Sunday, August 29, 2010

१७.काय भुललासी वरलीया रंगा

प. पु. श्रीकृष्णमहाराज देशमुख हे मुरगुड येथील सुप्रसिध्द हरी-भक्त-परायन प्रवचनकार असून अमेरीकेतही त्यांची प्रवचने झाली आहेत असे ते स्वत: सांगतात. काही दिवसांपुर्वी त्यांचा खुप मोठा सत्कार समारंभही करण्यात आला.
पुढील घटनेला आता बरीच वर्षे झाली असतील.
प.पु.श्रीकृष्णमहाराज देशमुख हे आमच्या गावात हरीनाम सप्ताहात प्रवचनाकरीता आले होते. प्रवचन सुरु असताना बोलता बोलता विषय आला होता, "प्रभूची लिला अगाध आहे". प्रभूची लिला अगाध आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्याच जीवनातील दाखले देण्यास सुरवात केली. एकदा ते म्हणे आदमापूरजवळच्या एका खेड्यात प्रवचनाकरीता चालले होते व वाटेत त्यांची कार बिघडली ( म्हणजे महाराज नेहमी कारने प्रवास करतात हे सर्वांना समजले पाहीजे). प्रवचनाच्या ठिकाणी त्यांना पोहचण्यास वेळ झाला. समजा हेच जर अमेरिकेत घडले असते तर ते पर्यायी वाहनाने वेळेवर पोहोचले असते हे सांगायला ते विसरले नाहीत. ( त्याशिवाय आम्ही अमेरिकेला गेलो होतो हे जनतेला कधी कळणार?) प्रवचनाच्या ठिकाणी जेव्हा ते पोहोचले तेव्हा तेथे खुद्द विठ्ठल परमात्मा स्वत: प्रवचन देत होता आणि तेही प. पु. श्रीकॄष्णमहाराजांच्या रुपात. अशानासे आणि अशान असे. खरोखर परमेश्वराची लिला अगाध आहे. मी ही गोष्ट खोटी आहे किंवा असे घडणे अशक्य आहे असं म्हणणार नाही कारण जो परमेश्वर भक्ताच्या ह्ट्टाखातर सुईच्या नाकातून हात्ती पार करु शकतॊ तो स्वत: प्रवचन करुन भक्तांचे कान तॄप्त करण्याची संधी सोडेल कसा? पण महाराजांनीही या गोष्टीतून स्वत:चा ढोल स्वत: बडवून घ्यायची संधी सोडली नाही. महाराजांच्या भक्तीच्या महीमेपुढे विठलाचा महीमाही थोडा कमीच पडल्याचा भास माझ्यासह सर्व श्रोत्यांना झाला. महाराजांच्या मागे एखादे तेजोवलय फिरत असल्याचा भास होवू लागला. प्रवचनात आणखी अनेक दाखले ऐकायला मिळाले ज्यातून लोकांचा परमेश्वराच्या अगाध लिलेवर विश्वास द्रुढ झाला. त्याही पेक्षा जास्त महाराजांचा महीमा अधोरेखित झाला.
प्रवचन संपल्यावर मी महाराजांचे दर्शन घेण्याकरीता गेलो.
मी त्यांना म्हणालो, "महाराज, मला तुमचे प्रवचन आवडले. तुम्ही आपल्य़ा प्रवचनांमध्ये ओशोंनी सांगितलेल्या छोट्याछोट्या कथा सांगत जा त्यांच्यामुळे लोकांपर्य़ंत आपले ज्ञान पोहचविणे सोपे जाईल." ओशोंचे नाव ऐकल्यावर महाराजांना अंगावर पाल पडल्याप्रमाने वाटले ते म्हणाले," छे छे, मला त्या नावाचीच ऍलर्जीच आहे मी त्या मानसाचा तिरस्कार करतो."
मला महाराजांच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले नाही. मी म्हणालो, "महाराज, आपण तर व्यवसायाने डॉक्टर आहात, तेव्हा आपल्याला हेही माहीत असेल की ऍलर्जी हा प्रत्तेकाचा आंतरीक दोष आहे, त्यासाठी त्या स्पेसिफिक पदार्थाला वा वस्तूला दोष देण्यात काय अर्थ नाही, आपल्याला असलेली ऍलर्जी दुर करुन स्वत: दोषमुक्त होणे कधिही चांगले, नाही का?"
ऒशोंना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या प्रवचनातील चांगल्या चांगल्या कथा दाखले वापरायला काय हरकत आहे. आपल्या संत चॊखामेळाने म्हंटल्या प्रमाणे " ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी व्ररलीया रंगा..." व्यक्ति कोणीही असो लहान-थोर, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अडाणी, भक्त, अस्तिक-नास्तिक त्याचा विचार महत्वाचा त्याच्याकडून मिळणारे ज्ञान महत्वाचे आहे मानले पाहीजे असं मला वाटतं.
कबीर म्हणतात,
" जाती न पुछो साधुकी पुछ लीजीये ज्ञान,
मोल करो तलवारका पडी रहन दो म्यान"

(टीप: महाराजांचे अनेक शिष्यगण आहेत त्यांना ही कथा किंवा घटना नवीन असेल व त्यामुळे ते विचलीत वा दुखावले असतील तर त्याचे मला वाईट वाटेल. पण वास्तव सांगितल्याचा आनंदही होईल.)

No comments:

Post a Comment

प्रतिक्रिया