आपल्या देशात "गरीब" आणि "गरिबी" या दोन शब्दांइतके ग्लॅमर दुस-या कोणत्याही शब्दांना नसेल.
आपल्याकडे सहज जाताजाता तुम्ही कुणाला विचारले," काय हो, कसं काय चाललंय?"
"काय चालायचं, गरिबाचं?" असंच उत्तर आपल्याला मिळेल.
स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेण्यात काय मजा आहे ठाऊक नाही.
बरं दुस-या कोणी या लोकांना तोंडावर गरीब म्हणू शकेल असंही नाही.
दुकानातला प्रसंग घ्या.
" काय साहेब(किंवा शेठ/मालक/सावकार), बोला काय देऊ आपल्याला?"-दुकानदार आदबीने.
" आम्ही कसले साहेब (किंवा शेठ/मालक/सावकार), आम्हा गरिबाला काय लागतय़ं ? बरं द्या दोन किलो साजूक तूप आणि बदाम एक किलो ...."
त्या दुकानदाराने शेठ किंवा साहेब म्हंटले की यांना आतून बरेच वाटते पण आपल्याला डायरेक्ट शेठ म्हंटलेलं यांना धोक्याचं वाटतं. आपल्या श्रीमंतीचा उल्लेख डायरेक्ट व्हायला हवा की नको याच्या संभ्रमातच हे लोक असावेत. जर तोच दुकानदार यांना जर असे म्हणाला असता की काय हो काय हवे ते लवकर लवकर बोला माझ्याकडे तुम्हासारख्य़ांसाठी वेळ नाही. किंवा काय रे गरीब माणसा तुला काय करायचे आहेत तूप आणि बदाम? तर याच माणसाची अवस्था बघण्य़ासारखी झाली असती.
आपली श्रीमंती आपला पैसा दिसला पाहीजे त्याचा उल्लेख दुस-याने केला पाहीजे पण आपण मात्र आपल्या तोंडाने ’आम्ही काय गरीबच हो’ असा सुर हे लोक पकडून असतात.
कदाचीत स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेत हे लोक नम्रपणा किंवा विनयशिलता दाखवत असतील. पण यांच्याकडे आलेला पैसा कसा आलेला आहे ते सर्वांना माहीत असतेच ना.
हा गरीब शब्दच मोठा जादूमय आहे.
कॉंग्रेसने तर ’गरीबी हटाव’ या ना-यावर कितीतरी निवडणुका जिंकल्या आहेत आणि कितीतरी लोकांची गरीबी हटविलेली आहे जे आज त्यांच्या पक्षात किंवा विरुध्दपक्षात आहेत.
’गरीबी हटाव, गरीबी हटाव’ म्हणजे काय? यापेक्षा ’श्रीमंती वाढवा’ असे म्हणू शकतो पण त्या ना-यात एवढा दम नाही.
बरे श्रीमंत व्हायचे कशासाठी? कारण आपल्याकडे श्रीमंताना न्याय कमीच आहे. आपल्या देशातील सिस्टिम, न्याययंत्रणा, सोई-सुवीधा या सर्वांपासून श्रीमंताना वंचीतच ठेवले गेले आहे.
बघा रेशनवरचे धान्य असो वा सरकारी दवाखाने असोत ते सगळे गरीबांसाठी. आणि हे दवाखाने कुणाच्या पैशातून निर्माण झाले तर श्रीमंतांनी भरलेल्या कराच्या उत्पनातून. हे सगळं अन्यायकारक आहे. शिक्षणक्षेत्रातील अनुदाने असोत व्यावसायीक अनुदान असोत की अंध-अपंग असोत त्यामध्ये गरीबांनाच प्रथम हक्क मिळतो प्रत्तेक ठिकाणी श्रीमंताना डावलले गेले आहे. आणि हे आज काल नाही खुप पुर्वी पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे.
निवडणुका असोत की पोलिस भरती पहिला हक्क गरीबाचा.
प्रत्तेक नेता म्हणतो मी दुस-या नेत्यापेक्षा गरीब आहे मलाच मते द्या. आजपर्यंत आम्ही गरिबालाच मते दिली आहेत तरीही गरीबी हटत नाही म्हणजे काय?
आपण श्रीमंतीच्या कीती विरोधात आहोत याचे आणखी एक उदाहरण आहे.
रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला की पहा. लोक लगेच तेथे जमतात. कोणत्या वाहनांची धडक आहे हे पाहतात आणि कोणी कोणाला धडक दिली हे न पाहता,
१) जर धडक सायकल आणि मोटरसायकलची असेल तर मोटरसायकलवाल्याला बदडून काढतात.
२) जर धडक मोटरसायकलची आणि कारची असेल तर कारवाल्याला बदडून काढतात.
३) जर धडक लहानकार आणि ट्रकची असेल तर ट्रकवाल्याला बदडून काढतात.
तात्पर्य काय गरिबाला न्याय देण्य़ाचा प्रयत्न सर्व थरावर दिसून येतो.
एवढे सगळे या गरीबीचे महात्म्य असताना तिकडे ७०,००,००० कोटी की कितीतरी डॉलर पैसे स्वीस बॅंकेत आहेत म्हणे. असतील बुवा कोणातरी गरिबाचे. कारण आम्ही फक्त गरीबांना निवडून देतो. गरीबांना अनुदान देतो. जिथे तिथे गरिबांना संधी देतो. गरीबांना नोकरी देतो. गरीबांना उद्योगधंदे सुरु करुन देतो. साधे दानही गरीबालाच मिळेल असे पाहतो. मग यातल्याच कोणा गरीबाचा पैसा असेल तिकडे स्विसबॅंकेत.
बाकी सगळे विसरलो तरी महात्मा गांधीनी दिलेला हा गरीबीचा मंत्र आपण विसरलो नाही. त्यामुळेच आज आपल्याला हे सोनियाचे दिवस पाहायला मिळत आहेत.
ज्याप्रकारे मायकल जॅक्सनमुळे डान्सला, सचीनमुळे क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झाले त्यापेक्षाही कितीतरी अधीक पटीने एकट्या म. गांधींमुळे गरीबीला प्राप्त झाले आहे.
महात्मा गांधींनी देशाच्यागरीबीला आपला आत्मा बनविला आणि त्या गरीबांसाठी आपले प्राण पणाला लावले. पण याउलट येथील त्यांच्या अनुयायांनी आपला आत्माच गरीब बनविला. अनुयायांच्या आत्म्यात देशासाठी जागाच नव्हती. फक्त मी, माझे वंशज, माझी खुर्ची आणि ती टिकवण्यासाठी आवश्यक असलेले उद्योगपती आणि त्यांचा पैसा.
श्रीमंत असणे हे पाप आहे का? नाही. पण कांही श्रीमंत बनलेल्या लोकांमूळे ते पापच वाटू लागले आहे.
जर आपण श्रीमंताना योग्य न्याय दिला, श्रीमंत नेत्यांना निवडून दिले आणि त्यांच्यासाठी योग्य सुविधा निर्माण केल्या तर हा बाहेर जाणारा पैसा देशातच राहील.
जर श्रीमंतीला मान्यता मिळू लागली तर लोक आपला पैसा स्वीसबॅंकेत का लपवून ठेवतील?
स्वभावाची गरीबी, पैशांची गरीबी, विचारांची गरीबी .. असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत .. त्यातली फक्त पैशांची गरीबी दाखवायला आपल्याला आवडते :-)
ReplyDeleteकाय साहेब / राजे , काय चालू आहे ? अस विचारल तर काय आपली कृपा ! अस उत्तर तर ठरलेल. आताच हि पोस्ट वाचत होतो, तर ऑफिस मधल्या मित्राने विचारल, " काय साहेब, कधी निघायचं ?" लगेच अनुभव आला.
ReplyDelete