आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनतो.
आणि आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतात ज्यांची आपण कधीतरी इच्छा केलेली असते. असं मला नेहमी वाटते.
कधी त्या घटना विचार केल्या नंतर लगेचच घडतात तर कधी उशीरा घडतात.
आपण जेव्हा खुप बिझी असतॊ तेव्हा आपण म्हणतो की मला जरा स्पेस हवा आहे, थोडा निवांतपणा हवा आहे. आणि कालांतराने जेव्हा असा निवांतपणा मिळतो तेव्हा आपण त्याला लगेचच कंटाळून काही काम शोधू लागतो. कोणत्याही कामाशिवाय, हेतूशिवाय आपण राहूच शकत नाही. आपल्याला सुट्टी हवी असते पण तीही कामाच्या दोन दिवसांच्या मध्ये आली असली पाहीजे. आपण स्वत:ला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही न करता राहणे हे आपल्याला केवळ अशक्य झालेले आहे कारण आपण सवयींचे गुलाम बनलेलो आहे.
मला कोणीतरी एकदा झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट सांगीतली होती.
एका निर्जन जंगलात एक साधारण कपड्यातला मनुष्य़ एका जांभळाच्य़ा झाडाखाली निवांत झोपलेला असतो. जवळून जाणा-या पायवाटेवरुन एक व्यापारी त्याला असा निवांत पडलेला पाहून थांबतो. थोडावेळ थांबून निरीक्षण केल्यावर त्या व्यापा-याला या मनुष्याविषयी दया येते. चार समजुतीच्या व खुप महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी त्याला तो उठवून जागे करतो. तो मनुष्य नाइलाजाने उठून बसतो तेव्हा हा व्यापारी त्याला म्हणतो,"अरे अक्कलशुन्य मनुष्या, मानवजातीला जन्माला येउन हा असा निवांतपणे पडला आहेस त्यापेक्षा काही काम का करत नाहीस?" मग तो मनुष्य विचारतो," काम केल्याने काय होईल?" व्यापारी म्हणतो," तुला खुप पैसा मिळेल, ज्यापासुन तुला बंगला गाडी खरेदी करता येईल, मस्त गाद्या वगैरे खरेदी करता येतील व मस्त आराम करता येईल, तू सुखी होशील." मग तो मनुष्य म्हणतो," महाशय खुप काम करुन खुप पैसा कमवून मग त्यानंतर सुखी होण्यापेक्षा व आराम करण्यापेक्षा मी आत्ताच सुखी आहे. आता आणि इथेच. आणि तुम्हाला पण तसेच सुखी होता येईल." असे म्हणून तो मनुष्य सुखाने पुन्हा आडवा झाला. व्यापा-याजवळ आता थांबायला वेळच नव्हता त्याला भविष्यातील आरामासाठी व सुखासाठी खुप पैसा कमवायचा होता व त्यासाठी खुप कष्ट करायचे होते. तो लेगेचच तेथुन मार्गस्त झाला.
त्या व्यापा-याच्या विचारांप्रमाने आज आपली स्थिती आहे. आपण आजमध्ये कधी जगूच शकत नाही. आपण फक्त उद्यामध्येच जगू शकतो. आपण धावत आहोत कशाच्यातरी मागे आणि आपला "आज" जगायचाच राहून जातो. आपल्या हे लक्षात येत नाही की ज्या उद्यासाठी आपण आज धावत आहोत तो उद्याही जेव्हा येईल तेव्हा तो ’आज’च्याच रुपात येईल आणि आपण तेव्हाही त्याला जगायचे 'मिस' करू.
तेव्हा आपण आजमध्येच जगायला शिकले पाहीजे. आत्ताचाच क्षण खरा म्हणायला हवा.
"क्योंकी, जिंदगी अभी और यहीं है."
हरी ओम तत्सत
आपण आपल्या इमेजमध्ये इतके अडकलेलो असतो की काही काळानंतर आपण स्वतःला सामोरे जाण्यास भिऊ लागतो.ही बाब झाकून ठेवण्यासाठी कामसूपणाचे ढोंग रचलेले असते
ReplyDelete