अब्द-शब्द या नावाचा एक सुंदर ब्लॉग लिहीणा-या सविता यांनी माझ्या यापुर्वीच्या "ग्लॅमरस गरीबी" या ब्लॉगवर लिहिलेली प्रतिक्रिया अशी होती,’ स्वभावाची गरीबी, पैशाची गरीबी , विचारांची गरीबी .... असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत .... त्यातली फक्त पैशाची गरीबी दाखवायला आपल्याला आवडते.’
यापुर्वी त्यांनी एक ब्लॉग लिहीला होता त्याच नाव ,’ ब्लॉग नंबर ५६. पाच रुपयांची भिंत’ दि.२०/१२/२०१०. या ब्लॉगमधला चहाचा उल्लेख आणि वरील त्यांची प्रतिक्रिया यांच्याशी संबंधीत एक घटना घडली होती ती अशी.
खरंतर ही घटना पुर्वीच घडून गेली होती व मला त्यांचा ब्लॉग वाचताना आठवली होती. पण या कथेतील पात्राविषयीच्या माझ्या भावना व्यक्त कराव्यात की नाही किंवा मी एकांगी तर विचार करत नाही ना? अशी शंका येऊन मी लिहिण्याचे टाळले होते. पण असो, आज ती वेळ आलीच.
तेव्हा गडहिंग्लज येथे आमच्या कंपनीचे काम सुरु होते.
कामावर लागणारे कामगार मुख्यत: कर्नाटकातील कणगल्ला या गावातील असावयाचे.
गेली दोन-तीन वर्षे या गावातील पंधरा ते वीस कामगार आमच्याकडे वेगवेगळ्या साईटवर काम करत होते. नवीन साईट सुरु करताना प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन त्यांना घेऊन यावे लागे. कारण हे लोक दररोजच्या मोलमजुरीवर राबणारे असल्यामुळे त्यांच्याकडे एसटीसाठी जादा पैसे नसायचे. आणि घरी आठवड्याचे रेशन किराणा सामान भरण्यासाठी पैसेही त्यांना आगावू द्यावे लागत असत. दिलेले पैसे नंतर आम्ही हिशेबातून कापून घेत असतो. पण हे लोक प्रामाणिक व कष्टाळू आहेत. त्यामुळे या येरझारीचे आम्हाला काय वाटायचे नाही.
यापुर्वी याकामासाठी कृष्णात पाटील हे जात होते त्यामूळे मला त्यांची फारशी माहीती नव्हती. यावेळेस त्यांना आणण्यास मलाच जावे लागणार होते.
घरी जेवायला परत येतो असे सांगून मी गाडीला किक मारुन थेट कागल, निप्पाणी, हिटणी असे करत कणगला गाठले.
सकाळी दहाची वेळ असेल.
मी रवी नावाच्या कामगाराला शोधत होतो. आज गावातील कोणीच ओळखीचे वाटत नव्हते. रवीच्या घराजवळच एक ओळखीचा चेहरा दिसला. अरे हा तर आमचा गाववाला, आमचा वर्गबंधू ईश्वरच होता. ईश्वर कांबळेला तिथे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अंदाजे हाक दिली तर त्यानेही मला ओळखले आणि आश्चर्य व्यक्त केले.
मी त्याला तिथे येण्याचे प्रयोजन विचारले. आपल्या डंपरवर कामावर असलेल्या कामगाराला न्यायला आलो आहे असं त्यानं सांगितलं. मीही माझे येण्याचे कारण सांगितले.
मी त्याला विचारले, ’तू तर शिक्षक म्हणून नोकरीवर आहेस ना? मग आज शाळेला दांडी काय ?’
तो म्हणाला,’छे, छे, डांडी मारुन कशी चालेल. मी सकाळी जाऊन मस्टरवर सही मारुन आलोय. तिकडे मीटर सुरु आहे आणि इकडे मीटर पाडायचं आहे.’ असं म्हणून तो हसायला लागला.
’एवढ्या सकाळी तू शाळेत गेलास कधी, आलास कधी?’
’ आज सकाळची शाळा आहे त्यामूळे सकाळी लवकर बाहेर पडलो, गावातून सत्तर किलोमीटरवर गगनबावडा तालूक्यात शाळा आहे. तिथून मागे कागल साठ कीलोमीटर आणि तिथून हे गाव पन्नास किमोमीटर असं १८० किलोमीटर रनिंग झालं आहे आता परत दिडशे किलोमिटर जाऊन तेवढेच अंतर परत यायचं आहे.’
मी डोक्याला हात लावला. मोटरसायकलवरुन एका दिवसात ५०० किलोमीटर? एवढा प्रवास म्हणजे रात्री झेंडू बामशी गाठ.
तो बाहेरच आपल्या बाईकजवळ उभा होता. त्याचा डंपरड्रायव्हर घरातून बाहेर आला आणि त्याने मला पाहताच ओळखले. " परदीपसाहेब " अशी आश्चर्ययुक्त हाक मारून तो धावतच माझ्याजवळ आला.
" तुम्ही आलायसा साहेब आज आमच्या घरचा च्या तुम्ही घेतलाच पाहिजे." त्याचा चहासाठी आग्रह.
मी म्हंटले," चल तर चहा तर चहा आणि त्यात बुडवायलाही आण"
"बुडवायलाही आण" असं मी म्हंटल्यावर तो आणि मी खळखळून हसू लागलो. याचं कारण जॅकवेलच्या कामावर असताना वर्क्या (बटर पावाचा मोठा भाऊ) संपल्या म्हणून ह्यानच नदीत सापडलेला ताजा मासा चहात बुडवून खाल्ला होता ते मला कोणीतरी सांगितले होते. ते दोघांनाही आठवले.
"ईश्वर चल चहा घेऊया".
"छे छे मी घरात घेऊन आलोय"
" अरे मीही घेऊन आलो आहे, चल थोडा थोडा घेऊ"
पण तो एकदम बावरल्यासारखा झाला.
"अरे चल, एक कप चहाने काय होतय"
तो जास्तच चूळबूळ करु लागला. त्याला चहा घ्यायचा नव्हता हे मला पहिल्यांदाच लक्षात आले होते पण तो इतका बावरला कशामुळे ते माझ्या लक्षात येत नव्हते.
"अरे मला लेट होतोय साईटवर जायला"
पण त्याचा ड्रायव्हर आल्याशिवाय तो कांही जाऊ शकत नाही हे मला माहीत होते. याला आपण चहा पाजायचाच आणि त्याचं चहा न पिण्याचं कारण शोधून काढायचं असं मी ठरवले.
चहा आला आणि सोबत पार्ले बिस्किटे असलेले एक ताटही आले कदाचीत ही बिस्किटे त्याच्या लहानग्याच्या वाट्याची असावीत.
" अरे ही लहान पोरांची बिस्कीटे आहेत, मला नकोत बाबा" असं म्हणून मी कप उचलला.
ईश्वरने नाईलाजाने कप उचलला पण तोंडाकडे जाईना. मी चहा संपवून त्याच्याकडे पाहीले. तो चहा थंड व्हायची वाट पहात होता. चहा थंड होताच त्याने एकाच घोटात पिवून सुटकेचा श्वास सोडला.
त्याचे हे वर्तन सगळ्यांच्याच लक्षात आले आणि खटकले.
त्या ड्रायव्हरचा चेहरा सगळं कांही सांगत होता.
त्या कामगारासाठी मी एक मोठा माणूस होतो. एवढा मोठा माणूस आजवर त्यांच्या घरी आलेला नव्हता. त्याला माझ्यासाठी काय करु आणि काय नको असे झाले होते. हा ईश्वरही त्याचा मालकच होता पण त्याच्यासाठी त्या ड्रायव्हरच्या मनात इतका आदर का नसावा?
मी मराठा आहे आणि तो ईश्वर महार आहे हेही त्या ड्रायव्हरला ठाऊक नसावे. तरीही त्याच्याकडून हा फरक का होत होता?
मला वाटते की तो ड्रायव्हर आमच्या वर्तणुकीवरुनच हा भेदभाव करत असावा.
आम्ही साईटवर गेलो की नेहमी त्यांनी साईटवर शिजवलेलेच जेवत असू. एकाच ताटातली भाकरी वाटून खात असू. भले आम्ही मारुतीगाडीतून फिरू, उंची ड्रेस वापरु पण हा समोरचा इसम कोणत्या जातीचा असेल हा विचार आमच्या मनात येत नाही. ते कामगारही आमचा आदर करत आणि आम्ही त्यांची काळजी घेत असू. कदाचीत या वर्तणूकीने ते आम्हाला उच्चवर्णीय मानत असावेत.
आमचे इतके मित्र आहेत त्यात वेगवेगळे जातीधर्माचे , पंथाचे सगळे आहेत. आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी जरुर करु पण असा भेदभाव आम्ही कोणी केल्याचे मला आठवत नाही. जाती धर्माच्या नावाने चालणा-या चेष्टे वरून हेच लक्षात येईल की आम्ही त्याला फारसे महत्व देत नाही. याउलट ईश्वर हा जातीने महार होता(त्याआधारेच नोकरीवर होता), फारतर माझ्यापेक्षा जास्त पैसेवाला होता असं म्हणता येईल. याच्याकडे आलेल्या पैशामुळे तो स्वत:ला कोणीतरी समजायला लागला होता का? कालपर्यंत हा त्यांच्यातलाच एक होता आज काय झाले? आणि एक कप चहाने त्याचे काय बिघडणार होते. गरीब किंवा खालच्या जातीच्या माणसाघरचा चहा इतके वाईट तोंड करुन पिण्याचे कारण काय? हा माणूस एक सरकारी नोकरी असताना मिटर पाडायचे म्हणुन ५०० किमी प्रवासाला तयार होतो पण त्याला आपल्या कामगाराच्या घरचा एक कप चहा जड होतो?
आणि खरं सांगायचं झालं तर तो चहाही उत्तम होता. त्यात साखर, चहा पावडर आणि दुधही होतं. कारण कांही उच्च किंवा श्रीमंता म्हणविनारांच्या चहात सगळं कांही मोजून मापून घातले जाते. असा चहा प्यायल्यानंतर मला बाहेर जाऊन चॉकलेट खायची इच्छा होते.
मला सनक आली होती त्याच्या थोबाडीत मारावी असे वाटत होते पण कारण काय सांगणार? की तू चहा घेत नाहीस म्हणून मारले?
तो ड्रायव्हर माझ्याकडे अगतिकतेने पहात पहात त्याच्या सोबत निघुन गेला.
तिथल्या लोकांनी नंतर मला सांगीतले की मी आलो म्हणून तो घरात आला आणि चहा घेतला नाहीतर तो नेहमी गल्लीच्या टोकावर उभा रहायचा आणि लांबूनच हाका मारायचा. साईटवर पाणी उष्ठे का केले म्हणून त्याच्यात आणि ड्रायव्हरच्यात भांडण झाले होते. आणि त्यानंतर घरी आलेल्या ड्रायव्हरला साईटवर न्यायला ईश्वर आला होता.
नंतर कांही आठवड्यांनी ईश्वर गावात भेटला. आमच्या घरी चहा घेता घेता ईश्वरला मी त्या दिवसाबद्दल छेडले. तर म्हणाला" नाही रे माझे मनच होत नाही अशा ठिकाणी चहा प्यायला, मला ओकारी येते"
तो गेला तेव्हा मी बाहेर जाऊन चॉकलेट खरेदी केले.
वाईट वाटतं असं वाचलं की. कधी बदलणार आपल्याकडची ही परिस्थिती कुणास ठाऊक. मी नेमकं अनिल अवचटांचं प्रश्न आणि प्रश्न पुस्तक वाचतेय. त्यात बलुतेदारांवर एक प्रकरण आहे. अगदी हेच आहे त्यात. आपल्याला अगदी ठळक जातीच माहित असतात, पण सर्वसामान्यं माणसं ज्यांना खालच्या जातीतले (हे लिहितानाही शरम वाटते आहे) समजतात, त्याच्यांतही अंतर्गंत जातीभेद किती आहे याचं विषण्ण करणारं चित्र आहे अवचटांच्या पुस्तकात. वाचलं नसेल तर जरुर वाचा. त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे की मी जातींचा उल्लेख सरळ केला आहे कारण तेच वास्त्व आहे. मोठ्या शहरांमध्ये हे संपल्यात जमा आहे असं निदान मानलं तरी जातं, पण बाकी ठिकाणांचं काय? <<>> छान शेवट!
ReplyDeleteआपण याला गरिबी म्हणून गरिबांचा अपमान करता आहात. ही गरिबी नसून दरिद्रीपणा आहे.
ReplyDeleteमाफ करा, आपण गरीबी न म्हणता वैचारिक दरिद्रीपणा म्हणूया.
ReplyDelete