मी इयत्ता आठवीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट.
उद्यापासून वार्षिक क्रिडामहोत्सव सुरु होणार म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते.
आमच्या शाळेचे राष्ट्रीय खेळ ( भारतात वर्डफेमस या चालीवर) खो-खो, कबड्डी, रिले २०० मी.- ४०० मी., लांब उडी, उंच उडी, धावणे, भाला फेक, गोळा फेक इ. इ.
यावर्षी कबड्डीत नसेना का पण खो-खो मध्ये आमची टीम चांगली होती व आम्हीच पहिला नंबर मिळवू असा उघड दावा आम्ही करत होतो.
तसा खो-खो हा गेम त्याचे नियम ३-८, साखळी इ, डाव आम्हा सर्वांनाच माहीत होते पण खो-खो च्या फायनल टीममध्ये स्थान मिळवण्या इतके प्राविण्य माझ्याकडे नव्हते. कबड्डीच्या फायनल टिममधून खेळण्यासाठी चांगली तब्येत हे मेन क्वालिफिकेशन, त्यातही आम्ही नापास. राहता राहीले वैयक्तिक खेळ धावणे इ. पण धावणे, लांब उडी, उंच उडी यांना खेळ कसे म्हणायचे. फार झालेतर त्यांची स्पर्धा असे म्हणता येइल. या विभागात इ. १० च्या मुलांच्या समोर आमचा टिकाव कसा लागणार ? या सर्व कारणांनी म्हणा किंवा ’किलींग इंस्टींक्ट’, जिंकण्याची भावना इत्यादींचा अभाव म्हणा शेवटपर्यंत कोणत्याच खेळात माझे नाव राहीले नाही. त्यामुळे स्पर्धेचे कोणतेच बर्डन माझ्यावर नव्हते. एकूण काय मी खुपच खुषीत होतो.
जोशी सरांचा इतिहासाचा तास सुरु असतानाच अचानक पी.टी. च्या मदारे सरांची एंट्री वर्गात झाली.
उद्याच्या दिवसाबद्दल काही माहीती मिळणार म्हणून सगळेजन कान टवकारून ऐकू लागले. मदारे सरांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फर्मावले
"हे बघा, सर्वांना एक सुसना आहे, (सरांना सुचना असा उच्चार जमत नाही ते एकतर सुसना म्हणतात किंवा चुचना तरी म्हणतात) ज्या कोणी उद्याच्या स्पर्धेत भाग घेतला नसेल त्यांनी उभे रहायचे आहे".
असं म्हंटल्याबरोबर मी उभा राहीलो. पण पहातो तर काय सगळ्या वर्गात मी एकटाच उभा होतो. मला काही कळेना काहितरी चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. मी एकटाच? म्हंजे सगळ्या वर्गात मी एकटाच असा होतो? सगळा वर्ग माझ्याकडे कुचेष्टेने पाहू लागला. त्यांच्या नजरेत "हा पहा बावळट" असा भाव होता.
मदारे सरांनी माझे नाव लिहून घेतले व त्यांची त्यांनीच माझी स्वयंसेवक म्हणून निवडपण करून टाकली.
सर गेले. शाळा सुटली.
मला हे स्वयंसेवक वगैरे कांहीही व्हायचे नव्हते. मला फक्त क्रिडामहोत्सवाचा आनंद माझ्यापध्दतीने घ्यायचा होता. पण आता ते कसे काय शक्य होणार?
आणि मला हे कळत नव्हते की स्वयंसेवक म्हणून काम करण्यास मी तयार आहे की नाही? हा प्रश्न मला न विचारताच माझी डायरेक्ट नेमणूक करणे बरोबर आहे का?
मग स्वयंसेवक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?
दुसरी गोष्ट अशी की मी सोडून बाकी सर्वांनी खेळात भाग घेतला होता असे मला तरी वाटत नव्हते. कारण सुन्या घोटुगडेला दहा फुटावरचे दिसत नव्हते तो काय धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणार? असे बरेचजन होते जे पी.टी.च्या तासाला नेहमी बाजूला बसलेले असायचे. आणि मुली त्या कोणत्या स्पर्धेत भाग घेणार होत्या? पण कोणीच कसे उभे राहीले नाही? आणि सरांना पण ही शंका का आली नाही? माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. मला आता उद्याच्या कार्यक्रमात रस वाटेनासा झाला. उद्या शाळेला दांडी मारावी असा पण विचार करुन पाहीला परंतु माझे नाव लिहून घेतल्यामूळे हा विचारही कांही कामाचा नव्हता.
मी ज्याला त्याला विचारत सुटलो, खुप चौकशी केली की कोणी कशात भाग घेतला तेव्हा काहिंनी खेळांची नावे सांगितली काहीं खरे काहीं खोटे, तर काहींनी सरळ सरळ नाही म्हणून सांगितले.
मी खरोखरच बावळट होतो. बाकी सर्वांना खोटे बोलता येत होते मला ते जमले नाही. पण खरे बोलन्याची शिक्षाही मिळेल असे वाटले नव्हते. ते स्पर्धेच्या दिवशी कळाले.
दुसरा दिवस उजाडला मी शाळेत पोहचलो.
सुरवातीला झेंडा वंदन , राष्ट्र्गीत इ. कार्यक्रम झाल्यावर इतर स्वयंसेवकांसोबत माझ्यानावाची अनाऊंसमेन्ट झाली.
आम्हाला इतरांपासून वेगळे ओळखता यावे यासाठी आमच्या सर्वांच्या खिशाला लालरंगाचा रिबनचा बँड बांधण्यात आला.
आतापर्यंत फक्त वर्गापूरती असलेली बातमी सर्वांना माहीत झाल्यामूळे आमची बढती झाली व आमच्या बावळटपणाला सार्वजनीक मान्यता मिळाली.
ग्राउंडवर सगळेजण आमची कुचेष्टा करु लागला. जो-तो आम्हाला काही ना काही कामे लावू लागला. पडेल ते काम करणे आमचे नेमून दिलेले कर्तव्यच होते ना. कोण चाकपिठच्या रेषा मारण्यास सांगे तर कोणी ग्राउंडवर पाणी मारण्यास, कोणाला पिण्यास पाणी हवे तर कोणाची कपडे सांभाळावी लागत. कर्तव्यात कसुर करणे बावळटांना कधी जमणार?...
कामात टाळाटाळ करताच मुले सरांकडे तक्रार करत व सर आमचे कान उपटत, " नालायकांनो स्वयंसेवक आहात आणि कामे करत नाही?". "मग स्वयंसेवक कशाला झालात?" इ.
गल्लीतील आमचे इतर वर्गातील सोबतीही माझी टर उडवू लागेले. जणूकांही ’स्वयंसेवक’ म्हणजे एकप्रकारचा जोकरच.
मला आता रडू येण्याचे बाकी होते. काय करावे काही सुचत नव्हते. सर्वांनी माझी चेष्टामस्करी करुन आपली मौज करून घेतली.
पळून जाणे एवढाच आता मार्ग राहीला होता.
दुपारी जेवणासाठी घरी गेल्यावर एका शुभचिंतक मित्राने मला तो खिशावरचा बँड काढुन ठेवण्यास सांगितले.
तो म्हणाला आता तू स्वयंसेवक नाहीस. तेव्हा मला खुपच धीर वाटला. मी त्याच्याच सोबतीने शाळेत पोहोचलो. हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत गर्दीत मिसळून गेलो.
काही मुलांनी मला विचारले पण मी साफ इन्कार केला. त्यांना मी आता स्वयंसेवक म्हणून काम करणे बंद केल्याचे सांगितले. तरीही आत कोठेतरी भितीही वाटत होती. सरांना माहीत झाल्यास सर रागावतील असे वाटत होते.
आश्चर्य म्हणजे दुपारनंतर ग्राउंडवर एकही स्वयंसेवक हजर नव्हता. सर्व कामे खेळाडू व प्रेक्षक मिळून मिसळून खेळीमेळीने स्वत:च्या स्वत: करत होते. स्वयंसेवक हजर नाहीत ही गोष्ट सरांच्या ध्यानात येउनही सरांनी तिकडे दुर्लक्षच केले.
पूढचे अडीच दिवस नेमून दिलेल्या एकाही स्वयंसेवकाशिवाय सर्व खेळ अगदी सुव्यवस्थितपणे नियोजनबध्दपणे पार पडले.
मला बेडकीला दगड मारुन खेळणा-या मुलांची आठवन झाली. त्यादिवशी ती मुलें बेडकीला दगड मारण्याचा खेळ सोडून मलाच दगड मारत आहेत असं मला वाटत होतं.
या गोष्टीला आता पंधरा सोळा वर्षे झाली तरीही मी कधी कधी यावर खुप विचार करतो की या सर्वातून काय साध्य झाले?
पुढे कितीतरी दिवस मला ते प्रसंग मनाला टोचत होते. मनातील घृणा कमी होत नव्हती. त्यानंतर इतर कारणांसाठी शाळेत झालेले माझ्या सत्काराचे प्रसंगही आले पण त्याप्रसंगातही माझे हातपाय लटलट कापत असत.
स्वयंसेवक काय किंवा सरळमार्गी माणूस काय तो खुपदा चेष्टेचाच विषय असतो. त्यामूळे आपण सरळमार्गी राहणे ही आपली चॉइस असावी, असं मला वाटतं.
कांही शिक्षकांच्याकडून अजानतेपणी झालेल्या अविचारी वर्तनामुळे किंवा अदुरद्रुष्टीमुळे संवेदनशील मुले नाउमेद होतात.
आज मनात कुणाविषयी राग द्वेष उरला नसला तरी हा प्रसंग कांही केल्या विसरता येत नाही
मित्रा, मनातलं बोललास!! फार छान झालाय लेख!
ReplyDeleteखुपच छान. ...# स्वयंसेवक काय किंवा सरळमार्गी माणूस काय तो खुपदा चेष्टेचाच विषय असतो. त्यामूळे आपण सरळमार्गी राहणे ही आपली चॉइस असावी, असं मला वाटतं.
ReplyDelete