सौभाग्याचे प्रतिक म्हणून विवाहीत स्त्रिया आपल्या कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात असं मला वाटतं. सौभाग्याचं ते प्रतिक आहेच पण स्त्रीचं सौंदर्य त्याशिवाय उणं आहे. चेह-याला शोभणारी टिकली किंवा कुंकू स्त्रिच्या सौंदर्यात भरच घालते असं मला वाटतं. पुर्वापार चालत आलेली परंपरा कुंकू असो वा टिकलीच्या रुपाने आजही आपल्याकडे जपली जाते. हिंदू त्यातही महाराष्ट्रीय स्त्रियांमधे हे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षातरी निश्चितच जास्त आहे. यापैकी किती स्त्रिया कुंकू लावतात व किती टिकली वापरतात हे निश्चित सांगता येणार नसले तरीही टिकलीचे प्रमाण त्यापैकी ऎंशी टक्क्यांपेक्षातरी जास्तच असावे. आजकाल, "आमचे आमच्या नव-यावर अतिशय प्रेम आहे पण आम्हाला टिकली लावायला आवडत नाही" असे म्हणणा-यांची संख्याही वाढते आहे.
पुर्वी आमच्या गावातल्या बायका जो कुंकू लावायच्या तो आठवड्याच्या बाजारात मिळायचा (आजही मिळतो). करनुरचा अत्तार प्रत्तेक आठवड्याला शनिवारच्या बाजारात आपले दुकान मांडून बसायचा. त्याच्याकडे कुंकवाबरोबरच हळद, बुक्का (विठोबाचा), डोरल्यातले काळे मणी, काळे, लाल दोरे, सुया, पिना आणि कान-कोरणे असले ऐवज आजही मिळतात. याच्याच जोडीला कुंकवा अगोदर लावायला लागणारे मेण सुध्दा मिळायचे. हे मेण बहुदा मधाच्या पोळ्यापासून बनवत असावेत. याच अत्ताराकडे काळा बिब्बाही मिळतो आणि तोंडाला लावायचा स्नोसुध्दा मिळतो. त्या स्नोचे नाव मला आता आठवत नाही पण ’कश्मीरी स्नो’ असंच कांहीतरी आम्ही त्याला म्हणत होतो. त्यामूळे गावातल्या सौभाग्यवतींना महिण्यातल्या एका शनिवारीतरी या दुकानात जावंच लागायचं.
त्याची बायकोही त्याच्या सोबत असायची, जवळच बसून डोरले गाठवणे हा तिचा उद्योग. एखाद्या बाईने तिच्याजवळ आपले सोन्याचे मणी आणि शिपल्या की काय म्हनतात ते तिच्याजवळ द्यावे आणि निवांत बाजार करून परत यावे तोपर्यांत डोरले गाठवून तय्यार. या व्यवहारात कधी फसवा फसवी झालेली गेल्या पाचपंचवीस वर्षात बातमी नाही.
खरंतर, हे अत्तार लोक जातीनं मुसलमान पण त्या बाईच्या कपाळावर हे मोठ्ठ कुंकू असायचे. पण आजकाल बाजारात अत्ताराची आणि तिच्या कपाळावर कुंकवाची जागा रिकामी दिसते, सलते.
असंच सलायचं ते आमचा मित्र दशरथ गोनुगडेच्या आईचे रिकामे कपाळ बघताना. दशरथचे वडील होते तेव्हा आकाशातल्या पुर्णचंद्राशी स्पर्धा करणारे रक्तवर्णी कुंकू आईच्या भारदस्त कपाळावर शोभून दिसायचे. वडील गेल्यानंतर आईकडे पाहताना नजर दुसरीकडे वळवावी लागायची. कुंकू नसले तरी त्या कुंकवाची ऐसपैस जागा पाहून मनात कालवा-कालव व्हायची.
जणू कांही, कुंकवाचा आकार हा त्यांच्या जीवनातील कारभा-याची व्याप्तीच दर्शवित होता. तो असो वा नसो त्याचं आयुष्यातलं स्थान अढळ होतं. ते कोणीही दुर्लक्षीत करण्यासारखं नाही हे जाणवत होतं.
तिकडे लातूरकडच्या बायातर कपाळभर "कुंकू लेवतात". त्याला आपल्याकडे "मळवट" असं म्हणतात. बंगाली स्त्रियांही पुर्वापार मोठ्या आकाराचे कुंकू लावतात, उषा उत्थूपसारखे. दुर्गापूजेच्या वेळी तिकडल्या स्त्रिया एकमेकीला कूंकू (सिंदूर) माखतात जसे आपल्याकडे गुलाल माखतात तसे.
आमच्याच गल्लीतल्या भागाआऊ, इंदाआऊ, पाटलाची शांताई, कांही भिसु-यांच्यातल्या बायकाही आजून हा कुंकू लावतात. याचा रंग एकदम लाल भडक रक्तासारखा असतो आणि हा कुंकू डायरेक्ट कपाळाला लावलातर तसा चिकटत नाही त्यासाठी तो लावण्या आगोदर मेनाचे बोट फिरवावे लागते.
हे कुंकू लावत असताना पाहणे म्हणजे देवळातल्या गुरवाची पुजा पाहण्यासारखेच आहे अगदी सावकाश कोणतीही घाई नाही, गडबड नाही. आणि कोणा पोराच्या कारणाने जर का त्यावेळी गडबड झालीच तर त्यांचे दिवसभर सुरु असते, "स्सक्काळी सक्काळी मेल्यानं कुठं गू तुडवून आल्तं कायकी कुक्कूबी नीट लावू दिलं नाही."
यातूनच त्यांच्या जीवनात नव-यासाठी असणारी ’स्पेस’ जाणवते. "आपल्याला बाकी जगाचं काय करायचं हायं, एवढं कुक्कू घट्ट असलं की झालं." हाच भाव जीवनात नित्य नेम.
हा जुना-पुराणा कुक्कू लावताना अवघडल्यासारखं होतं पण डायरेक्ट टिकली लावू शकत नाही असा एक जमाना मध्यंतरी होता. त्याकाळात एक वेगळा कुंकू बाजारात मिळायचा तो एकदम लालभडक नसायचा तर थोडा चॉकलेटी कलरकडे झुकणारा लाल रंग असायचा. हा कुंकू उभट आकाराच्या डबीतून मिळतो आणि तो कपाळाला लावताना अगोदर मेन लावावे लागत नाही हे त्याचे प्लस पॉइंट आहेत. कदाचीत या कारणानेही हा कंकू खुप बायका वापरतात. माझी आईही हा कुंकू वापरते. त्या डबीवर ’लक्ष्मी सिंदूर’ असं लिहलेलं असतं. हा केसाच्या भांगात भरण्यासाठीही वापरतात. कदाचीत हाच तो ’एक चुटकी सिंदूर’ असावा.
सुशिक्षीत, थोडं जग फिरलेली, थोड्याफार प्रमाणात आपल्या कुवतीप्रमाणे अंधश्रध्दा टाळणारी, शिक्षणाकडे डोळसपणे पाहणारी, वर्तमानपत्र वाचणारी स्त्री या वर्गासाठी हा कुंकू एकदम जिव्हाळ्याचा बनला आणि तो त्यांचं प्रतिकही बनला आहे. माझा संसार-माझी मुलं, आपलं-परकं, भलं-बुरं, जुनं-नवं यातला भेद जाणणारी, नव-याला काय बरोबर काय चूक हे सांगणारी आणि स्वत:ची चॉईस असणारी स्त्री यातून दिसते.
लाल रंगाचा गंध (की गंद) हा सुध्दा याच दरम्यानचा पण तो थोडा लेट आला असावा. हा उभट आकाराच्या डबीतून मिळतो. लालरंगाचा हा गंध द्रवरुपात असतो त्यामुळे लावण्यास सोपा असतो आणि दिवसभर चिकटुन राहतो. पुर्वी तो फक्त शाळकरी मुलींमध्येच असायचा, पण कांही विवाहीत स्त्रियांनी तोच धागा ओढून पुढे लग्नानंतरही वापरला.
साधारण ऎंशीनंतर ज्यांची लग्ने झाली त्या ताया हा गंध वापरतात. माझी दिदी हा गंध वापरते. त्या काळात मुलीची सातवी किंवा दहावी इयत्ता संपली की तिला एक वर्ष शिवणक्लासला पाठवायचे की मग पुढल्याच वर्षी कुठतरी उजवून टाकायचे असाच प्रघात पडला होता. मुलीला शाळेतून बाहेर पडल्यावर ना संसाराविषयी, ना नव-याविषयी ज्ञान असायचे ना जगात काय सुरु आहे याचे भान असायचे. मुलीने शाळा सोडली रे सोडली की तिचे लगेच लग्न झालेच म्हणून समजा. त्यामुळे या गंध प्रकारातून त्या कुंकूमध्ये कधी शिफ्ट झाल्या नाहीत. त्या नेहमीच गंधात राहील्या आहेत, शिकावू. तीच्या संसारातील बारीकसारीक निर्णय आमची आईच घेते. त्याना गंधातून कुंकूमध्ये शिफ्ट होण्यासाठीचे भान येणे अवघड आहे. आपला नवरा, शेती, मुले गुरे-ढोरे, घर, आले-गेले, हा वारला, तिला मुल झाले यातच त्या गुंतून पडल्या आहेत. त्या आपल्या संसारगाड्यात इतक्या रुतल्या आहेत की मी गंध का लावते गंध बरा की कुंकू, कि टिकली वापरावी? याचा त्या कधी विचारही करु शकत नसाव्यात. जे चालत आलेले आहे ते पुढे सुरु ठेवणे. शाळेत असताना आपली आई सकाळी अंघोळ केली की आपल्या कपाळाला गंध लावायची म्हणून तोच नित्यक्रम पुढेही सुरु.
या वर्गातल्या स्त्रियांना आपण मध्यकाळातल्या स्त्रिया असं म्हणू. एकतर स्त्री शिक्षणाचा त्यांना म्हणावा तसा फायदा करुन घेता येत नाही. हां त्यांना स्वत:ला फायदा नाही झाला तरी पुढच्या पिढीला तो झाला. पुढची स्त्री डायरेक्ट टिकलीवर आली. पुढच्या पिढीला स्वातंत्र्य मिळाले स्वत:ची चॉईस मिळाली. ”पहिल्यापासून चालत आले आहे’ असा शिक्का त्यांच्यावर कोणी मारला नाही आणि या लालगंधवाल्यांनी तो मारू दिला नाही.
आजचा काळ हा टिकलीप्रधान काळ आहे. आज या टिकलीप्रकरणापुढे कोणताही कुंकू टिकेल की नाही कोणास ठाऊक. तरीही जुन्या बाया म्हणतात की "काय ती टिकली?, कायतरी थ्यार आपलं, टिकली तर टिकली नाहीतर हुकली!"
पण कुणी कांही म्हणो टिकली आजूनही टिकून आहे एवढे खरं.
आज बाजारात विविध रंगाच्या विविध आकाराच्या असंख्य नमुण्याच्या टिकल्या मिळतात. असे जरी असले तरी कांही स्त्रिया नेमक्या एकाच रंगाच्या एकाच आकाराच्या टिकल्या वर्षानुवर्षे लावतात. आणि त्यांना त्या मिळतातही.
प्रत्तेकीची आवड निराळी आणि दिवसागणिक बदलणारी. कधी मैत्रिणीची पाहून कधी कोणता सिनेमा किंवा टिव्ही सिरियल पाहून. कधी उभी टिकली कधी गोल सर्कल, कधी लाल, कधी चॉकलेटी, कधी सोनेरी झालर असलेली तर कधी चंदेरी झालर. अनेक मूड, अनेक चॉईस. "फ़्लेग्झिबल" असंच म्हणता येईल याला. जसे की नव-यावर प्रेमतर आहे पण ते यांच्या मूडनुसार तो कधी यांना आपल्या मागे मागे फिरावा असं वाटतं, कधी तो "कामावर गेलेलाच बरा!" असे. कधी शॉपिंगला सोबत हवा तर कधी "खरेदीतलं त्यांना कांहीच कळत नाही". कधी वाटतं की आपण नोकरी करावी कधी वाटतं आपणच किती काम करायचं.
लहानशी टिकली, लाल टिकली, चॉकलेटी टिकली, मोठ्ठी टिकली, उभी टिकली, बाणाच्या टोकासारखी टिकली, चंद्राकार टिकली, कोणाची टिकली भुवयांच्या मधोमध तर कोणाची मध्यकपाळी, कोणाची दिवसारात्र टिच्चून टिकून आहे तर कोणाची सारखी पडते-हरवते.
काळ्या रंगाच्या टिकल्याही मिळतात. त्या टिकल्या बहुदा विधवा स्त्रियाच वापरताना मी पाहीलेले आहे. नवरा नसल्याची सल आणि पुर्वीप्रमाणे आपल्याला लाल टिकली वापरता येत नाही, आपली आवड-निवड आता पुर्ण करता येत नाही याचा निषेधच जणू त्या काळ्या रंगातून करत असाव्यात.
गोंदणे किंवा गोंदून घेणे हा प्रकार आजूनही आमच्याकडे आहे. पुर्वी सुयांचा जुडगा एकप्रकारच्या शाईत बुडवून हातानेच वारंवार टोचून विविधप्रकारची गोंदणी काढली जायची. आता तेच काम इलेक्ट्रीक मशीनद्वारेही होऊ शकतं.
माझी बायको परवा रात्री मला म्हणाली," अहो, मी गोंदून घेऊ काय?"
"आत्ता इथं, रात्री?"
"अहो, तसं नाही, कधी तरी जत्रंत गेल्यावर."
" काय, माझं नावं लिवून घेणार आहेस?"
"नाही हो, नुसती टिकली ती पण कपाळावर."
"का?"
" अहो परवा कोणतरी म्हणत हुतं की बाई मेली की तिच्यासोबत फक्त गोंन्नच -हातय"
माझ्या अंगावर सर्ररकण काटा आला.
"अगं पण मी तर बघितलयं की आपल्याकडे जर त्या बाईचा नवरा जिवंत असला तर तिला कुंकवाचा मळवट भरतात आणि नसला तर मग गुलाल लावतात."
" मेल्यावर ते काय करायचं ते करुदेत मी गोण्ण काढू की नको ते सांगा"
मी कांहीच बोललो नाही.
’भरल्या कपाळानं ’वर’ जावावं’ या बायकांच्या वाक्याला फक्त भावनिकच नाही तर सामाजीक, आर्थिक संदर्भ आहेत.
लग्नसमारंभ असो वा पुजाअर्चा असो सगळीकडे कुंकवाला मान आहे. घरी आलेल्या सुवासिनीला निरोप देताना आजूनही " थांब गं, जाते आहेस कुंकू लावून जा" असं म्हणून अगोदरच्या कुंकवावर किंवा टिकलीवर पुन्हा कुंकू लावतात. " थांब टिकली लावून जा" असं कोणी म्हंटलेलं आजून मी ऐकलं नाही. आजकालच्या सिरीयल्समधेसुध्दा मोठ्ठे कुंकू लावण्याची फॅशन आली आहे.
माझं निरीक्षण आणि त्यावरंची मतं प्रत्तेकानुसार भिन्न भिन्न असू शकतील, पण स्त्रियांचा स्वभाव काळानुरुप बदलला तरीही त्या आणि कुंकू किंवा टिकलीचा संबंध तरी खरा आहेच ना? आणि कृपया माझं निरिक्षण "व्हाईस-व्हर्सा" करुन घेऊ नये.
आणखी एक, कशीही असो कोणतीही असो बायकोच्या कपाळावर टिकली असावी.
कारण घाई गडबडीच्या वेळी, "अहो, ... माझी टिकली?" असं बायकोनं म्हंटलं की आपला गोंधळ उडतोच, होय की नाही?
very very nice, fantastic...!
ReplyDeleteVery nice
ReplyDelete