एके काळी एक सम्राट चक्रवर्ती होऊन गेला. चक्रवर्तीचा होण्याचा अर्थ आहे जगज्जेता होणे. असे चक्रवर्ती कधी कधीच जन्मतात. त्यांच्याबाबतीतली ही एक खुप जूनी कथा आहे. तर या चक्रवर्ती होणा-या राजांना एक वरदान होते जे दुस-या कोणालाही प्राप्त होऊ शकत नव्हते. चक्रवर्ती झालेल्या राजाला स्वर्गातील महान अशा सुमेरु नावाच्या पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार होता. त्यांच्या व्यतिरिक्त दुस-या कोणाला तो अधिकार प्राप्त नव्हता. खरंतर शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती बनतो जो सर्व पृथ्वी जिंकतो. आणि अशा चक्रवर्तीलाच या महान सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार मिळू शकतो.
तो चक्रवर्ती राजा खुपच खुष झाला होता कारण त्याला हे भाग्य प्राप्त झाले होते. तो स्वर्गातील सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरणार होता. तो आपली सारी फौज घेउन शस्त्राअस्त्राबरोबर पोहोचला स्वर्गाच्या दारावर.
स्वर्गाच्या दरवाज्यावर पोहोचताच त्याला तेथील द्वारपालाने अडविले.
तो द्वारपाल म्हणाला," आपण आलात ठिक आहे, पण हा सारा लवाजमा, बाडबिस्तारा तुम्हाला मागे पाठवावा लागेल कारण तुम्हाला एकट्यालाच प्रवेश मिळेल. आणि आपण सोबत कांही चिन्ही-हातोडावगैरे साहित्य आणले आहे ना नाव कोरण्यासाठी?"
राजा म्हणाला," होय मी घेऊन आलोय"
" मग ठिक आहे. प्रथम आपल्याला थोडं काम करावे लागेल ते म्हणजे, हा जो सुमेरु पर्वत आहे तो जरी महान आणि खुप अनंत, विशाल असला तरी आता पर्यंत इतके राजे चक्रवर्ती होऊन गेले की तुमचे नाव लिहायला आता जागाच उरली नाही. तेव्हा आपल्याला प्रथम कोणाचे तरी नाव खोडावे लागेल आणि नंतरच तुमचे नाव लिहावे लागेल. सारा पर्वत नावांनी भरुन गेला आहे."
तो राजा आत गेला. पर्वत अनंत होता त्यामध्ये कितीतरी हिमालय सामावले असतील इतका मोठा. आणि तरीही त्यावर एक इंचभर जागा शिल्लक नव्हती. तो विचार करु लागला. शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती होतो. आणि तरीही हा पर्वत चक्रवर्ती राजांच्या नावांनी भरुन गेला आहे. कमाल आहे. एवढे चक्रवर्ती होण्य़ासाठी किती काळ लोटला असेल. अनंत अनंत काळ लोटल्यानंतर एक चक्रवर्ती होतो आणि तरिही जागा नाही. तो उदास झाला त्याला काय करावे हे कळेना. तो द्वारपाल आला आणि म्हणाला," हे राजन आपण दुखी होऊ नका. हे फार पुर्वीपासून घडत आले आहे. माझे बाबा, त्यांचे बाबा आणि त्यांचेही बाबा असे सर्व खुप काळापासून हेच काम करत आहोत. पिढ्यानपिढ्या पुढ्च्या पिढीला ते हेच सांगत आले आहेत की जेव्हा कोणी राजा चक्रवर्ती होऊन येईल तेव्हा त्याला दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागते. रिकामी जागाच मिळत नाही.
चक्रवर्ती राजा मागे परतू लागला. तो म्हणाला," जर दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागत असेल तर हा वेडेपणाच आहे. कारण आज मी नाव लिहून गेलो तर उद्या दुसरे कोण चक्रवर्ती येऊन ते खोडून आपले नाव लिहील आणि हा पर्वत एवढा विशाल आहे आणि त्यावर एवढी अनंत नावे आहेत ती वाचतो तरी कोण? येणारा चक्रवर्ती आपले नाव लिहीण्याकरताच येतो. मग याला काय अर्थ राहीला. सगळे कांही व्यर्थच गेले."
. . .
परंतू त्या चक्रवर्तीइतके समजूतदार लोक कमीच असतात. लोक दगडावर नावे कोरुन घेतात. मंदीरावर नावे कोरुन घेतात. स्मारक बनवतात, आपले नाव लिहून घेतात आणि विसरतातच की नावाशिवाय जन्माला आलो होतो. नावतर आपले नव्हतेच ते कोणीतरी दिलेले होते. नाव दगडावर लिहीले काय आणि वाळूवर लिहीले काय, ते किती काळ टिकणार?. दगड खराब केला ती गोष्ट वेगळीच आणि मेहनत केली ती वेगळीच.
- ओशो (साधना पथ)
छान कथा ! आवडली मला आणि अंतर्मुख करुन गेली. या कथेवरुन मला एक प्रसंग आठवला. असो..
ReplyDeleteअतिशय उत्तम कथा, ओशो म्हणजे ग्रेटच !
ReplyDeleteआजकाल पूल, रस्ते, चौक यांना आपली व आपल्या नेत्यांची नावे देण्यासाठी जी साठमारी चालते, त्यांना हि कथा सांगायला हवी...