Tuesday, January 03, 2012

५३. मन कुंतो मौला

ज्याला सुफी संगीताविषयी माहिती आहे, त्याने अबिदा परवीन हे नाव ऐकले नाही असे होणार नाही.

सुफी संगीताला ज्यांनी आपल्या गायकीने चार चांद लावले अशा अबिदा परवीन यांची मुलाखत टिव्हीवर सुरु होती. मुलाखतीच्या अखेरीस मुलाखतकाराने अबिदा परवीन यांना विचारले की आत्ता या क्षणी तुम्हाला कोणतं गाणे म्हणावेसे किंवा गुणगुणावेसे वाटत आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले - ’मन कुंतो मौला’ .

मुलाखत संपली, आता मलाही ते गाणं ऐकायचं होते. मला चैन पडेना.

मी इंटरनेटवर सर्च केले तेव्हा मला "मन कुंतो मौला" हे एकच गाणे विविध गायकांनी गायलेले ऐकायला मिळाले. त्यात साब्री बंधू, उस्ताद नुसरत फतेह अली खान, झिला खान, नजर अली खान, आतिफ अस्लम आणि अरिफ लोहार आणि खुद्द अबिदा परवीन या सर्वांना ऐकायला मिळाले. प्रत्तेकाचा आवाज वेगळा, अंदाज वेगळा,  नशा वेगळी.

मला अशी गाणी एकवेळ ऐकून समाधान वाटत नाही, पुन:-पुन्हा ऐकल्याशिवाय मजा वाटत नाही.

’मन कुंतो मौला’ पुन:पुन्हा ऐकून ते आपल्या आत कुठेतरी घुमत आहे असे वाटू लागले. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक धुन आत वाजतच होती. सुफी संगीताची हीच तर कमाल आहे. कांही वेळानंतर, हे गाणे बाहेरून आपल्या आत गेले आहे की आतूनच बाहेर आले आहे असा प्रश्न पडतो.

हम तुम ता ना नाना तानानारे,
यालाली यालाली आला याला अली रे,
ताना नाना ताना नाना ताना नानारे...

सुफी आलाप मी गुनगुणतच राहीलो. आता याचा अर्थ शोधण्याची जिज्ञासा जागृत झाली.

आणखी शोधाशॊध करताना मला कळले ते असे.

’मन कुंतो मौला’ हे प्रेषीत मुहम्मदांच्या पवित्र मुखातून वदलेल्या " ’मन कुंतो मौला, फा अली-उन मौला" या संदेशावर आधारीत लिहीले गेलेले सुफी गीत आहे आणि ते अमीर खुसरो या प्रख्यात उर्दू-फारशी शायराने लिहीले आहे.

आपले पवित्र शरीर सोडण्यापुर्वी प्रेषीत मुहम्मद आपल्या शेवटच्या धर्मयात्रेच्या एका मुक्कामात प्रवचन देत असताना त्यांनी या वाक्याचा उल्लेख आपल्या संदेशात केला आहे. याचा अर्थ असा होतो की "जो कोणी मला गुरु मानेल, त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल".

मेरी मॅग्दालीन आणि थॉमस यांना ख्रिस्त धर्मात जे स्थान आहे त्याइतकेच किंवा त्यांपेक्षा वरचे स्थान इमाम अली यांना आहे असे सुफी संत मानतात. कांही ठिकाणी स्वत: प्रेषीत मुहम्मद असे म्हणतात की ’मी ज्ञानाचा (परमसत्याचा) गाव आहे आणि अली हा त्यामधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे’.
अशाप्रकारे इमाम अलीचे स्थान अनेक ठिकाणी उच्च असल्याचे वर्णीले आहे. अलीनेसुध्दा आपल्या ’झुल्फीकार’ नावाच्य़ा तलवारीने अन्याय आणि अनाचाराविरुध्द सत्याची बाजू बळकट केली. प्रेषीत मुहम्मदाने दिलेले प्रेम आणि परमसत्याचे ज्ञान सर्वत्र पोहचीवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.

या सर्व गोष्टींचे वर्णन अमीर खुसरो यांनी या ठिकाणी केले आहे ते कांहीसे असे आहे,

शाह-ए-मर्दां, शेर-ए-याझदान,
कूव्वत-ए-परवरदिगार,
ला फता इल्ला अली,
ला सैफ इल्ला झुल्फिकार

म्हणजे,
पराक्रमाने सम्राट, देवांचा सिंहासारखा,
देवाची शक्ती असणा-या,
अलीसारखा कोणी नाही,
आणि त्याच्या झुल्फिकार नावाच्या तलवारी सारखी तलवारही कोठे नाही.

मन कूंतो मौला,
ख्वाजा अली-उन मौला.

जो कोणी मला गुरु मानेल,
त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल.

याच्या पुढे सुफी अलाप येतो,

दारा दिल ए दारा दिल-ए दार-ए-दानी
हम तुम तानाना नाना, ताना नाना रे,
हम तुम तानानाना, ताना नाना रे.

यालाली यालाली अला, याला याला रे
ताना नाना ताना नाना तानानाना तानाना
तुम तनन नन, ताना नाना रे...

मौला अली मौला
मौला अली मौला

अली हा गुरु आहे,
अली हा गुरु आहे.
.. ... ....

कुठेही जर कव्वालीची मैफील असेल तर या कव्वालीशिवाय ती पुरी होऊ शकणार नाही असे म्हणतात.

एकदा जरुर ऐका.

यू-ट्यूबवरही आपल्याला ऐकायला मिळेल.




1 comment:

  1. तिचा आवाज यक्षिणी सारखा स्वर्गीय आहे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया