Friday, September 17, 2010

२६. प्रामाणिकपणा

कांही कथा मनात घर करुन राहतात.
भले दुस-याला त्या तितक्याच आवडतील अशा नसतील किंवा त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर तितकासा होणार नाही. पण या कथा नेहमी स्मरणात राहाव्यात असे मात्र वाटते.
यापैकीच एक रघूवंश मधील राजा दिलीपची ही कथा. ही कथा मी दहाबारा वर्षापुर्वी कदाचीत वी.स.खांडेकरांच्या क्रौंचवधमध्ये वाचली होती पण अजुनही लक्षात आहे.
त्याकाळी रघूवंशातील राजा दिलीप हा अयोध्येवर राज्य करत होता. तो रघुवंशाला शोभेल असाच खुप पराक्रमी, प्रजाहितदक्ष असा असतो. त्याच्या राज्यात राहणारे एक ऋषी कोणतातरी यज्ञ करणार असतात व त्यांना त्या यज्ञासाठी सात लक्ष सुवर्णमोहरांची गरज असते.
आपल्या यज्ञासाठी लागणारे धन उपलब्ध करण्यासाठी शेवटी तो ऋषी राजा दिलीपकडे आपल्या एका शिष्याला धाडतात.
तो शिष्य राजाच्या दरबारात येऊन आपल्या गुरुचा निरोप कथन करतो. यज्ञासाठी गरजेच्या सात लक्ष सुवर्णमोहरा देण्याचा निर्णय राजसभा घेते.
पण त्याचवेळी प्रधान अधिकारी एक समस्या उपस्थित करतात ती म्हणजे राज्याचा खजिना रिकामा झालेला असतो व देण्य़ासाठी म्हणून एकही सुवर्ण मोहर शिल्लक नसते. तेव्हा आपल्या दारावर आलेला याचक परत जाता कामा नये व एकदा देण्याचा निर्णय झाल्यावर तो मागे घेणे चुकीचे आहे हे जाणून राजा दिलीप स्वर्गातील कुबेराच्या खजीन्यावर चाल करुन जायचे ठरवतो.
राजा दिलीपच्या पराक्रमाची महती अगोदरच कुबेराला असल्यामुळे तो वरुनच सुवर्णमोहरांची वृष्टी करतो.
स्वर्गातून पडलेल्या त्या सर्व सुवर्णमोहरा आपण नेऊन त्या ऋषींना द्याव्यात अशी सादर विनंती राजा दिलीप त्या शिष्याला करतो. पण तो शिष्य म्हणतो की गुरुंची आज्ञा आहे की फक्त सात लक्षच मोहरा आणाव्यात तेव्हा बाकीच्या मोहरा तुम्ही ठेवून घ्या.
अशाप्रकारे बाकीच्या मोहरा कुणी घ्याव्यात ही मोठी समस्या उत्पन्न झाली.
राजाचे म्हणने की सर्व सुवर्णमोहरा ह्या ऋषींच्याकरीता आहेत तर शिष्याचे म्हणने की फक्त सात लक्षच मोहरा गुरुंना हव्या आहेत बाकीच्याशी माझा काही संबंध नाही.

प्रामाणिकपणा यालाच म्हणत असावेत.
धन्य तो राजा, धन्य तो ऋषी आणि धन्य त्याचा शिष्य.

रघुवंशात अजुनही अशा खुप सुंदर सुंदर कथा असतील एकदा वाचलाच पाहीजे.

1 comment:

  1. अश्या प्रामाणिक "राज्यकर्त्याची"आपल्या सर्वांनाच कधी पासूनची गरज आहे.तो कधी येईल ते माहित नाही पण "always think/hope for the best"
    धन्यवाद.

    ReplyDelete

प्रतिक्रिया