Saturday, January 22, 2011

४५. लबाड प्रोफेसर

प्रोफेसर श्री. प्रभाकर जोशी एम. ए. पी. एचडी. कांही कामानिमीत्त आपली इंपोरटेड कार घेऊन शेजारच्या शहराकडे जात होते.
रस्ता खेडेगावातून जात होता. रस्त्यावरून जाणारी येणारी गुरे, कुत्री आणि रस्त्यावर मध्येच उभा राहून गप्पा मारणारे गावकरी यांच्यामुळे प्रोफेसर महाशयांना खुपच मन:स्ताप सहन करावा लागत होता. मन शांत ठेऊन कशीतरी आपली इंपोर्टेड कार त्या भिकार रस्त्यांवरून पुढे नेताना त्यांचा जीव मेटाकूटीला आला होता. ड्रायव्हरला सुट्टी दिल्याबद्दल स्वत:ला टॊचण्या देत देतच ते पुढे जात होते.
वाटेत एक मेंढ्यांचा कळप आला. त्यांनी करकचून ब्रेक लावला पण गाडी थांबे पर्यंत एका मेंढीच्या पायावरून चाक गेलेच.
मेंढीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लगेचच तीचा मालक तेथे आला.
एका जातीच्या धनगराला त्यांनी इतक्या जवळून कधी पाहीले नव्हते. ते सहाफूट उंच आणि दोनफूट बाय दिडफूट रुंद अखंड धूड पाहून पहील्यांदा त्यांना धडकीच भरली.
आपला चष्मा पुसून त्यांनी डोळ्यावर लावला आणि गाडीतून खाली उतरले. तो धनगर तोपर्यंत गाडीच्याजवळ पोहोचलाच होता त्याने विचारले," काय साहेब हे काय केलंसा? गरीब मुका जीव, बघा कसा ओरडतोय तो?"
प्रोफेसर स्वत:ला सावरुन म्हणाले," छॆ, छे, काही नाही, कांही नाही फक्त पायावरुन गाडी गेली आहे बाकी कांही नाही. तो पाय लवकरच दुरुस्त होईल कांही काळजी करण्यासारखं नाही"
" म्हणे काळजी करण्यासारखं काही नाही," त्या धनगराला आता राग आवरेना. तो धनगर पुढे म्हणाला," या, साहेबराव इकडे या."असं म्हणून त्याने प्रोफेसर महाशयांना गाडीजवळून बाजूला ओढून उभा केले आणि त्यांच्या पायाभोवती एक रिंगन आखले आणि म्हणाला," हं, गप्प गुमान या रिंगणात उभा -हायाचं, रिंगणाच्या बाहीर पाय ठेवल्याला दिसलास तर तुझा पायच काढून हातात देतो."

" बघ आता काय काळजी करण्यासारखं आहे का नाही ते?" असं म्हणून त्याने आपल्या हातातल्या काठीने एका घावातच त्या इंपोर्टेड कारची पुढची काच फोडून टाकली.
" बघीतलस काय?" असं म्हणून त्याने प्रोफेसरसाहेबांकडे पाहीले तर ते हसत होते.
त्याने रागाने मागची काच फोडली तरी प्रोफेसर हसत होते.
" काय हसतोस रे माकडीच्या" असं म्हणून त्या धनगराने गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या तरिही प्रोफेसर हसतच होते.
धनगराला काही कळेना त्याने प्रोफेसर साहेबांची कॉलर धरुन विचारले," कायरे भुसनळ्या तुझ्या या मोटारीचे एवढे नुस्कान झालं आणि तुला दात इचकायला काय झालं?"
प्रोफेसर साहेब आपलं हसू आवरत म्हणालं," तूला . . . तूला माहीत नाही , तूला माहीतच नाही"
"आरं, काय माहीत नाही सांगशिल काय नाही"
" तूला माहीत नाही मी दोनवेळा या रिंगणातून बाहेर आलो होतो आणि तूझं लक्षच नव्हतं माझ्याकडे!!" आणि पुन्हा ते जोर जोरात हसू लागले.

3 comments:

प्रतिक्रिया