Wednesday, November 03, 2010

३५. मला भेटलेली माणसं - भाग-५ - गुंडबा

कांही लोकांना आतला कप्पाच नसतो. म्हणजे एखादी गोष्ट कितीही खाजगी असो, गुप्त असो त्यांच्या मनात लपून राहू शकत नाही. आपला फायदा होवूदे की नुकसान या लोकांना आपल्या मनातला कोणताही विचार लपवून ठेवता येत नाही. आपल्याला लोक हसतील किंवा नावे ठेवतील याची या लोकांना तमा नसते. आपल्या जीवनात जे कांही घडले ते दुस-याला सांगितल्याशिवाय या लोकांना चैनच पडत नाही. अशा लोकांचे जीवन म्हणजे एखादे खुले पुस्तकच, कोणीही या आणि वाचा.
अशाप्रकारचे जीवन जगण्य़ासाठी तेवढेच मोठ्ठे मन असावे लागते. देवाने या लोकांनाही ’देढ हात कलीजा’ दिलेला असला पाहीजे, त्याशिवाय अशाप्रकारचे आपल्याबाबतीत घडलेले प्रसंग ही लोकं जणू दुस-याचे असल्यासारखे सांगू शकली नसती.
त्या लोकांपैकीच एक नाव म्हणजे गुंडबा.
गुंडबाचे पुर्ण नाव गुंडोपंत असे असले तरी गावाच्या रितीप्रमाणे ते गुंडबा असे झाले आहे.
हा प्रसंग खुप वर्षापुर्वी घडला असून जवळजवळ सर्व गावाला हा माहीत आहे. पहिल्यांदा तो कसा, कोणी आणि कोणाला सांगितला हे माहीत नाही पण आज तो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे
दिवस उन्हाळ्याचे होते. गुंडबाचे लग्न होऊन आता दहा-बारा वर्षे होत आली होती. गुंडबाच्या घरी लहान थोर अशी जवळ-जवळ वीसएक मानूस होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुंडबाला घरात खाली झोपण्यासाठी जागाच उरत नसे. तो घरातच पोटमाळ्यावर झोपत असे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याच्या अंगावर चड्डीशिवाय दुसरा कपडा नव्हता. उकाड्याने हैरान झाल्याने त्याला झोप येत नव्हती. त्यातच त्याला खालच्या खोलीत झोपलेल्या आपल्या बायकोची आठवण झाली. त्याला उकाडा आणि बायकोचा विरह अनावर होऊ लागला. त्याने खाली जावून आपल्या बायकोला हळूच जागे करून वरती घेऊन यावे किंवा जमलेच तर तिथेच कार्यक्रम आवरुन यावे असा विचार केला.
मागच्यावेळेसारखं खाली गेल्यावर काढलेली चड्डीची नाडी शोधायला वेळ लागू नये म्हणून त्याने वरच ती काढून ठेवली आणि नागव्यानेच तो शिडीवरुन उतरु लागला.
त्याच्या हालचालीने गोठ्यातील जनावरे उठून उभी राहीली आणि त्या आवाजाने गुंडबाची म्हातारी जागी झाली. म्हातारीला पहिल्यांदा बोका किंवा मांजर आले असे वाटले. तिने हुश हुश शू शू असे करुन पाहीले तिच्या आवाजामुळे आणखी कुणाकुणाला जाग आली.
अंगावर एकही कपडा नसलेल्या गुंडबाला धोक्याची जाणिव झाली तसे त्याने सगळ्यांना मोठ्या आवाजात दम भरला ," लाईट लावायचे काम नाही, मी जनावरांना वैरण टाकायला उठलोय, कोण लाईट लावेल त्याच्या ..... " त्याच्या या धमकावण्यामुळे कोणी लाईट लावण्य़ाच्या भानगडीत पडले नाही. अशाप्रकारे अंगावर आलेला बाका प्रसंग त्याने कसातरी टाळला.

खरंतर हा प्रसंग दुस-या कुणाला माहीत व्हायची शक्यताच नव्हती पण मग गुंडबा तो कसला?

असाच तो एकदा गोव्याला गेला होता, फिरायला.
बदलीसाठी अंडरवेअर न्यायला विसरल्यामुळे, त्याला अंडरवेअर खरेदी करायची होती. बाकीच्यांना सोडून एकटाच खरेदीला बाहेर पडला. शोधता शोधता त्याला एके ठिकाणी स्टॉलवर खुपशा वेगवेगळ्य़ा डिझाइनमधल्या अंडरवेअर ठेवलेल्या दिसल्या. त्याला आनंद झाला. तो त्या दुकानदाराला म्हणाला," एक चड्डी द्या. "
" बोला मामा, कसली देऊ"
गुंडबाला त्या नाडीच्या चड्डीचा कंटाळा आला होता त्यामुळे त्याला नवीन प्रकारची चड्डी हवी होती पण त्याप्रकारच्या चड्डीला नेमके काय म्हणावे हे त्याला माहीत नव्हते.
" ती मधनं बाहेर येते बघा ती दाखवा"
त्या दुकानदाराने हसून त्याला त्याप्रकारची चड्डी दाखविली. एक पसंत पडल्यावर तो दरासाठी घासाघिस करु लागला.
" ते नव्हं, ही चड्डी टिकावू हाय नव्हं? आम्ही काय कवा असली वापरल्याली नाही तवा ... "
" बिनधास्त वापरा की मामा, अजिबात फाटनार नाही."
" पर एवढी महाग हाय त्यामानानं टिकल तरी का?"
गुंडबाचे तुणतुणे सुरुच होते.
आता तिथे गर्दी सुरु झाली होती. त्या दुकानदाराने चड्डी हाताने ओढून तानवून दाखविली तरी गुंडबाचे धाडस होईना.
" म्हणजे अंगात घातल्यावर टिकल नव्हं?"
" मामा, चड्डीची गॅरंटी मी देतो. ही चड्डी घालून घालून एकवेळ तुमची .... फाटेल पण चड्डी फाटणार नाही, मग तर झालं."
त्यावर गुंडबाने ती चड्डी निम्म्या किमतीत खरेदी केली आणि उड्या मारत परत येऊन घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला अगदी शेवटच्या ’गॅरंटी स्लोगन’सह.

गुंडबाची शेती आहे त्यात ऊस होता. कारखान्याने आपला ऊस लवकर तोडून न्यावा म्हणून गुंडबाने ऊसाला आग लावायचे ठरवले.
एकेदिवशी भल्या पहाटे जावून त्या ऊसाच्या चारी बाजूने रॉकेल डिझेल ओतले आणि पेटवून दिले. ऊस लवकर पेटावा म्हणून एका बाजूने पेटवून न थांबता दुस-या बाजूनेही पेटवून दिले. असं करता करता ऊसाला सगळ्याच बाजूनी आग लागली गुंडबा मध्येच राहीला. सगळीकडे आग लागलेली पाहून आतल्या आत सैरावैरा धावत सुटला. त्याला बाहेर पडायला जागाच नव्हती. शेवटी त्याने विहीरीत उडी टाकली आणि पाण्यातच पडून राहीला.
नंतर लोकं त्याला शोधत होती तर हा विहीरीच्या पाण्यात. पाण्यात राहूनच त्यानं घडलेली गम्मत लोकांना सांगितली. बाहेर ये म्हटल्यावर यायला तयार नाही. त्याच्या अंगावर कपडेच शिल्लक नव्हती. आग जवळ येईल तशी त्याने एक एक अंगवस्त्र आगित दान केले होते. शेवटी कुणीतरी टॉवेल दिला आणि तो टॉवेल लावूनच तो बाहेर आला.
असा हा गुंडबा आजही तसाच नवनवीन गमती जमती करतो आणि त्या लोकांनाही सांगतो अगदी इमानदारीने.

2 comments:

  1. "मामा, चड्डीची गॅरंटी मी देतो. ही चड्डी घालून घालून एकवेळ तुमची .... फाटेल पण चड्डी फाटणार नाही, मग तर झालं."

    हा हा हा! छान लिहिलं राव!

    दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
    सुखाचे किरण येती घरी,
    पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

    http://bit.ly/awLf9V

    ReplyDelete
  2. Your profile introduction is very interesting.

    ReplyDelete

प्रतिक्रिया