त्यादिवशी बसमध्ये जेमतेम गर्दी होती.
त्याने उठून त्याबाईला जागा दिली आणि तिथेच बाकाला रेलून उभा राहीला.
त्याची ही नेहमीची स्टाईल होती. खरंतर तो कागलमध्ये म्हणजे अगदी पहिल्या स्टॉपवर नेहमी ठरावीक जागा हेरून बसत असे. त्यानंतर अगदी दुस-या किंवा तिस-या स्टॉपवर जरी कोण बाई चढली तरी तो उठून लगेच आपली जागा द्यायचा आणि तिथेच बाकाला रेलून उभा रहायचा. नंतर जागा झाली की शेजारी बसायचा. त्यानेच जागा दिलेली असल्यामूळे ती स्त्री अगोदरच त्याच्या उपकाराखाली असते त्यामूळे ती त्याला "नीट उभा रहा" असं फणका-याने म्हणत नाही. मग तोही त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत मिळेल तसा ’चान्स’ घ्यायचा.
लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याचा हा नेहमीचाच उद्योग असल्यामूळे तो कधीतरी बसमधल्या लोकांचा मार खाणार हा अंदाज मी बांधून होतो. त्यादिवशी मीही लोकांच्यात सामील होऊन त्याला मारावे काय? असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण दुस-या क्षणी माझ्या लक्षात आले की साधारण सहा फूट तीन इंच उंच आणि एकशे दहा ते पंधरा किलो वजनाच्या या पोत्याला बसमधल्या सगळ्या लोकांनी मिळून एकदम जरी मारले तरी त्याच्यावर काय परीणाम होणार नव्हता.
एक दिवस तो बसमध्ये लवकर येऊन बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. तो उठून दुसरीकडे बसला. नंतर एक मुलगी बसमध्ये चढली, मी तिला माझी जागा दिली आणि मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याला हे थोडे खटकले पण तो याबाबतीत काय करु शकत नव्हता. त्यादिवशी त्याच्याकडे पाहिल्यावर मला काजोलच्या दुश्मन चित्रपटातला गोकूळ पंडित हा पोष्ट्मन आठवला.
एके दिवशी सकाळी आमची नेहमीची बस कागलमध्ये नटून-थटून उभी होती. बसला फूलांच्या माळा लावलेल्या होत्या, आतमध्ये रंगी-बेरंगी कागदी झिरमुळ्या लावलेल्या होत्या, सुंदर-सुंदर चित्रे लावलेली होती. बसमध्ये नविन म्युझिक सिस्टीमही बसवलेली होती. मी कंडक्टरला विचारले तर तो म्हणाला, "आज ही १८८२ क्रमांकाची बस कागलला सुरु होऊन एक वर्ष झाले म्हणे."
" मग, हे डेकोरेशन कोणी केले आणि ती सिस्टिम कुणी बसविली?"
" हे सगळं मनोजचं काम."
" कोण मनोज ?"
" तो नाही का तो जाड्याला नेहमी याच बसमध्ये असतो की तो..."
माझ्या लक्षात आलं की त्याचंच नाव मनोज. माझ्या मनातली त्याच्याबद्दलची उत्सूकता वाढली.
थोड्यावेळाने ड्रायव्हरबरोबर चहा घेऊन तो आला. मी त्याला विचारले," काय मनोज आज काय खुष आहेस वाटतं? कुठं जोराचा मटका लागला काय?"
तो जरा बावरला, म्हणाला," नाही, नाही, आपली एक इच्छा होती ती पुर्ण केली. आपण नेहमी या बसने प्रवास करतो, ऐकायला गाणी आणि सजवलेली गाडी असली की कसं बरं वाटतं."
या निमित्तानं मी त्याच्याशी ओळख करुन घेतली. त्यादिवशी तो स्वत: माझ्याजवळ बसला. मी त्याला काय करतोस असे विचारले तर म्हणाला की मी उद्यमनगरात स्पेअरपार्टच्या दुकानात नोकरीला आहे. त्याच्याजवळ नेहमी ’मुंबई चौफेर’ किंवा ’पुण्यनगरी’ असले पेपर असत त्याचे कारण विचारले तर म्हणाला टाईमपासला शब्दकोडे सोडवतो. मी पाहीले तर एवढ्या सकाळीही त्याच्यातले कोडे पुर्ण सोडवलेले होते. माझ्यामूळे तो आता माझ्या इतर मित्रांच्यात मिसळू लागला. दररोज गप्पा-टप्पा, थट्टा-मस्करी सुरु झाली. तो सर्वात अगोदर येत असल्याने सगळ्यांच्यासाठी जागा धरुन ठेवत असे. यामध्ये पुढे पुढे बसमधल्या नेहमीच्या मुली व स्त्रीया ही सामील झाल्या. आता मनोजने बसमधला त्याचा नेहमीचा उद्योग पुर्णपणे सोडला होता. कधी कधी मी त्याला पुर्वीच्या त्याच्या उद्योगाबद्दल छेडत असे तेव्हा हसत हसत तो विषय टाळत असे.
मी ती बस बदलली व दुस-या मार्गावरच्या बसने प्रवास करू लागलो. कांही दिवसांच्या अंतराने तो पुन्हा मला दुस-या बसमध्ये भेटू लागला. मी त्याला विचारले तर म्हणाला, "मी ती नोकरी सोडली, मी आता वीजबीले वाटायचं काम करतो."
" मग हा उद्योग तूला आवडला असेल. बिले द्यायला दुपारच्या वेळीच जात असशील."
" होय, त्यावेळी घरी बहूदा बायाच असतात. खुप ठीकाणी चहा प्यायला लागतो राव!"
" आणि तू नाही म्हणतच नसशील"
" नाही कसं म्हणायचं, एवढा आग्रह करत्यात म्हटल्यावर ..."
मी त्याच्याविषय़ी विचार करू लागलो.
एक दिवस त्याने माझी ओळख एका ठिकठाक दिसणा-या महिलेची ओळख करुन दिली. ही डॉक्टरांकडे नर्स म्हणून काम करते एवढेच सांगितले आणि मी त्याचा मित्र आहे आणि मोठ्या ऑफिसात साहेब आहेत अशी माझी ओळख सांगितली. या प्रसंगात मी अवघडून गेलो होतो.
नंतर मी त्याच्याबरोबर सविस्तर बोललो तेव्हा समजले की ती सध्या एकटीच राहते आणि तिलाही कोणीतरी आपले असावे असे वाटते. हा आठवड्यातून एक-दोन वेळा तिच्या रूमवर जातो. जाताना मटन, स्वत:साठी एक तुंब्या व तिच्यासाठी गजरा न्यायला विसरत नाही. कधी एकत्र सिनेमाला जातात तर कधी बाजारात फिरून येतात. सध्या तो खुप खुष दिसत होता आणि नेहमीपेक्षा नीटनेटका पण रहात होता. मी त्याला म्हटले की तू तिथे एकटाच असतोस ना? तर म्हणाला," मी असताना तर तिथं दुसरं कोणी नसलं म्हणजे झालं. स्वत:च्या बायकोबद्दल तर कुठं खात्रीने सांगता येतं?" असं म्हणून तो हसू लागला.
त्यानंतर त्याची माझी भेट ब-याच कालावधीनंतर झाली. मधल्या काळात ती नर्सबाई बसमध्ये दिसली होती मी ओळख दाखवायचे टाळले तरी तिने भावोजी म्हणून हाक मारलीच. मी तिला बसायला जागा दिली आणि पुढे जावून बसलो.
त्याला मी तिच्याबद्दल विचारले तेव्हा तो एकदम चिंताग्रस्त झाला. म्हणाला," साहेब, वीस-बावीस हजार रुपये खर्च केले पण तीचा रोग हटत नाही. कसला रोग झालाय कुणाला माहीत. तिला मटण खाऊ नको असं डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामूळे मीही मटन सोडले आहे. आता मी तिच्या घरी जात नाही, आम्ही फक्त सिनेमाला जातॊ आणि बाजार करतो. परवा दिवाळीला नवी साडी घेऊन दिली."
मी त्याला असं भावविवश होताना पहिल्यांदाच पाहीलं होतं.
मी त्याला विचारले," तुमच्या घरी कोण कोण असतं?"
"साहेब, बाकीच्यांना सांगू नका, खुप दिवसांनी मी कुणाला तरी हे सांगत आहे, मी अनाथ आहे, पडेल ती कामं करुन मोठा झालो अंदाजानेच लिहायला वाचायला शिकलो आणि मी कुठली नोकरीही करत नाही, मटका गोळा करतो. लहान असल्यापासून जवळचं असं कोण नव्हतंच साहेब. मग कुठलं लग्न आणि कुठली बायको. बसमध्ये असलो की घरी असल्यासारखं वाटतं तुम्ही सगळेजण भेटत होता माझे दिवस कसे झपाट्याने जात होते. कधी दुसरा दिवस उजडेल आणि कधी तुम्ही भेटता असं होईल. त्यातूनच जयाची ओळख झाली आतातरी जगण्याचे काहीतरी निमित्त सापडेल असं वाटलं होतं पण . . . जाऊ दे." त्यानं एक लांब उसासा टाकला.
थोड्यावेळाने म्हणाला," मग साहेब, तुमचे कसं? घरी कोण कोण असतं?"
" तू आमच्या घरीच ये एक दिवस"
मी त्याला माझ्या घरी येण्यासाठी पत्ता दिला. त्याचे डोळे भरुन आले.
तो येतो येतो म्हणाला पण आजपर्यंत आला नाही.
मस्तच लिहिता तुम्हई, यात काही वादच नाही. आणि तुमचं हे "मला भेटलेली माणसं" सदर तर फारच सुंदर होत चाललय. मला तुमचे पोस्ट्स जाम आवडतात आणि तुमच्याकडून अजून असेच चांगले वचायला मिळेल अशी आशा करतो. मस्त वाटलं वाचून.
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख.. शेवट तर खूप आवडला..
ReplyDelete"मला भेटलेली माणसं" छान चालू आहे.. अजून येउद्या..
>>अतिशय सुंदर लेख.. शेवट तर खूप आवडला..
ReplyDelete"मला भेटलेली माणसं" छान चालू आहे.. अजून येउद्या..
+१०००