आमच्या गावात दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताह साजरा केला जातो. त्या दरम्यान दररोज नामवंत लोकांचे प्रवचन किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. गावातील हौसे-गवसे-नवसे लोक त्याचा लाभ घेतात. कोण सायंकाळी प्रवचन ऐकायला जातो तर कोण रात्री किर्तनाचा आनंद घेतो. कांही नेहमीचेच माळकरी-वारकरी व नवीन विद्यार्थीवर्गातील मुले, तरुण, तरूणी ज्ञानेश्वरी पारायणाकरीता जमतात.
सातशे वर्षापुर्वी निर्मीत झालेल्या ज्ञानेश्वरीचे आजही त्याच भक्तिभावाने वाचन केले जाते. दरवर्षी नवनवीन लोक या कार्यक्रमात भाग घेतात. मीही दोनवेळा ज्ञानेश्वरी पारायण केले आहे. पण मला त्यादरम्यान काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा. जे लोक पारायणाला बसतात ते ज्ञानेश्वरीच्या अर्थापर्यंत कधीही पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. ज्याला त्याला सात दिवसात ज्ञानेश्वरी वाचून पुर्ण करणे हेच महत्वाचे वाटते. त्यातील अनुभवी लोक तर फास्ट वाचनाची चढाओढ करतात व नवीन लोकांना आपले कसब दाखवीन्याचा प्रयत्न करतात. पण त्यापैकी कोणाला दुसरा अध्याय कशा विषयी आहे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही.
वाचनाच्या मध्ये एक ब्रेक असतो त्या दरम्यान हे वाचक लोक एकमेकांच्या टींगला करण्यात गुंतलेले असतात. आपण येथे आहोत म्हणजे आपण पुण्यवंत आहोत असाच कांहीसा त्यांचा व्यवहार असतो.
इतकेच काय येणारे प्रवचनकारही त्याच वर्गातील असतात. प्रवचनाच्या ओवीत किंवा अभंगात निंदा करु नये, मानसा-मानसात भेदभाव करु नये असे असले तर ते खुप विस्ताराने पटवून सांगतात. आणि वर येथे आपले प्रवचन ऐकायला आलेले श्रोते हे पुण्यवान आहेत व बाकी सारे पापी आहेत हे अगदी किळसवान्या भाषेत सांगतात. येथे न आलेल्यांची निंदा नालस्ती करताना ते आपल्या प्रवचनाचा विषयही विसरतात.
मुळातच या लोकांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा आहे असं मला वाटते. फक्त कार्यक्रमाबद्दलच नव्हे तर त्यांचे भक्तीमार्गाकडे वळणेच चुकीचे आहे असे वाटते.
ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, भगवदगीता, रामविजयकथासार यांचे पारायण करण्यामागचा उद्देश त्यातून पुण्य मिळविणे हे नसून त्यांच्या वाचनातून व त्याच्या अनुनयातून आपल्या जीवनात बदल करणे हा आहे असं मला वाटतं. असत्त्याविरुध्द सत्त्याचा विजय दुर्गुनावर सदगुनांचा विजय यावर विश्वास दृढ व्हावा म्हणून हे ग्रंथ वाचाले पाहीजेत. आपल्या रोजच्या जीवनात चालण्याबोलण्यात योग्य तो बदल व्हावा म्हणून हे ग्रंथ हवेत. आपल्या बारीक सारीक निर्णयावर घटनांवर या ग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून हे ग्रंथ वाचले पाहीजेत.
पण जर हे लोक स्वत:ला मुळातच आदर्श व्यक्ती म्हणवून घेत असतील तर मग हे बदल कसे होणार? आपण दिवसातून एकदा मंदीरात जातॊ म्हणजे आपण इतरवेळी कांहीही करायला मोकळे असंही काही जणांना वाटतं. खुपदा हे लोक मंदीरात उभाराहून एकमेकांच्या आई-वडीलांचा उध्दारसुध्दा करतात. यांना हे अधिकार कोणी दिले? मला वाटते त्यांचे त्यांनीचे हे मानून टाकले आहे की आपण देवाचे लाडके आहोत आणि काही करायला मोकळे आहोत.
गुर्जिएफ नावाचा एक संत म्हणा किंवा एक महात्मा म्हणा होऊन गेला. त्याच्या आश्रमात प्रवेश करणा-यांना तो एक प्रश्न विचारत असे," तू स्वत:ला सज्जन समजतोस की दुर्जन?"
" सज्जन" असे उत्तर आले की तो त्या माणसांना हाकलून लावत असे. तो म्हणे की सज्जनांचे इथे काय काम ? इथे दुर्जनांनाच प्रवेश मिळेल. इथे येऊन स्वत:ला दुर्जन समजणारांचेच सज्जन माणसात रुपांतर होईल. सज्जनांनी आपआपल्या संसाराच्या किंवा स्वत:च्या मार्गाने चालावे त्यांचे इथे काय काम नाही कारण ते तर अगोदरच सज्जन आहेत.
तात्पर्य काय स्वत:ला कमी समजणारेच स्वत:ला बदलायला तयार असतात. हे आमचे लोक स्वत:ला अगदी पोहोचलेलेच समजतात मग ते कसे बदलनार. ते फक्त तोंडाने घोकंपट्टी करणार " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी". हा हरीपाठाचा अभंगसुध्दा ते स्वत:साठी म्हणत नाहीत तर तेसुध्दा दुस-यालाच मार्गदर्शन केल्याप्रमाने म्हणतात ," अरे, हरी चे नामस्मरण कर त्यामध्ये भरपूर पुण्य आहे." स्वत:साठी हा अभंग जर एकदाही म्हंटला असता तर दुस-याच्या बांधाचे गवत किंवा ऊस कुणी चोरुन कापला नसता, दुधात पाणी मिसळले नसते. ज्याच्या मुखी अखंड हरीचे नाम आहे तो वाईट काम करूच शकत नाही. जर तुम्ही भक्तिमार्गातले असाल तर ते तुमच्या प्रत्तेक कृतीतून चालण्याबोलण्यातून दिसते. एकदातर कोणत्या प्रवचनकारांना आमंत्रण द्यायचे यावरून चर्चा सुरु होती. तेव्हा अमुक एकाला बोलवू नका ’तो रांडचा लई ताटतोय’ अशा भाषेत त्यांची आरती करण्यात आली. पुढे तेच प्रवचनकार जेव्हा आले तेव्हा हेच लोक त्यांच्या पायावर डोके ठेवायला पुढे. हे आता बस्स झाले. आपण लोकांना मुर्ख बनवता बनवता स्वत:लाही मुर्ख बनवत आहोत हे या लोकांना कधी समजणार देवच जाणे.
(टीप: आमच्या गावातील सर्वच भक्तिमार्गातील लोकांविषयी वरील निरीक्षण खरे ठरेल असं नाही. कांही लोक आहेत ज्यांच्या भक्तिविषयी वा चांगुलपणा विषयी मनात शंकाही नाही पण मला मुख्यत: विसंगतीतच जास्त रस असल्यामुळे मी त्याबद्दल लिहीले आहेत.)
पारायण करणारे यंत्राप्रमाणे पारायण करतात हा आक्षेप बहुतांशी योग्य असला तरी अर्थ समजून घेणारेदेखील आपल्या वैयक्तिक अनुभवांशी त्याची सांगड न घालता घोकंपट्टीच करीत असतात.
ReplyDelete