Tuesday, September 07, 2010

२१. निवडुंग -चित्रपट ( Marathi Film - NIVDUNG)

"निवडूंग" हा चित्रपट मी पहिल्यांदा इयत्ता सहावी किंवा सातवीत असताना पाहीला होता. त्या काळात दुरदर्शनवर रविवारी किंवा शनिवारी लागणारा चित्रपट हा सिनेमा पाहण्याचा एकमेव उपलब्ध स्त्रोत होता. चित्रपटातील बाकीचे काही लक्षात राहीले नाही पण डोक्यावर गोल टोपी घालून नी मैने प्यार कियाच्या सलमान खान प्रमाणे हावभाव करुन गाने म्हणणारा नायक मराठीत आहे एवढच लक्षात राहीले." तू हिरवी कच्ची .... " ह्या त्या वयात बे-अर्थी वाटणा-या गाण्याच्या ओळीही मनात कोठेतरी घुमत होत्या.
त्यानंतर जवळजवळ पंधरा-सोळा वर्षांनी मला तो सिनेमा पुन्हा" सह्याद्री" वाहीनीवरच पहायला मिळाला. आपल्या मनात कुठेतरी घर करुन बसलेला सिनेमा तो हाच या गोष्टीचा मला प्रथम खुप आनंद झाला. चित्रपटाचे नाव जसे समजले तसे मी त्याची गाण्याची कॅसेट मिळवली. मला या चित्रपटाबद्दल काय सांगू नी काय नकॊ असे झाले आहे.
पुढे जाण्याअगोदर प्रथम याच्यातील गाण्यांविषयी बोलायला मला आवडेल.
ग्रेस, सुरेश भट, शांता शेळके, आरती प्रभू अशा कविंनी लिहिलेल्या कवितांना पंडित -हदयनाथ मंगेशकरांनी खुप सुरेख असे संगीत दिले आहे. घर थकलेले संन्याशी, ती गेली तेव्हा, वा-याने हलते रान ही गाणी ऐकल्यावर एक गूढ आणि हवेहवेसे वाटणारे वातावरन आपल्या मनात तयार होते. केव्हा तरी पहाटे, लवलव करी पातं, तू तेव्हा तशी, ना मानोगे तो ही गाणी तशी चित्रपटाच्या कथेनुरुप येतात. यातील गाणी पहिल्यांदा ऐकल्यावर तितकीशी लक्षात राहत नाहीत आणि आवडतील अशीही नाहीत पण दुर-यांदा तिस-यांदा ऐकल्यावर त्याची खरी खोली लक्षात येते आणि आवडल्याशीवाय राहणार नाहीत.
कथानायक दामू एक नाटकसंस्थेत पडेल ती काम करणारा असा इमेज असणारा पण तरतरीत, नाटकात काम करण्याची उर्मी बाळगून असलेला युवक असतो. हा युवक रविंद्र मंकणीनी खुप मन लावून रंगविलेला आहे. नायकाच्या वडीलांकडून नाटकाचे व्यसन पुढे त्याच्याकडे आलेले असते. कोकणातील एका सुंदर गावात साध्या घरात एकटीच राहुन आपल्या नव-याच्यापश्चात उरलेला फाटका तुटका पण नेकीचा संसार सांभाळणा-या त्याच्या आईला हे माहीत नसते व तो नाटकाकडे वळू नये हीच तीची इच्छा असते. नाटकाच्या शौकाखातर आपल्या संसाराची झालेली धुळधान तीने सोसलेली असते. आपला मुलगा तिकडे शहरात मोठा साहेब म्हणून मिरवतो आहे पण आपल्या आईला विसरलेला नाही या गोष्टीचे तिला अप्रुप असते व ती त्याच खुषीत असते. त्याच्या लग्नाविषयी स्वप्ने पहात राहते.
इकडे नायक दामू मात्र निर्मात्यासह सेटवरच्या सगळ्यांची पडेल ती कामे करत असतो. कधीतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळेल म्हणून काम करता करता स्वत:ची स्वगते तयार करत असतो. वडीलांची स्वगते म्हणन्याची लकब अभिनिवेश त्याच्यामध्ये जन्मजातच असतो. एकीकडे दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेली स्वगते म्हणायची व दुसरीकडे इतरांकडून हेटाळणीची बोलणी ऐकायची त्यामुळे तो एकाद्या निवडूंगासारखा बनलेला असतो. दामू चहा आण, दामू कपडे इस्त्री कर यामध्येच आपले आयुष्य जाणार की काय असे वाटत असतानाच नायिका चित्राची एंट्री होते. नायिका चित्राची भुमिका अर्चना जोगळेकर यांनी केलेली आहे तो त्यांचा पहिलाच चित्रपट असावा.
चित्रा ही एक सुंदर नृत्यपारंगत पण एकूणच जगाच्या व्यवहारांपासून अनभिज्ञ युवती असते. ती आपल्या मावशी म्हणवून घेणा-या नाटक क्षेत्रातील जुन्या कलावंतीनीच्या सहायाने निर्मात्यापर्यंत पोहोचते. तेथेच तीची आणि निर्मात्याचे जोडे उचलणारा दामूची ओळख होते.
काही प्रसंगानंतर त्यांच्यात एक गुढ असे नाते बनते ज्याला प्रेम असे म्हणता येणार नाही. मात्र एका अनपेक्षीत वळणाने ते दोघेही दामूच्या गावातील घरी पोहोचतात. तेथे आईसमोर त्यांना नवरा बायको असल्याचे नाटक करावे लागते. नाटक करता करता चित्रा खरोखरच दामूच्या प्रेमात पडते व त्याच्याबरोबर नेहमीसाठी राह्ण्याची इच्छा दर्शवीते. पण दामू त्याला नकार देतो व हे फक्त नाटकच असल्याचे तिला सुनावतो. स्वत:ला सिध्द केल्याशिवाय किंवा जिंकल्याशिवाय चित्राचा स्विकार करणे त्याच्या स्वाभिमानी मनाला रुचत नाही.
चित्रपटाचा शेवट गोडच आहे पण त्यापुर्वी एकून एक सर्वच रस रंगांत हा चित्रपट गुंफलेला आहे.
चित्रपटातील सर्वांच्याच अभिनयाला १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील. शं. ना. नवरेंची उत्कृष्ठ कथा, त्याला लाभलेले महेश सातोसकर यांचे प्रगल्भ दिग्दर्शन यामूळे चित्रपटाची उंची खुपच वरच्या दर्जाची वाटते. बाकी सर्व विसरले तरी मुलावर भरभरुन प्रेम करणारी आई कधी काळी विसरली जाईल असे मला तरी वाटत नाही.

3 comments:

  1. गाणी तर फारच छान आहेत आणि चित्रपटही

    ReplyDelete
  2. छान लिहाला आहे तुमि पोवार साहेब!

    ReplyDelete

प्रतिक्रिया