Saturday, May 29, 2010

१०. स्टेज डेअरींग- म्हणजे चेष्टा नाही.

वक्तृत्व ही एक कला आहे, काहीजण ती प्रयत्नाने आत्मसात करतात तर काहीजनांना ही दैवी देणगी जन्मजातच असते.
वक्तृत्व म्हणजे सभाधीटपणा आलाच. चांगला वक्ता हा चांगला विचारवंत असेलच असे काही नाही पण तो चांगला सभाधीट असतोच. सभेसमोर गर्दीसमोर उभा राहून बोलायचे हे येरागबाळ्याचे काम नोहे. भल्याभल्यांची धोतरे सुटण्याची वेळ येते. येरवी हजारो लोकांना एका काठी व शिट्टीच्या जोरावर हाताळू शकणारा पोलिससुध्दा भाषण म्हंटले की चार पाय मागे सरकतो.
भाषणकलेच्या पुढचा भाग म्हणजे नाटकात काम करणे. नाटकात काम करणे हे तर हातात जिवंत विंचू धरुन न हालचाल करता उभा राहण्यासारखे आहे.
काही लोक हे सुध्दा अगदी सहजच करु शकतात. त्यांचा स्टेजवरचा वावर अगदी सहजसुंदर असतो, अगदी घरच्यासारखा.
पुर्वी आमच्या गावात गणेश उत्सवात विविध मंडळातर्फे स्टेजवर विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम खुपच जोरात असत होते. त्यामध्ये अगदी पौराणिक व अगदी नविन अशी नाटके, गाणी अशी सादर केली जायची.
जे जन्मजात कलाकार होते त्यांना हे कार्यक्रम म्हणजे धमाल आकर्षण होते तर काहींच्यासाठी ही एक नसती ब्याद होती. पण मंडळांच्या सभासदमर्यादेमुळे या कार्यक्रमांमध्ये सर्वांनाच भाग घ्यावा लागायचा. प्रत्तेकजण आपापली जबाबदारी पार पाडायचा .
आमच्या हनुमान तालीम मंडळाने त्यावर्षी जाणता राजा हे शिवचरित्रावर आधारीत नाटक बसविले होते. शिवाजींच्या मुख्यभुमिकेत प्रसिध्द शाहीर सदाशिव निकम हे होते तर दगडू घराळ, मधु येवलूजे, अशोक पोवार हे नेहमीचे यशस्वी कलाकार इतर पार्ट वटवणार होते.
गेले कितीतरी दिवस नाटकाच्या तालमी चालू होत्या, नाटक अगदी जमले होते.
उद्या कार्यक्रम असल्यामुळे आजच स्टेजची उभारणी चालली होती मंडळाचा घरचा सुतार म्हणजे पुंडलिक लोहार शिवाजींचे आसन तयार करत होता. पण कोठेतरी माशी शिकली, ऐन नाटकाच्या दिवशी शाहीर गैरहजर राहणार होते. शाहिरांना दुरच्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे शासकीय निमंत्रण आले होते.
आता शिवरायांची भुमिका कोण करणार हा खुप मोठा प्रश्न उभा राहीला होता. खुप गोंधळानंतर व चर्चेनंतर शिवाजीची भुमिका दुसरे कोणतरी करेल व त्याला स्टेज खालून प्राम्टींग करु असे ठरले. पण प्रत्त्यक्ष भुमिका कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच होता. त्यासाठी नावांची चर्चा सुरु झाली. कोणाचेच नाव फायनल होत नव्हते, कोण अगदी बुटके तर कोण काळे, कोण जाड तर कोण अगदी किरकोळ असे झाले होते. शेवटी कोणीतरी पुंडलीकच्या नावाची घोषणा केली तेव्हा धाडकन आवाज झाला. वरती पडदे मारणारा पुंडलिक दचकून खाली पडला व गयावया करु लागला. काय वाट्टेल ते काम सांगा पण स्टेजवर तेवढे यायला सांगू नका असे म्हणू लागला.
आमच्या कुंडलिकचेपण बरोबर होते जन्मात त्याने कधी लोकांच्या जमावासमोर स्टेजवर पाय ठेवला नव्हता. स्टेजवर आले की त्याचे हातपाय लटपटू लागत होते. तोंडातून शब्दच काय आवाज पण बाहेर येउ शकत नव्हता. काहीकेल्या तो या कामाला तयार होईना. पण आता नाइलाज होता सर्वांनी त्याची मनोमन विनवणी केली प्रसंगाचे गांभिर्य समजावून दिले तेव्हा तो कसातरी तयार झाला. पण त्याने काही अटी घातल्या शिवाजी महाराज एका जागेवरच बसून राहतील ते उठणार नाहीत व चालणारही नाहीत. त्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
तो दिवस उगवला. नाटकाची वेळ झाली. स्टेजसमोर प्रेक्षकांची गर्दी झाली होती. शो हाउसफुल्ल होता. पडदे अजुन बंद होते. शिवाजी अगोदरच आपल्या सिंहासनावर बसले होते. त्या सिंहासनाखाली एकजण त्याला प्राम्टींगसाठी बसला होता. बाहेर अनाउंसमेंट सुरु होती. इकडे शिवाजीची घालमेल सुरु होती. एकदोनवेळ पळून जाण्याचा प्रयत्नसुध्दा असफल झाला होता. अंग घामाने डबडबले होते. पाय लटपटत होते. आणि पडदा उठला. सिन सुरु झाला.
तानाजी मालुसरे शिवबांना भेटायला आला होता. शिवबांनी त्याला आपल्या धीरगंभीर आवाजात सांगावयाचे होते की " हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".
सिंहासनाखालून प्रांम्टींग करणारा सांगू लागला " महाराज बोला, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".
महाराजांचे एक नाही न दोन नाही तेव्हा त्याने आनखी एकदा सांगितले" महाराज बोला, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".
पण इकडे समोरची गर्दी पाहून महाराजांना कापरे भरले होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना.

सिंहासनाखालून प्रांम्टींग करणारा पुन्हा पुन्हा सांगू लागला पण महाराज गप्पच. एव्हाना प्रेक्षक चुळबुळ करु लागले.
महाराजांचा चेहरा रडवेला झाला होता. ते आता उठुन पळतील की काय असे वाटत होते. सगळेच हैरान झाले होते. कोणाला काय झाले हे कळेना. महाराज का बोलत नाहीत हे कुणालाच कळेना.
प्रेक्षकांची चुळबुळ वाढत जाउन आता गोंगाट सुरु झाला, प्रेक्षकांना शांत राहण्याचे आव्हान करुनही दंगा सुरुच झाला. शेवटी मंडळातेर्फे नाटक रद्द झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त करण्य़ात आली.

पडदे झाकण्यात आल्यावर सगळे शिवाजीवर तुटून पडले, बोलला का नाहीस? काय झाले? बोलला का नाहीस बोल?

गोंधळ शांत झाला तेव्हा कुंडलिकने शांतपणे उत्तर दिले," एवढी मानसं बघितली, काय बोलू आणि काय सांगू मी चड्डितच हागलोय !" त्याच्या या उत्तरावर सगळे आपले नाक मुठीत धरुन हासू लागले. प्रांम्टींग करणा-यावर भर रात्री विहिरीवर अंघोळ करायला जायची वेळ आली होती.

तर असा हा स्टेज डेअरींगचा अनुभव. असा अनुभव पुन्हा कोणाच्या वाट्याला नको रे बाबा!!!

1 comment:

  1. पहिल्याने स्टेजवर उभा राहिलो तेव्हा समोरचा हॉल माझ्या डोळ्यांसमोर उलटापालटा झाला. पाठांतरामुळे प्रसंग चांगल्या रितीने साजरा मात्र झाला

    ReplyDelete

प्रतिक्रिया