बापू भिसूरे हा एक इरसाल माणुस आमच्या सिध्दनेर्ली गावात होऊन गेला.
शर्ट किंवा नुसतीच बंडी, धोतर किंवा पॅन्ट, डोक्याला पटका नेसलेला नसेल तर मफलर किंवा टॉवेल गुंडाळलेला असा सर्वसाधारन पेहराव. पटका हा लग्न इ. समारंभातच दिसायचा.
बापू भिसु-याने सर्वसाधारणपणे पोटापाण्यासाठी दोनचार प्रकारची कामे केली. कोणाच्यातरी शेतात कामे केली, ऊस तोडायला किंवा गु-हाळावर फडकरी म्हणून गेला, स्वत:ची चार-दोन गुंटे जमीन पिकवली आणि खानीत जाऊन दगड फोडले. अठरा-वीस किलो वजणाच्या सुतकीने दगड फोडणारी कांही माणसे मी पाहिलीत त्यातला एक म्हणजे बापूदा. पहारीने दगडात भोक मारुन त्यात सुरुंगाची दारु भरुन त्याचा स्फोट करण्याच्या कामात बापूदाची गरज लागायची.
पण या उपयोगाच्या गोष्टीसाठी उपयोगाचा बापूदा कोणाच्याही लक्षात राहणार नाही. बापूदाला लोक वर्षानुवर्षे ज्यासाठी लक्षात ठेवणार त्या गोष्टीच अजब आहेत.
खेड्यापाड्यात सोंगीभजन हे एक करमणुकीचे साधन होते. त्यात ’वाल्याचा वाल्मिकी झाला’ हे नाटक असावयाचे. त्यात वाल्या कोळ्याचे स्वांग (सोंग) बापूदाकडेच असायचे. " या वडगावच्या दरीत .... " असा त्यानं ठोकलेला डॉयलाग अजून आमच्या लक्षात आहे. "आमच्या पार्टीचे पुढचे स्वांग आहे .. . " अशी एंट्री आजून दुसरीकडे कुठे पहायला मिळाली नाही.
मोहर्रमच्यावेळेस रात्री करबल सुरु असताना वेगवेगळी सोंगे आजूनही काढली जातात. त्यात काढण्या घातलेला खुणशी दरेडेखोराचे सोंग बापूदाकडे असायचे. आता यावर्षी ते काम कोण करणार असा प्रश्न आहे. कदाचीत त्यावेळेस बापूदाची सगळ्यांना आठवण येईल.
वेगवेगळ्या विषयावर पैजा लावणे ही बापूदाची खासीयत होती.
एकदा म्हणे पुरणाच्या पोळ्या खाण्याची पैज लागली होती तर या पठ्याने अख्खी बुट्टी म्हणजे साधारण पन्नासभर पोळ्या खाल्या होत्या असे सांगतात. तसेच एकदा बुट्टीभर जिलेब्याही खाल्या होत्या. त्यावेळी बापूदाने कोणतीतरी मुळी आदल्या रात्री खाल्ली होती म्हणे आणि त्यामुळे त्याला हे कर्तब शक्य झाले म्हणतात.
घागर भरुन ताडी पिण्याचा पराक्रम या लोकांनी केला होता. ताडीही अस्सल आणि कडक होती. चार दिवस आणि चार रात्री यांना जगाची खबरबात नव्हती.
एकदा बोलता बोलता पैज लागली की बापूदाने पादून(अपानवायू विसर्जणाद्वारे) दिवा विझवायचा.
झाले माघार घेईल तो बापुदा कसला. बापुदाने जोरात तयारी केली. (म्हणजे काय केले ते सिक्रेट आहे)
रात्री पैजेच्या ठिकाणी सगळे जमले. (हो दिवसभर कामे करुन रात्रीचे हे उद्योग सुचायचे.)
आमच्या गावात एमएसईबीचा उदय होण्यापुर्वीचे ते दिवस होते त्यामुळे दिवा पेटवलेलाच होता. आता बापूदाने तीन प्रयत्नात तो विझवायचा होता.
पहिला प्रयत्न - बापूदाने पोझ घेतली आणि ताकदीने दणका दिला जोराचा आवाज बाहेर पडला, दिवा थरथरला - पण दिवा विझला नाही. दुसरा प्रयत्नातही बापूदाला यश आले नाही. मात्र खोलीत घुसमटल्यामुळे बरीच मंडळी मात्र कमी झालेली होती.
तिसरा आणि शेवटचा प्रयत्न मात्र बापूदाने निकराचा केला आणि दिवाच मुजला. सर्वत्र अंधार आणि सारी मंडळी गायब .
तर असा हा बापूदा सदासर्वदा आपल्या करामतींनी लक्षात राहील.
ईश्वर त्याच्या मॄतात्म्यास चिरशांती देवो.
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया