुळे सर्वजन गप्प होते. जणू रात्रीचे ओरडणे म्हणजे अधार्मिक कृत्यच होते, नीतीमत्तेला सोडून होते. इतक्यात कुठुनतरी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याला कोणीतरी साथ दिली आणि पाठोपाठ सर्व कुत्री पुन्हा भुंकू लागली. ओरडण्यामुळे सारे शहर गोंगाटाने भरुन गेले.
दुस-या दिवशी त्या पहिल्यांदा ओरडणा-या कुत्र्याला पकडून पाच दिवस न खाजवता चौकात बसुन राहण्याची जाहीर शिक्षा देण्यात आली. त्यामुळे सर्व कुत्र्यांनी पुन्हा न ओरडण्याचे गांभिर्याने ठरवले.
दिवसभर काही नाही झाले तरी संध्याकाळ होताच सर्व कुत्र्यांना आपल्या घशात कांहीतरी अडकल्याची भावना व्हायची. काही झाले तरी ओरडावेच असे वाटायचे.
दुस-या दिवशीही रात्र होताच पुन्हा येरे माझ्या मागल्या असेच झाले. एक कुत्रा भुंकला पाठोपाठ सर्वजण ओरडू लागले. तिस-या दिवशीही काही कुत्र्यांना अगोदरपेक्षाही जबर शिक्षा सुनावण्यात आल्या. दादाकुत्र्याने पुन्हा सगळ्यांना आपल्या आधिकारवाणीने धमकविले व चार नीतीच्या गोष्टी सांगितल्या.
तिस-यादिवशी संध्याकाळी सर्व कुत्र्यांनी तोंडाला कुलुपच लावले. रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी कुठुनही आवाज आला नाही. प्रत्तेक कुत्र्याला खवखवू लागले, काही करुन ओरडावे असे वाटू लागले. पण शिक्षा खुपच कडक व नितीच्या विरुध्द जाउन ओरडण्याचे धाडस कोणाला होईना. रात्रीचे अकरा वाजले तसे सर्वच कुत्र्यांची पंचाईत झाली अगदी दादा कुत्र्याचीपण. कारण आतापर्यंत इतर कुत्र्यांच्या गोंगाट सुरु होताच हा दादाही अंधाराच फायदा घेउन आपला घसा साफ करुन घेत असे. आज सर्वात जास्त त्याचीच पंचाईत झाली कारण प्रवचन देणे उपदेश करणे ही त्याची सर्वात जुनी सवय होती. आणि कुत्रा हा सवयीचा गुलाम असतो. फार वेळ त्याला कढ निघाला नाही शेवटी अंधारात जाऊन त्या दादा कुत्र्यानेच पहीली आरोळी ठोकली. पाठोपाठ त्याचे अनुयाई भुंकू लागले पुन्हा शहर दुमदुमु लागले. मगच सर्व कुत्र्यांना समाधान वाटले.
कुत्रा आणि भुंकत नाही म्हणजे काय? दिवसाचे ठीक पण रात्री ? केवळ अशक्य "कुत्ता है तो भोकेगा जरुर !"
त्याच प्रमाणे या उपदेशपर प्रवचन देणा-यांचे आहे. दिसला मानुस की दे प्रवचन. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई एकच परमेश्वर आहे असे प्रवचन देणारा कोणता प्रवचनकार कासवछाप मच्छर अगरबत्ती वापरत नाही? भुंकणारा कुत्रा दिसताच कोण दगड हातात घेत नाही?

तात्पर्य काय तर " आदमी अगर कुत्ता है तो भोकेगा जरुर!"
आपण मनुष्य आहोत तर मानवाप्रमाणेच वागणार. चूका करणार, खोटे बोलणार, आळस करणार, कामे टाळणार इ. इ.
मला वाटते प्रत्तेकाने मशिनप्रमाने अचूक सरळ रेषेत राहण्यापेक्षा स्वाभाविकपणे वागावे जे जास्त जिवंतपणाचे लक्षण आहे. कधी थोडा आळस करावा कधी लवकर उठुन व्यायाम करावा. कधी भर रस्त्यावरुन गाडी सुसाट सोडावी कधी सिगारेटी मागून सिगारेट ओढाव्यात तर कधी तमाश्याला जाऊन दंगा करावा. भडक कपडे घालावेत तर कधी धोतर नेसावे.
नाहीतर मग संदीप खरेंच्या कवितेसारखे म्हणावे लागेल, "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेधसुध्दा साधा कधी नोंदवलेला नाही. .... मी मनातसुध्दा माझ्या कधी दंगा केला नाही. "
आयुष्य़ संपुन जाईल आणि मग जगायचेच राहून जाईल.
हा पण एकप्रकारचा उपदेशच झाला, माफ करा.
आज इतकेच . . .

Wednesday, May 19, 2010

९. पुन:श्च हरी ओम !

आज जगात जवळपास सर्वच धर्मांची वाताहत झाली आहे. एका नवीन धर्माची निर्मीती होणे खुप गरजेचे झाले आहे. नवीन धर्म जो प्रत्तेकासाठी सुटेबल असेल. नवीन धर्म हा आतापर्यंतच्या धर्मांसारखा सार्वजनिक नसेल तर नवीन धर्म पुर्णत: वैयक्तिक स्वरुपाचा असेल. त्यामध्ये नवीन मंदिराची गरज भासनार नाही, नवीन देव निर्माण होणार नाही, नवीन पंथ निर्माण होणार नाहीत, उच्च-नीच असा भेदभाव नसेल, पुजारी, भट, पंडित नसणार. नवीन धर्माची फक्त एकच दिक्षा असेल एकच संदेश असेल तो म्हणजे "आनंदी रहा".
आनंदी राहणे खुप सोपं आहे.
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण खुष होतो, आनंदी होतो. त्या आनंदी राहण्याला कोणतेही कारण नव्हते. आनंदी राहण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही. कारण आनंद हा आपला स्थाईभाव आहे. जसजसे आपण मोठे होत आलो तसतसे आपण दु:खी होत गेलो कारण आपण दु:खी राहण्यासाठीची कारणे शोधु लागलो. आणि या दु:खी राहण्यालाच धर्माचे नाव दिले गेले. आपल्याकडे पैसा नाही म्हणून दु:खी, अमुक कंपनीची कार नाही म्हणून दु:खी, आपण काळे आहोत म्हणून तर कोण आपण बुटके आहोत म्हणून, कोणाला घर पाहीजे कुणाला पद प्रतिष्ठा पाहीजे म्हणून दु:खी. या सर्वाच्या उलट आपले धर्माचे तत्वज्ञान पैसा सोडा, पद सोडा, त्याग करा इ.इ. मग आपण आनंदी कसे राहू. परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे ते असे दु:ख करत बसण्यासाठी नक्किच नाही. त्याने अगदी गवताच्या फुलापासून हत्ती सारख्या महाकाय प्राण्यापर्यंत सर्वांच्यासाठी हे जग निर्माण केले आहे व त्या जगात सर्वांच्या गरजांची काळजी घेतली आहे.
" रख्खा है पास रहने में क्या, रख्खा है आस रखने में क्या,
एक आदतसी पड गयी है, वरना रख्खा है उदास रहने में क्या!"

आपल्याला उदास राहण्याची सवय लागलेली आहे. आपण दु:खाला सोडण्यास तयार नाही. आपण आपल्या दु:खांना ग्लोरिफाय करत आहोत. म्हणून आपल्या देशात तथाकथित साधेपणावर भर दिला जातो.


एकदा चंदूलाल मारवाडी आयुष्याभर पैसा कमावून (पै ला पै जोडून) सरतेशेवटी दुनिया पहायला लंडनला गेला होता. तिथे सात बंगला टाइपची एकाला लागुन एक अशी सात गगनचुंबी इमारतींची रांग पहात असताना चंदुलालचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. या इमारती बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला असेल. तो पैसा कधी साठवला असेल. आपल्या आयुष्याची सारी जमापुंजी एकत्र करुनसुध्दा या इमारतीमधील एखादी खोलीतरी खरेदी करु शकू का? हा विचार करत असताना त्याने एका फिरंगी मानसाला एका पाठोपाठ एक अशा सिगार ओढताना पाहिले. तो इंग्लिश जंटलमन आपल्याच आनंदात गुंग होता. तीन-चार सिगार संपल्यानंतर चंदुलालची सहणशीलता संपली. त्याने विचार केला हा मनुष्य किती मुर्ख आहे आपला पैसा या शुल्लक सिगार फुकण्यासाठी वाया घालवतो आपण त्याला काही चांगले प्रगतीचे ज्ञान शिकवायला हवे. साधेपणाचे महत्व पटवून द्यायला हवे. चंदुलाल त्याला म्हणाला "महोदय, मी बराचवेळ आपले निरिक्षण करतोय आणि माझा असं ध्य़ानात आलं आहे की आपण सिगार ओढण्यासाठी खुपच पैसा खर्च करता, जर हाच पैसा आपण जमा केला असता तर या इमारती पैकी एकतरी इमारत आपली झाली असती." त्यावर तो जंटलमन उत्तरला की या सर्व इमारती मी स्वत: उभा केल्या आहेत, व त्या माझ्याच मालकीच्या आहेत. तुमच्या मालकीच्या किती इमारती आहेत?, तुम्ही आतापर्यंत किती पैसा साठविला आहे?" हे ऐकून चंदुलालचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
आपल्य़ाकडे हे असंच होतं. आपली गरीबी आपण आपल्या स्वनिर्मित तत्वज्ञानाच्या खाली लपवू पाहत असतो. पण आतून आपण दु:खीच असतो. पैसेवाल्यांचा द्वेषच करत असतो. फक्त वरच्या मनाने म्हणायचे की जग भौतिक सुखाच्या मागे लागले आहे पण आम्ही अध्यात्मिक सुखाची अनुभुती घेत आहोत. हे लोक आपल्याच चक्रव्युहात अडकलेले आहेत. त्यांच्याकडे ना पैसा आहे ना आध्यात्म आहे. ते ना विज्ञानाला मानतात ना त्यांना अध्यात्माचा गंध आहे.

कोल्हापूरला काही वर्षापुर्वी एक जैन प्रवचनकार आले होते. त्यांना जैन लोक खुप मानायचे त्यांना क्रांतीकारी संत म्हंटले जाते. ते जैन धर्माचे कट्टर अनुयायी आहेत असं लोक म्हणतात. त्यांच्या सेवेला आमदार, खासदारपासुन क्लासवन अधिकारी लहान थोर असे हजारो लोक हजर होते. ते अंगावर कोणतेही वस्त्र वापरत नाहीत, कंगवा वापरत नाहीत, केस कापत नाहीत, चपला वापरत नाहीत (बहूतेक पादुका वापरत असावेत), फक्त एकदाच अन्न म्हणून काहीतरी प्राशन करतात, एकभुक्त आहेत इ. इ. अशा या महापुरषाला एक आजार झाला तेव्हा मात्र डाक्टरकडे धावाधाव झाली. डाक्टरांनी त्या महात्म्यांना एका शस्त्रक्रियेचा सल्ला दिला व शस्त्रक्रियेशिवाय तरणोपाय नाही असे सांगितले. तेव्हा या महाशयांच्या समोर यक्षप्रश्न उभा राहीला. आपण तर शरिरापेक्षा आत्म्याचा पुरस्कार करणारे, भौतिक सोडून आध्यात्माकडे लोकांना वळवणारे, आपण एवढे मोठे त्यागमुर्ती, त्यागाविषयी एवढी प्रवचने दिली, आपली साधी राहणी ज्यामुळे एतके लोक आपल्याला मानतात मग ही शस्त्रक्रिया करणे म्हणजे शरिराला म्हणजेच भौतिकालाच आपण महत्व दिल्यासारखे झाले असे त्यांना जानवू लागले. यावर त्या त्यागमुर्ती क्रांतिकारी संताने एक महिण्याचा लांबलेला आपला मुक्काम गुंडाळून लगोलग मुंबई गाठली.
काही दिवसांचे सोबती असणारे हे मुनी आजही टीव्ही चैनलवर आपले क्रांतीकारी विचार ऐकवत असतात. परवा ते एका प्रवचनात कैकयी ही कौशल्यापेक्षा कशी महान होती हे सांगत होते. कैकयी ही युध्दामध्ये आपल्या करंगळीने रथाचे चाक पकडून दशरथासाठी कसा त्याग करते, आपल्या शरिरापेक्षा त्यागाला कसे महत्व देते हे ते पटवून देते होते आणि समोर हजारो लोक ते ऐकुन धन्य होत होते. आणि कदाचीत या प्रवचनासाठीच या महोदयांनी आपल्या कित्तेक वर्षांची तपश्चर्या सोडून शस्त्रक्रिया करुन घेतली असेल. किती मोठा त्याग?

हे सगळं सोडण्याची वेळ आता आली आहे.
आता कोण किती त्याग करतो हे पहायचं बंद केले पाहीजे. आपला पुरानकाळ सोडला पाहिजे, राम, कृष्ण, अर्जुन, बुध्द, महावीर या आपल्या पुर्वजांचा वारसा सांगणे आता बंद केले पाहीजे. ते या देशात कधीकाळी जन्मले होते हे आता आमच्याकडे पाहून कोणालाही पटनार नाही.

आता वेळ आली आहे नवी सुरवात करण्याची.

पुन:श्च हरि ओम !

Monday, May 10, 2010

८. ते असंही असू शकतं....

सावधान धर्माचे राज्य येणार आहे- याचा पहिला भाग लिहिला पुढे याच विषयावर खुप काही लिहायचे असे प्रयोजन होते. मनात खुप सारे विचार होते. पण अचानक पुढे लिहीण्याचे बंद करावे असे वाटू लागले. मला पुढे काय करावे असा प्रश्न पडला. विषय तर सुरु केला होता त्याला व्यवस्थित उत्तरार्धापर्यंत नेणे महत्वाचे होते.
पण पुढे जाताना मला दुसरेच विचार सतावू लागले. मी जसा विचार करतो तसा लिहू शकतो का? कारण विचार करणे आणि ते कागदावर/स्क्रिनवर उतरवणे या भिन्न प्रक्रिया आहेत. आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवणे हे खुप अवघड काम आहे. आपण जे जे व्यक्त करु ते ते असत्य होवून जाते. आपण सांगतो एक आणि समोरचा ऐकतो दुसरेच. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" लोकांनी ऐकले काय तर पुण्याची गणना कोणी करत नाही तर हरीचे नाव कशाला घ्या. ते ज्ञानेश्वरांचेच सांगणे पुढे पास करतात की "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" आपण हरीचे नाव घ्यावे असं कोणाला वाटत नाही. तर आपण घेतलेले हरीचे नाव दुस-याला ऐकू कसे जाईले याचीच जास्त चिंता लागून राहते. आपण कसे हरीभक्त आहोत हे दुस-याला पटवून सांगण्याकडेच सर्वांचा ओढा असतो. मग आपण ज्या मार्गातून भक्ती करतो तोच कसा श्रेष्ठ हे दाखवले जाते. आपला पंथ वाढवण्यासाठी कष्ट घेतले जातात. मोठमोठे जाणकार आणून त्यांची छाप आजूबाजूच्या लोकांवर पाडली जाते. पण हरीचे नाव घ्यावे आणि आपले काम नेकीने करावे असे कोणास वाटत नाही.
या लोकांना आत्ताची चिंता नाही हे आत्ता सुखी आहेत. पंढरपुरला जातात, अक्कलकोटला जातात, वैष्णोदेवीला जातात, कैलास, अमरनाथ, काशीला जातात. पण एक गरीब मनुष्य आर्थिक विवंचणेतला मनुष्य अशा यात्रा करेल काय? आणि यात्रेला जाउन काय मागायचे? आणखी पैसा? एवढ्या दूर यात्रेला गेलेला कोण " पसायदान" तर मागणारच नाही. ते आपल्या हक्काचे पुण्यच मागतील. हे लोक इथले सर्व सुख सोडायला तयार आहेत पण त्यांना स्वर्गात स्थान हवे आहे. इथल्या रुपयाच्या बदल्यात त्यांना स्वर्गातील चलन हवे आहे. म्हणून दान-धर्म, पुजा-पाठ, मंत्र-यज्ञ सर्व काही. हे लोक दान जरी केले तरी दानाची रक्कम मोजून ठेवणार आणि प्रत्तेकाला ती सांगत सुटणार. जर एखादा म्हणाला की मी या मंदीरासाठी एक लाख रु. दिले. तर त्याने ते दिलेलेच नाहीत. जर ख-या अर्थाने दिले असते तर तो हे लगेच विसरुन गेला असता. तो हे विसरत नाही आणि कुणाला विसरुही देत नाही. तो संगमरवरी दगडावर नाव कोरुन ठेवू इच्छितो की अमूक या महान दानशूराने एक लाख रु. देवासाठी दिले. असे लोक काही दान वगैरे देत नाहीत ते फक्त एक्सचेंज करतात. फ़ोरेक्स सारखे रुपयाच्या बदल्यात पुण्य प्लस प्रसिध्दी मान इ. इ.
संत ज्ञानेश्वरांना याची कल्पना होती म्हणूनच ज्ञानप्राप्ती होवूनही ते प्राप्त झालेले ज्ञान शब्दबध्द करण्यास तयार नव्हते. स्वत: गुरु निवृत्तीनाथांनी त्यांना आदेश दिल्यावरच ते गितेवर मराठीतून भाष्य करण्यास तयार झाले.
कोणताही ज्ञानी पुरुष आपले ज्ञान दुस-या पर्यंत शब्दरुपाने पोहचवू शकत नाही. ते फक्त इशारे करु शकतात आणि शिष्यानी ते इशारे पकडून त्यानुसार जायचे असते.
गौतम बुध्द जेव्हा बुध्दत्वाला प्राप्त झाले तेव्हा ते कितीतरी काळ मौनातच होते. प्रत्तेक्ष देवांनी त्यांची विनवणी केली की हजार हजार वर्षातून एखादा बुध्द जन्मतो तेव्हा आमच्यावर कृपा करा व काही उपदेश करा. तेव्हा कुठे बुध्द उपदेश करण्यास तयार झाले.
तात्पर्य काय, आपले विचार शब्दबध्द करणे हे अगदी अशक्यप्राय काम आहे.
त्या ज्ञानवंतांची ही गोष्ट तर मजसारख्या पामराची काय कथा ?

Friday, March 19, 2010

३. लेक्चर द्यायला जाताना...

एखाद्या वेळेस कांही श्रोत्यांसमोर आपल्याला व्याख्यान देण्याची वेळ आली तर आपण काही गोष्टी लक्ष्यात ठेवायला हव्यात. उदा. १) जेवढे लोक जास्त जेवढी श्रोत्यांची संख्या जास्त तेवढ्या कमी प्रमाणात आपण बुध्दीला ताण देणार्या गोष्टी केल्या पाहीजेत. हे प्रमाण तसे व्यस्तच म्हणावे लागेल कारण जमावाला मेंदू नसतो (पण हात असतात.) जमाव मोठा असेल तर हलक्याफुलक्या विषयावर बोलले पाहीजे. आपण एक हजार लोकांसमोर जर फ्राइडच्या सायकोअनालेसीसवर चर्चा करू लागलात तर १) हळूहळू सर्वसभाग्रह रिकामे होईल. २) लोक लवकरच टाळ्या वाजवू लागतील व आपल्याला व्याख्यान आवरते घ्यावे लागेल. ३) तिसरा पर्याय कोणाच्याही वाट्याला न आलेला बरा. तर सांगन्याचा मुद्दा असा की लोक जास्त तर त्यांच्या मेंदूच्या प्रमाणातच विषयविस्तार हवा. उगाच फापटपसारासुध्दा काही उपयोगी नाही.
२) जमाव मोठा असेल तर असा विषय निवडावा की त्यामूळे काहीतरी क्रियेटीव्ह फोर्स निर्माण होइल ज्याद्वारे काही तरी चांगले काम मार्गी लागेल. उदा. प्रदुषण, विजेचा वापर, उर्जेचा वापर, निसर्गाची संगत, मतदान, इ.इ.
३) विषय निवडताना असा विषयसुध्दा निवडता येइल जो रोजच्या जीवनात सर्वांना येणारा अनुभव असेल पण ज्याविषयी कोणी आजपर्यंत गांभिर्याने विचार केला नसेल. त्या विषयावरील विवेचनामूळे लोकांची विचार करण्याची दिशा बदलून जाइल. उदा. थूंकणे, हास्य, इंतजार, अहंकार, आदर, राग, व्यवसाय, बचत, छंद, इ. इ.
४) आणखी एक छोटीपण महत्वाची गोष्ट आपण ज्या श्रोत्यांसमोर व्याख्यान देत आहात त्यांच्याविषयी आपल्या मनात आदर ठेवा. कारण जरी श्रोत्यांच्यामध्ये बसलेले असले तरीही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असे कितीतरी विद्वान तेथे उपस्थीत असतील.
अगदी आपण एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात देखील बोलत असलात तरी हे लक्षात ठेवा की हिच लहान मुले पुढे जाउन खुप प्रगल्भ होणार आहेत, विचारांनी आणि अनुभवांनीसुध्दा. अशी मुले आपले व्याख्यान लक्षात ठेवतात. तेव्हा वयाने लहान असोत की मोठे सर्वच श्रोत्यांचा आदर करा व वडिलकीच्या नात्याने बोलण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने बोला.
तुमचे विचार सांगू नका ते लादल्यासारखे होइल त्यापेक्षा तुमच्यासोबत त्यांना विचार करायला लावा. त्यांना निर्णयात सामिल करून घ्या. तुमचा निर्णय लादू नका. लोक टाळ्या वाजवून निघून जातात पण ऐकलेले काही आचरणात आणत नाहीत असे होता कामा नये. लोकांना आपण मांडलेल्या विषयावर निर्णय घेण्यास भाग पाडा. त्यांनी स्वत: घेतलेल्या निर्णयावरच लोक अम्मल करतात. तुमचा निर्णय काही अंतिम नाही. लोक आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. आपण फक्त प्रयत्न करावा की खुपसारे प्रश्न आहेत ज्यावर विचारपूर्वक निर्णय झालेला नाही, त्यावर विचार करायला लावा निर्णय घ्यायला लावा. शतकानुशतके लोक दुसर्याच्या विचाराने दुसर्याच्या निर्णयावर अमल करत आहेत. कोणीतरी खुप वर्षापूर्वी निर्णय घेतले आहेत त्यांचे आता नुतनीकरण झाले पाहीजे.