एका निवांत क्षणी रामकृष्ण परमहंस आपल्या अनुयायांसह बसलेले होते तेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले," ठाकूरजी, आम्ही सर्वचजण देवाची भक्ती करतो, नित्यनियमाने पुजाअर्चा करतो, देवाचा धावा करतो, पण अजुनही तो आम्हाला का भेटत नाही?"
रामकृष्णांनी यावर स्मितहास्य केले आणि डोळे मिटले. कांही वेळाने ते बोलू लागले.
ते म्हणाले,
’अरे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तो प्रसंग.’
सगळ्यांनी कान टवकारले.
’ लहान मुल खेळत असते आणि आई तिकडे आपले काम करत असते. मुलाला खेळवत खेळवतच तिला आपले कामही करावे लागते. ती चुलीवर भाकरी करत असते, मुलासाठी खाऊ शिजवत असते. पण त्याबरोबरच तिचे लक्ष नेहमी आपल्या बाळाकडे असते.
कांही वेळाने बाळ रडू लागते तेव्हा ती आई त्याला खेळण्यासाठी एखादे खेळणे देते. खेळणे मिळताच बाळ त्या खेळण्य़ाबरोबर गुंगून जाते. आईचे काम सुरुच असते. ती इकडे चुलीत लाकूड टाकते तिकडे बाळाला खेळणे दाखविते. दोन्ही कामे सुरुच असतात.
असाच कांही वेळ गेला की बाळ पुन्हा रडू लागते. आता आई त्याला खायला लाडू देते. बाळ पुन्हा लाडू खाण्यात दंग होऊन जाते. आईचे काम सुरुच राहते. तिचे बाळाकडे पुर्ण लक्ष असते की आपला बाळ खेळतो आहे का? त्याला भुक लागली आहे का? तो कुठे पडणार तर नाही ना? पण तीचे कामही सुरु असते.
लाडू खाऊन झाल्यावर कांही वेळ बाळ खेळते पण नंतर पुन्हा रडू लागते. आई त्याला खेळणे देऊन पाहते, पुन्हा लाडू देऊ पाहते पण बाळ आता रडायचे थांबत नाही. यावेळेस त्याला ना खेळणे हवे ना लाडू त्याला आता आईच हवी असते. बाळाचे रडणे थांबत नाही तेव्हा आईला हातातील काम खाली ठेवावेच लागते. ती काम बंद करते आणि बाळाला उचलून पटापट मुके घेते. आईच्या कुशीत गेल्यावर बाळ लगेच खुदूखुदू हसू लागते. आता त्याला ना खेळणे हवे ना लाडू.
तुम्हा आम्हा भक्तांचे तसेच आहे.
कालीमाता म्हणजे आपली सर्वांची आईच आहे. ती आई आपल्या कामात आहे, तीला खुप काम असते. पण तीचे आपल्यासर्वांकडे खुप लक्ष असते. आपल्याला काय हवे नको ते तीच तर पाहते. ती आपल्याला हा संसाररुपी खेळणे देते आणि आपण त्यातच रमून जातो ह्या संसारातच आपण गुंगून जातो. आपली बायको, मुले, घर, पैसा, जमीन, बंगला हेच सर्वस्व मानतो. त्यातच रमून जातो आणि आपल्या आईला म्हणजे परमेश्वराला विसरून जातो. ती एका पाठोपाठ एक अशी खेळणी आपल्याला देते आणि आपण त्यातच गुंगून जातो. संसाराचा खेळ खेळताना खोटे बोलतो, लांडी लबाडी करतो, हे माझे ते माझे असे करतो त्यातच रमून जातो. कधी कधी आईची आठवण करतो आणि पुन्हा आपल्या खेळण्य़ात रमतो. आपल्याला वाटते की आईचे लक्ष आपल्याकडे नाही. पण तसे कधीही होत नाही तिला आपलीच काळजी लागून राहीलेली असते. फक्त ती दुरुन पाहत असते की आपण कसे खेळतो.
याच्याउपरांत एखादा भक्त हे सगळे सोडून द्यायला तयार झाला आणि आईसाठी रडू लागला तर ती त्याला लगेच दर्शन देईल त्याला जवळ घेईल.
असे म्हणतात की एखादा भक्त निस्सीम भक्तीने आणि दृढ निश्चयाने तीन दिवस आणि तीन रात्री रडला तर देव त्याला दर्शन देतो.
भक्ताच्या हाकेला देवालाही हातचे काम टाकून धावावे लागते.
देव जवळच आहे. त्याचे अस्तित्व जाणवण्या इतकी आपली जाणीव तरल नाही ही सर्वात मोठी अडचण आहे.
ReplyDelete