या पुर्वीच्या भागात व्यक्त केलेल्या विचाराप्रमाणे आपल्या आतील जनावर हे नेहमी आपल्यावर वर्चस्व गाजवू पाहत असते. आपली सदसदविवेकबुध्दी जोवर जागी असते, शक्तिशाली असते तोवर हे माकड थोडे कमी ताकतवान असते. पण जेव्हा आपली सदसदविवेकबुध्दी कमजोर होते तेव्हा हे माकड लगेचच उडी मारुन पृष्ठभागावर येते.
आजकाल सर्वत्र हेच होत आहे. जो-तो हेच बोलतो की "काय वाईट वेळ आली आहे ?" "कलियुग आले आहे". जिथे तिथे हेच बोलले जाते. याचा अर्थ एवढाच की माझ्यावर काय वाईट वेळ आली आहे? कारण मी माझ्या सदसदविवेकबुध्दीच्या नुसार निर्णय घेउ शकत नाही. आपण स्वत: सदसदविवेकबुध्दीला बाजूला करु इच्छीत आहोत आणि माकडाला बळ देत आहोत मग त्या माकडाचे काय आयतेच फावले.
हळूहळू आपण मानवाच्या नीती-अनीती, पाप-पुण्य या व्याख्यांनी युक्त अशा व्यवहाराला धर्म असे नाव दिले व माकडांच्या किंवा जनावरांच्या व्यवहाराला अधर्म असे नाव दिले.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचे वर्तन वाढेल अनीती वाढेल तेव्हा तेव्हा धर्माचे रक्षण करण्यास व धर्माचे राज्य स्थापन करण्यास देव स्वत: जन्म घेतो किंवा आपल्या दूताला पृथ्वीवर पाठवून देतो. माझा भगवदगीतेतील या श्लोकावर पूर्ण विश्वास आहे.
जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर अधर्माचा अंधार पसरू लागला तेव्हा तेव्हा देव धावून आला. कधी रामाच्या रुपाने तर कधी कृष्णाच्या, कधी गौतम बुध्दाच्या रुपाने तर कधी भगवान महावीरांच्या, कधी येशु ख्रिस्ताच्या रुपाने तर कधी महम्मद पौगंबराच्य़ा रुपाने, कधी आचार्य शंकराचार्य तर कधी गुरु गोविंदसिंह. असे अनेक विविध रुपाने अनेक वेळा विविध ठीकाणी तो आला आणि आपले वचन त्याने पूर्ण केले.
ते आले त्यांनी आपल्याला मार्ग दाखविला. स्वत: आचरलेला मार्ग त्यानी आपल्याला दिला.
पण आपण एवढे हुशार निघालो की त्यांनी ज्या बोटाने रस्ता दाखविला तेच बोट आपण पकडून बसलो आणि रस्ता विसरून गेलो. आपल्याला त्या रस्त्यावर चालायचे आहे हेच विसरुन गेलो. त्यांनी आम्हाला चंद्राच्या दिशेने बोट दाखविले पण आपण त्यांचे बोटच पाहत बसलो. चंद्राकडे मान उंचावण्याचे भान आपण ठेवले नाही.
एकदा मुल्ला नसरुद्दिन बाजारात मिठाई आणायला गेला होता. त्या मिठाईवाल्याकडे परत देण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते. तेव्हा तो मिठाइवाला त्याला म्हणाला की खानसाब पैसे आपण पुन्हा कधीतरी घेउन जा. पैसे कुठे जात नाहीत फक्त आमचा पत्ता ठिकठिक लक्षात ठेवा म्हणजे झाले. मुल्ला काहीशा नाराजीने तेथून बाहेर पडला पण बाहेर पडताना दुकानाची खुण म्हणून लक्षात ठेवण्यासाठी त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला दुकानासमोर एक उंट बसलेला दिसला, त्याने तेवढेच लक्षात ठेवले. पुन्हा कधीतरी तो परत बाजारात आला तेव्हा उंट एका न्हाव्याच्य़ा दुकानासमोर बसला होता. मुल्ला आपल्य़ा पैशासाठी त्या न्हाव्याबरोबर भांडू लागला. तो म्हणाला मी अगदी व्यवस्थीत खुण लक्षात ठेवली होती म्हणून बरे, आजकाल दिवस वाईट आलेत माझ्या सुट्य़ा पैशासाठी तुम्ही तुमचा धंदा बदलाल हे मात्र तुम्ही अगदी वाईट केलेत, मुकाट्याने माझे पैसे टाका.
आपलेही असेच झाले आहे, आपणही उंटाचीच खुण लक्षात ठेवली. राम, कृष्ण, बुध्द, महावीर, ख्रिस्त, पैगंबर असोत की कबीर, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम असोत. आपण खुण म्हणून चुकीचीच गोष्ट पकडून ठेवली आहे. नाहीतर मग मुर्तीपुजा टाळा असा टाहो फोडूनही जगात सर्वात उंच विशाल मुर्त्या ह्या भगवान महावीरांच्याच उभा राहिल्या नसत्या. अपरिग्रह म्हणजे धनाचा संचय करु नका अशी शिकवन असुनही जैनच सर्वात धनिक बनले. बुध्दांचे अप्प दिपो भव हे कुणाला ऐकूच गेले नाही. शांततेसाठीच्या युध्दात लाखो मुस्लिम, ख्रिस्त लोक विनाकारन मेले नसते. म्हणे जगात शांती स्थापन करण्य़ासाठी आपल्य़ा धर्माचा प्रसार केला पाहीजे. तलवारीच्या जोरावर युध्द आणि युध्दाच्या जोरावर धर्म हा एकप्रकारचा विनोदच आहे.
आपल्या देशात महान मानसांची पुजा होते, त्यांचे पुतळे उभा केले जातात पण ते काय म्हणतात हे कोणीही ऐकत नाहीत.
आता या दुष्टचक्रातून बाहेर पडण्य़ासाठी देवाने आता एक "युनिक अवतार" घेतला पाहिजे. आणि ती वेळ आलेली आहे असे मला वाटते. म्हणून सावधान . . . .
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया